Bhakra Nangal Train: भारतीय रेल्वेचा इतिहास जवळपास १८६ वर्ष जुना आहे. ब्रिटिश जेव्हा भारतात आले त्याच काळात १८३६ मध्ये रेल्वेचा पाया रचला गेला होता. भारतात रेल्वेचे ६८ हजार किलोमीटरहुन जास्त विस्तारलेले नेटवर्क आहे. कावळपास १३,२०० पॅसेंजर ट्रेन व ७३२५ रेल्वे स्टेशन सह भारतीय रेल्वे हे जगभरातील चौथे मोठे नेटवर्क आहे. भारतात कोणत्याही भागात रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांच्या मूलभूत सुविधांची सोय केली जाते. जनरल, शयनकक्ष, एसी (थर्ड, सेकंड,फर्स्ट) यानुसार प्रवाशांना भाडे आकारले जाते. रेल्वे विभाग प्रवाशांची जशी काळजी घेतो तसाच फुकट्या प्रवाशांना दंडही लगावला जातो. तिकीट नसल्यास दंड, शिक्षा भोगावी लागू शकतो हे आपणही जाणतो पण तुम्हाला माहित आहे का मागील ७५ वर्षांपासून भारतातील एका ट्रेनमध्ये सर्व प्रवासी मोफत प्रवास करतात. विशेष म्हणजे यात कोणताही टीसी तिकीट तपासायला येत नाही.
भाकरा- नांगल ट्रेन कुठून प्रवास करते?
पंजाब व हिमाचल प्रदेश च्या सीमेवरील भाकरा व नांगल या मार्गावर भाकरा ब्यास मॅनेजमेंट बोर्डातर्फे ही विशेष ट्रेन चालवली जाते. या ट्रेनचे नावच भाकरा- नांगल ट्रेन आहे. ५९ वर्षांपूर्वी १९६३ मध्ये बांधलेले भाकरा नांगल धरण हे जगातील सर्वात उंचावरील सरळ गुरुत्वाकर्षण असणारे जलाशय आहे. या धरणावरून सतलुज नदी व शिवालिक पहाडांमधून १३ किमीच्या रुळावर ही ट्रेन धावते. या ट्रेनचा प्रवास पूर्णतः मोफत असून यात कोणतेच शुल्क आकारले जात नाही.
भाकरा- नांगल ट्रेन कशी आहे?
भाकरा- नांगल ट्रेनची डब्बे हे लाकडी होते सुरुवातीला वाफेच्या इंजिनावर ही ट्रेन धावायची, पण नंतर यात डिझेलचे इंजिन जोडण्यात आले. यात आधी १० डब्बे होते पण आता या ट्रेनमध्ये केवळ ३ कोच आहेत. या ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे यात कधी कोणताही तिकीट निरीक्षक येत नाही. या ट्रेनने दररोज ८०० लोक प्रवास करतात.
हे ही वाचा<< ..म्हणून कोकणातला ‘हा’ समुद्र रात्री निळ्या रत्नासारखा चमकतो; Video पाहून म्हणाल, स्वर्ग हा इथेच!
परंपरा व प्रतिष्ठा
२०११ मध्ये भाकरा ब्यास मॅनेजमेंट बोर्डाने आर्थिक नुकसान पाहता या ट्रेनला बंद करण्याचा निर्णय घेतला होता पण नंतर असे ठरवण्यात आले की, ही ट्रेन आर्थिक मिळकतीचे स्रोत न मानता परंपरा म्हणून पाहावे. १९४८ मध्ये जेव्हा या ट्रेनचे बांधकाम सुरु होते तेव्हा यातून मशीन व कामगारांना नेण्याचे काम केले जात होते. १९६३ मध्ये जेव्हा या ट्रेनचे उदघाटन झाले तेव्हा यातून शेकडो प्रवासी प्रवास करू लागले.