आजकाल लोक फिटनेससाठी अनेक गोष्टी करताना दिसतात. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी डाएटपासून ते जिम वर्कआउटपर्यंत लोक बरेच काही करतात. विशेषत: तरुण फिटनेससाठी जिममध्ये तासनतास घाम गाळतात, बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये ट्रेडमिल मशीनचा वापर करतात. हे जिममध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय फिटनेस डिव्हाइसेसपैकी एक आहे. परंतु, आज तुम्ही पाहत असलेल्या ट्रेडमिलचा शोध पहिल्यांदा कधी लागला हे तुम्हाला माहीत आहे का? नसल्यास, आज आपण ट्रेडमिल मशीनचा शोध कसा आणि का लागला आणि त्याचे नाव कसे पडले जाणून घेऊ….
कणसाचे दाणे दळण्यासाठी वापरली जायची ट्रेडमिल मशीन
ट्रेडमिलच्या शोधाचे श्रेय सर विल्यम क्युबिट (१७८५-१८६१) नावाच्या सिव्हिल इंजिनीअरला जाते, ज्याने १८१८ मध्ये ट्रेडमिल तयार केले, ज्याला रनिंग व्हील म्हणूनही ओळखले जाते. विल्यम क्युबिट यांचा जन्म गिरणी कामगाराच्या कुटुंबात झाला. याच कुटुंबात ते लहानाचे मोठे झाले, ज्यांनी पुढे कणसाचे दाणे दळण्यासाठी या मशीनचा शोध लावला. त्या काळात त्यांनी त्याला ‘ट्रेडव्हील’ असे नाव दिले.
कैद्यांना शिक्षा करण्यासाठी व्हायचा ट्रेडमिलचा वापर
पुढे क्युबिट यांनी आपल्या ट्रेडव्हील मशीनच्या डिझाइनमध्ये अनेक बदल केले, ज्यामध्ये असे डिझाइन होते, ज्यात ट्रेडव्हीलला दोन चाके होती, ज्यावर तुम्ही चालू शकत होता आणि त्याचे कॉग्स एकमेकांशी जोडलेले होते. त्याचे सर्वात लोकप्रिय डिझाइन लंडनच्या ब्रिक्स्टन तुरुंगात स्थापित केले गेले. त्यात एक रुंद चाक असायचे आणि कैदी त्यांचे पाय चाकाच्या पायरीसारख्या खोबणीवर दाबायचे, ज्यामुळे चाक फिरायचे.
ब्रिक्सटन तुरुंगात बसवलेले ट्रेडव्हील मशीन एका अंडरग्राउंड मशीनला जोडलेले होते, ज्याने कणीस दळले जायचे. मशीनची रचनाच अशाप्रकारे केली होती की, ज्याने धान्य दळूनही व्हायचे आणि कैद्यांना शिक्षाही व्हायची. या मशीनच्या मदतीने २४ कैद्यांना एकाच वेळी व्यस्त ठेवण्यात यायचे. त्यांना उन्हाळ्यात दिवसाचे १० तास आणि हिवाळ्यात दिवसाचे सात तास मशीनवर कठोर परिश्रम करायला लावले जायचे.
ट्रेडमिल बनले होते छळाचे साधन
१९ व्या शतकाच्या शेवटी, ब्रिटिशांनी तुरुंगांमध्ये सुधारणा करण्यास आणि कैद्यांना अन्न आणि ब्लँकेट यांसारख्या आवश्यक गोष्टी पुरवण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत तुरुंगात जाऊन फुकटचे सामान मिळवण्यासाठी गरीब लोक गुन्हे करतील, अशी भीती लोकांना वाटू लागली. अशा परिस्थितीत कैद्यांना पुरविल्या जाणाऱ्या या सुखसोयींची भरपाई त्यांच्या वेतनातून करण्यात यावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले.
सुरुवातीला या ट्रेडमिल्सचा वापर कणीस दळण्यासाठी किंवा पाणी उपसण्यासाठी केला जात होता, परंतु कालांतराने ते शिक्षा करण्याची एक तंत्र बनले. इतिहासकार डेव्हिड शॅट यांच्या मते, १८४२ पर्यंत इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समधील २०० तुरुंगांपैकी सुमारे १०९ तुरुंगांमध्ये कैद्यांना शिक्षा करण्यासाठी या मशीनचा वापर केला जात होता. परंतु, त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. त्या मशीनवर चालल्यामुळे कैदी पडून जखमी होऊ लागले आणि हृदय विकाराने त्यांचा मृत्यू होऊ लागला, ज्यामुळे १८९८ मध्ये तुरुंगात या मशीनच्या वापरावर बंदी घालण्यात आली.
अशा प्रकारे फिटनेससाठी सुरू झाला ट्रेडमिलचा वापर
ट्रेडमिल नंतर अमेरिकेत पुन्हा उदयास आली, जेव्हा क्लॉड लॉरेन हेगन नावाच्या व्यक्तीने १९११ मध्ये त्याच्या पेटंटसाठी अर्ज केला. येथेही १८२२ मध्ये ट्रेडमिलचा तुरुंगात वापर केला जात होता, यामुळे परिस्थिती सेम ब्रिटनसारखीच होती. पण, काही काळानंतर हे लक्षात आले की, ठराविक वेळ त्या मशीनवर चालल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात, ज्यामुळे फिटनेससाठी त्याचा वापर केला जाऊ लागला. यानंतर प्रथमच आरोग्य सुधारण्यासाठी ट्रेडमिल मशीनची रचना केली गेली, जी आमच्या आधुनिक ट्रेडमिल मशीनसारखीच होती.
१९९५ साली अमेरिकन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रॉबर्ट ए. ब्रूस, ज्यांना ‘फादर ऑफ एक्सरसाइज कार्डिओलॉजी’ म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठात प्रथम मोटारवर चालणाऱ्या ट्रेडमिलचा शोध लावला. यानंतर अमेरिकन मेकॅनिकल इंजिनियर विल्यम स्टॉब यांनी १९६० च्या दशकात होम फिटनेस मशीन तयार केली. त्याने त्याला ‘पेस मास्टर 600’ असे नाव दिले. ज्यानंतर न्यू जर्सीमध्ये एक होम ट्रेडमिल तयार केली गेली, जी कोणीही घरी वापरू शकेल अशा पद्धतीची होती. अशाप्रकरे धान्य दळण्यासाठी आणि कैद्यांना शिक्षा करण्यासाठी वापरली जाणारी ट्रेनमिल मशीन कालांतराने जिमचा भाग बनली.