मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. मुंबईत स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेली कोणतीच व्यक्ती रिकाम्या हाताने परत जात नाही. त्यामुळेच मुंबईला ‘स्वप्ननगरी’ म्हटलं जातं. मुंबई हे एक असं शहर आहे, जिथे गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, तसेच प्रत्येक विविध जातींचे, विविध धर्मांचे लोक येथे एकत्र वास्तव्य करतात. पण, मुंबईनं आतापर्यंत अनेक आघातही सोसले आहेत. मग तो दिवस २६ नोव्हेंबर २००८ असो किंवा २६ जुलै २००५ हे दोन्ही दिवस मुंबईकरांसाठी कधीही न विसरण्यासारखे आहेत. पण तुम्हाला ठाऊक आहे का? मुंबईतील तुळशी तलावाने २६ जुलै २००५ रोजी झालेल्या पावसाच्या प्रकोपापासून मोठ्या प्रमाणात जाऊ शकणारे मुंबईकरांचे जीव वाचवले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मुसळधार पावसामुळे मुंबईत महापूर आला होता आणि त्यामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक बंद झाली होती. अनेकांच्या घरांत पाणी शिरले होते. कित्येक लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्याशिवाय अनेकांना पुराच्या पाण्यात आपला जीवदेखील गमवावा लागला होता. जवळपास ८५० लोकांना पुराच्या पाण्यात आपला जीव गमावल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे २६ जुलै २००५ हा दिवस म्हटलं की, आजही अनेक मुंबईकरांच्या अंगावर काटा येतो. पण, याच मुंबईतील नैसर्गिक आश्चर्य असणाऱ्या तुळशी तलावानं मुंबईकरांचे जीव वाचवले होते. कारण- २६ जुलैच्या पावसात तुळशी तलाव नसता, तर मुंबईत साठत गेलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या महापूरसदृश परिस्थितीनं आणखी मोठं रौद्र रूप धारण केलं असतं.

तुळशी तलावामुळे वाचले मुंबईकरांचे जीव

तुळशी तलाव हे जगातील दुसरं अनोखं नैसर्गिक आश्चर्य म्हणून ओळखलं जातं. उत्तर मुंबईत असलेला तुळशी तलाव हा गोड्या पाण्याचा तलाव आहे. हा मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तलाव असून, तो मुंबई शहराला पाणीपुरवठा करतो. २६ जुलै रोजी दक्षिण मुंबईत झालेला पाऊस हा साधारण ८५० मिलिमीटर होता. त्या दिवशी सर्वाधिक पाऊस तुळशी तलावात झाला होता; जो १०४५ मिलिमीटर होता. त्यामुळे या तलावातून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडले आणि ते याच तलावाला जोडून असलेल्या विहार तलावात गेले होते. विहार तलावदेखील तुडुंब भरून वाहू लागला आणि त्यातील पाणी व गाळ विहार तलावाच्या मुखाशी असलेल्या मिठी नदीमध्ये शिरला. परिणामत: हळूहळू संपूर्ण मुंबईत महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.

हेही वाचा: “तुम्ही घाटी लोक काय स्टेडियम बांधणार…”, मराठी माणसाच्या अपमानातून उभे राहिले वानखेडे स्टेडियम; जाणून घ्या यामागची गोष्ट…

पाहा व्हिडीओ:

पण, नैसर्गिक आश्चर्य असलेल्या तुळशी तलावातील जमिनीची धूप होण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे. जमिनीची धूप होणे म्हणजे काय तर, पावसाचे पाणी जेव्हा जमिनीवर पडते, तेव्हा ते खूप उंचीवरून पडते, पावसाचे थेंब जमिनीवर पडत असताना ते जमिनीच्या पृष्ठभागावर आघात करतात. या आघातामुळे पृष्ठभागावरील मातीचे कण हळूहळू बाजूला होतात. जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा पाण्यासह मातीचा गाळदेखील वाहून जातो. पण, तुळशी तलावात जमिनीची धूप होण्याचे प्रमाण शून्य टक्का असल्याने तलावाच्या आसपास असलेल्या डोंगरांची माती, झाडं तलावात वाहून गेली नाहीत. जर तलावातील या सर्व बाबी पाण्यात वाहून गेल्या असत्या, तर २६ जुलैचा पूर आणखी मोठ्या प्रमाणात वाढला असता. तुळशी तलावामुळे २६ जुलै रोजी मुंबईत आलेल्या महापुराचे प्रमाण काही टक्के का होईना; पण कमी झाले. त्यामुळे अनेक मुंबईकरांचे प्राण वाचले.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tulsi lake the second unique natural wonder of the world saved the lives of thousands of mumbaikars from the 26 july 05 floods sap
Show comments