भारत देश दरवर्षी जगाला एकापेक्षा एक अभियंते (इंजिनियर) देतो. देशभरात अभियंते घडवणारी असंख्य महाविद्यालये आहेत. परंतु, यामध्ये आयआयटीमधून (भारतीय तंत्रज्ञान संस्था) शिकलेल्या अभियंत्यांची जगभरात मागणी आहे. अभियंता होण्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांची पहिली इच्छा असते ती म्हणजे देशातील एखाद्या आयआयटीमध्ये प्रवेश मिळावा. आयआयटीत प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी खूप मेहनत करतात. आज आम्ही तुम्हाला देशातील १० सर्वोत्तम आयआयटी व तिथे प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या निकषांबद्दलची माहिती देणार आहोत.
आयआयटी (Indian Institute of Technology) म्हणजे भारतातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य शिक्षण संस्थांचा समूह आहे. हे स्वायत्त सार्वजनिक शैक्षणिक संस्थान आहे जे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने आयआयटीची स्थापना करण्यात आली.
पहिली आयआयटी कधी स्थापन झाली?
१९५१ मध्ये पश्चम बंगालमधील खडगपूर येथे पहिली आयआयटी स्थापन झाली. जी आयआयटी खडगपूर नावाने ओळखली जाते. त्यानंतर सात वर्षांनी महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे आयआयटी बॉम्बेची स्थापना करण्यात आली. त्यापाठोपाठ गेल्या ६५ वर्षांमध्ये देशभरातील २३ शहरांमध्ये आयआयटीची स्थापना करण्यात आली आहे. आज देशभरात एकूण २३ आयआयटी संस्था आहे.
नॅशनल इन्स्टिट्युश्नल रॅन्किंग फ्रेमवर्क दरवर्षी देशातील शिक्षण संस्थांचे मूल्यमापन करते आणि त्यांच्या गुणवत्तेनुसार क्रमवारी जाहीर करते. एनआयआरएफने प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीनुसार देशातील टॉप १० आयआयटी संस्थांची माहिती खालीलप्रमाणे:
भारतातील टॉप १० आयआयटी
JEE Main आणि JEE Advanced परीक्षा
क्रमांक | संस्थेचे नाव | राज्य |
१ | आयआयटी मद्रास | तमिळनाडू |
२ | आयआयटी दिल्ली | दिल्ली |
३ | आयआयटी बॉम्बे | महाराष्ट्र |
४ | आयआयटी कानपूर | उत्तर प्रदेश |
५ | आयआयटी रुरकी | उत्तराखंड |
६ | आयआयटी खडगपूर | पश्चिम बंगाल |
७ | आयायटी गुवाहाटी | आसाम |
८ | आयआयटी हैदराबाद | तेलंगणा |
९ | आयआयटी बीएचयू वाराणसी | उत्तर प्रदेेश |
१० | आयआयटी इंदोर | मध्य प्रदेश |
आयआयटी मध्ये प्रवेश घेण्यासाठीचे निकष कोणते
आयआयटीमध्ये प्रवेशासाठी सर्वप्रथम JEE Main ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागते, जी राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. जेईई मेन मध्ये चांगले गुण मिळाल्यानंतर, तुम्हाला JEE Advanced परीक्षेसाठी पात्रता मिळवावी लागते. ही परीक्षा आयआयटी प्रवेशासाठी अंतिम टप्पा आहे. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेतील तुमच्या रँकनुसार (देशभरातील विद्यार्थ्यांमधील क्रमांक) आयआयटी आणि अभ्यासक्रमाची निवड होते. तत्पूर्वी १२ वी (एचएससी) अथवा समकक्ष परीक्षा उत्तीरण केलेली असावी. ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित हे विषय असणे आवश्यक आहे. यात सामान्य प्रवर्गासाठी किमान ७५ टक्के गुण मिळवणे आवश्यक असते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना ६५ टक्के गुण मिळवावे लागतात.