Indian Railway : जगातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिले जाते. भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात, या प्रवाशांच्या सेवेसाठी रोज १० हजारांहून अधिक रेल्वे गाड्या धावतात, ज्यात हजारो स्लीपर ट्रेन्सचा समावेश आहे. ज्यातून बहुतेक प्रवासी लांब पल्ल्याचा प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या स्लीपर ट्रेन्समध्ये प्रामुख्याने पाच ते सहा प्रकारचे कोच असतात. जनरल कॅटेगरी, स्लीपर, थर्ड एसी, थर्ड एसी इकॉनॉमी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी. यातील प्रत्येक थर्ड एसी आणि थर्ड एसी इकॉनॉमीमधील प्रवाशांना मिडल बर्थची सुविधा दिली जाते. पण, मिडल बर्थची सीट मिळणाऱ्या प्रवाशाला भारतीय रेल्वेच्या काही नियमांचे पालन करावे लागते.
यातील पहिला नियम म्हणजे मिडल बर्थमधील प्रवासी कधीही झोपू शकत नाही. त्यांच्या झोपेची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
मिडल बर्थवर बसलेल्या प्रवाशांना कोणत्या वेळेत झोपता येते?
मिडल बर्थवर बसणाऱ्या प्रवाशांना भारतीय रेल्वेच्या नियमांची माहिती असणे गरजेचे असते. कारण अनेकदा स्लीपर आणि थर्ड एसीमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना मधल्या बर्थमुळे विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. मिडल बर्थमधील प्रवासी त्याच्या इच्छेनुसार कधीही झोपू शकत नाही. भारतीय रेल्वेने त्यांच्यासाठी एक वेळ निश्चित केली आहे.
जर तुम्हाला ट्रेनमध्ये मिडल सीट मिळाली असेल, तर तुम्ही तुमच्या बर्थवर रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत झोपू शकता. या वेळेशिवाय तुम्ही तुमचा बर्थ उघडू शकत नाही; म्हणजेच तुम्ही तो चालू ठेवू शकत नाही. जर तुम्ही असे केले तर लोअर बर्थवरील तुमचा सहप्रवासी तुम्हाला थांबवू शकतो. तुम्ही न ऐकल्यास तुम्हाला दंडदेखील होऊ शकतो.
जर तुम्हाला मिडल बर्थची सीट मिळाली आणि तुमच्या खालच्या अर्थात लोअर बर्थवरील सहप्रवासी रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बसलेले असतील, तर तुम्ही त्यांना झोपायला सांगू शकता आणि तुमचा बर्थ उघडू शकता. हे सांगणे तुमचा अधिकार आहे. यावेळी तुम्ही तुमचा मिडल बर्थ उघडून आराम करण्यास मोकळे आहात. पण लक्षात ठेवा की, सकाळी ६ नंतर तुम्हाला मधला बर्थ बंद करावा लागेल.
कधीकधी मिडल बर्थमधील लोक अडवणूक करत बर्थ उघडा ठेवण्यासाठी भांडतात. अशा परिस्थितीत खालच्या बर्थवरील प्रवाश्याला अडचणीचा सामना करावा लागतो. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, मिडल बर्थवरील प्रवासी कधीही कोणत्याही कारणाशिवाय त्याचा मिडल बर्थ उघडू शकत नाहीत. जर काही अडचण आली तर त्याला लोअर बर्थवरच बसलेल्या प्रवाशांची परवानगी घ्यावी लागेल आणि परस्पर संमतीने ते मिडल बर्थ उघडू शकतात.
भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना विनंती केली आहे की, मिडल बर्थवर बसणाऱ्या प्रवाशांना आणि अपंग, गर्भवती किंवा वृद्धांना सहकार्य करावे आणि त्यांना जास्त वेळ झोपण्याची इच्छा असेल किंवा त्यांना मदत म्हणून लोअर बर्थची सुविधा द्यावी. असे केल्याने या प्रवाशांना प्रवासादरम्यान जास्त त्रास सहन करावा लागणार नाही.
भारतीय रेल्वेचा ‘रात्री १० नंतर’ हा नियम
रात्री १० नंतर ट्रेनमधील सर्व लाईट्स बंद कराव्या लागतात. ग्रुपने प्रवास करणारे प्रवासी रात्री १० नंतर मोठ्याने बोलू शकत नाहीत. जर रात्री १० नंतर मिडल बर्थवर बसलेल्या प्रवाशाने आपली सीट उघडली तर खालच्या बर्थवर बसलेला प्रवासी त्याला काहीही बोलू शकत नाही. रेल्वे सेवांमध्ये ऑनलाइन फूड डिलिव्हरीला रात्री १० नंतर देण्याची परवानगी दिली जात नाही. पण, तुम्ही ई-केटरिंग सेवांच्या मदतीने रात्रीच्या वेळीही ट्रेनमध्ये तुमचे जेवण किंवा नाश्ता प्री-ऑर्डर करू शकता.