Dhulivandan or Rang Panchami Difference, Holi 2024: आज संपूर्ण देशभरात रंगांचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. तिथीनुसार होळी ही २४ मार्चला साजरी झाली असली रात्री होळीचा उत्साह व तयारी मात्र दोन आठवडे आधीच सुरु झाली होती. आज त्या सगळ्या तयारीचा अंतिम टप्पा म्हणजेच रंग खेळण्याचा दिवस. आजच्या दिवशी रंग लावून आनंद साजरा करणे ही जरी आता सध्या प्रचलित पद्धत झाली असली तरी रंगपंचमी ही आज साजरी केलीच जात नाही, हे तुम्हाला माहित आहे का? आजचा दिवस हा दिनदर्शिकेनुसार सुद्धा रंग पंचमी नव्हे तर धूलिवंदन म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात आज जरी रंग खेळला जात असला तरी परंपरेनुसार आज धुळवडीचा दिवस आहे. अनेकदा या दोन्ही दिवसांमध्ये फरक लक्षात येत नाही, काही जण तर दोन्ही दिवस एकच आहे असेही समजतात. म्हणूनच आज आपण धुलिवंदन/ धुळवड व रंगपंचमीमधील फरक जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळवड कशी साजरी केली जाते?

होलिका दहन झाल्यानंतर उरलेली राख एकत्र केली जाते. या राखेने दुसऱ्या दिवशी सकाळी धुळवड खेळली जाते. या राखेमध्ये मातीही समाविष्ट झालेली असते. मित्रमंडळी एकमेकांच्या अंगावर राख लावून हा सण साजरा करतात. कोकणात गावी आजही अशा प्रकारे धुळवड खेळली जाते. धुळवड हा बोलीभाषेतील शब्द झाला असून त्याला ‘धूलिवंदन’ सुद्धा म्हटले जाते.

धुळवड व रंग पंचमीमध्ये फरक काय?

पंचांगानुसार, फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी मूळ ‘रंगपंचमी’चा उत्सव साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने या दिवशी रंग खेळण्याची आपल्याकडे पद्धत आहे. होलिका दहनानंतर येणारा रंगोत्सव म्हणजेच ‘रंगपंचमी’ अजूनही काही गावात पाच दिवसांनी साजरा केला जातो. त्यानुसार यंदा २९ मार्चला रंग पंचमीची तिथी आहे.

हे ही वाचा << Holi 2024: होळीला उधळा लाल, पिवळा निळा रंग! मात्र त्याआधी रंगांचे जाणून घ्या ‘हे’ अर्थ…

धूलिवंदन व रंग पंचमीमध्ये संभ्रम का?

उत्तर भारतामध्ये विशेषतः मथुरा वृंदावन, उत्तर प्रदेश या भागांमध्ये होळी विविध स्वरूपात साजरी होते. राखेची होळी ते फुलांची होळी, लठमार होळी ते रंगांची होळी असे अनेक प्रकार या भागात पाहायला मिळतात. पण होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी तिथे रंग खेळले जातात. या परंपरेचा प्रभाव महाराष्ट्रातही होत गेला आणि धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळण्याची सवय लोकांना झाली. यामुळे धुळवड आणि रंगपंचमी याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. पण मुळात तिथीनुसार आजचा दिवस हा रंगपंचमी नसून धुलिवंदनाचा आहे. बाकी तुम्हाला सर्वांना या सणाच्या खूप खूप शुभेच्छा!

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today is dhulivandan or rang panchami different types of holi 2024 when maharashtra celebrates with rang and what is dhulvad svs