Tulsi Vivah 2024: तुळशी विवाहाला सुरूवात झाली आहे, तसेच चातुर्मासाची समाप्तीही आहे. भारतीय संस्कृतीत चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या चातुर्मासाच्या कालावधीत आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन व कार्तिक या महिन्यांचा समावेश होतो. धार्मिक संकल्पनेनुसार या काळात देव झोपी गेल्याने कार्यरत नसतात, म्हणूनच व्रतवैकल्याद्वारे साधना करावी असे सुचविले जाते. त्या अनुषंगाने या काळातील व्रतवैकल्यांच्या नियमांचे प्रयोजन केलेले दिसते. या आध्यात्मिक व धार्मिक कारणांव्यतिरिक्त चातुर्मासाच्या प्रयोजनामागील नैसर्गिक, भौगोलिक तसेच आयुर्वेदीय कारणमीमांसाही विशेष उल्लेखनीय आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायन सुरू होते. पौराणिक कथांनुसार दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस असतो. म्हणजेच देवांची रात्र कर्क संक्रांतीला म्हणजेच आषाढ महिन्यात सुरू होते. व येथूनच सुरुवात होते ती चातुर्मासाला. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या चार महिन्यांच्या काळास ‘चातुर्मास’ असे म्हणतात. चातुर्मासाची सुरुवात होते ती आषाढ शुद्ध एकादशीपासून, ही एकादशी देवशयनी एकादशी म्हणूनही प्रसिद्ध आहे. परंपरागत चालत आलेल्या कथांनुसार या दिवसापासून पुढील चार महिन्यांच्या काळात देव झोपी जातात. म्हणूनच या एकादशीस देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या काळात श्रीविष्णू क्षीरसागरात चिरनिद्रा घेतात म्हणूनच ही एकादशी विष्णुशयनी अथवा हरिशयनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते.

अधिक वाचा: Diwali 2023: दिवाळीला ‘भूत चतुर्दशी’ का म्हणतात? 

पुराणांमध्ये हरी हा शब्द सूर्य, चंद्र, वायू, विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्य-चंद्र दिसेनासे होतात म्हणूनच या काळासाठी केलेला हरिशयन असा उल्लेख योग्यच वाटतो. या काळात विष्णू व इतर देव कार्यरत नसले तरी सृष्टी निर्माणकर्ता ब्रह्मदेव मात्र या कालावधीत आपले नवनिर्मितीचे कार्य करत असतो असे मानले जाते. तसेच कार्तिक महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवोत्थान, देवउठनी किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणतात. हा दिवस देवतांच्या उठण्याचा म्हणजे कार्य सुरु करण्याचा दिवस मानला जातो. कार्तिक एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे पर्व तुलसी विवाह म्हणून साजरे केले जाते. एकूणच या विवाहाच्या निमित्ताने गेल्या चार महिन्यात व्रत वैकल्याच्या माध्यमातून निसर्गाच्या सर्जनतेसाठी आपली जी विहित कार्य काही काळ थांबलेली असतात, त्यांना परत सुरू केले जाते. यावर्षी प्रबोधिनी एकादशी म्हणजेच तुलसी विवाहास प्रारंभ १२ नोव्हेंबर २०२४ रोजी झाला आहे. या दिवशी शाळीग्राम रुपी विष्णूचा तुळशीसोबत विवाह लावण्यात येतो.

सौजन्य: विकिपीडिया

तुळशीचा विवाह विष्णूशी का लावण्यात येतो?

तुळशी विवाहमागे मूलतः नैसर्गिक कारण आहे, निसर्गातील परिवर्तनाचा सोहळा हा नेहमीच भारतीय संस्कृतीत साजरा केला जातो. तसा तो तुळशीच्या विवाहाच्या निमित्ताने देखील केला जातो. याशिवाय पुराणांमध्ये आपल्याला एक कथा आढळते. ती म्हणजे शिवपुत्र जालंधर आणि वृंदाची. जालंधर हा शिवपुत्र असला तरी तो एक असूर राजा होता, त्याची पत्नी वृंदा ही विष्णूची परमभक्त तर होतीच, त्याच बरोबरीने ती तिच्या पातिव्रत्यासाठी ओळखली जात होती. किंबहुना तिच्यामुळे जालंधराच्या शक्तीत वाढ होत होती, आणि देव-असूर युद्धात त्याचा पराभव करणे कठीण होऊन बसले होते. म्हणूनच सर्व देवांनी आपली चिंता भगवान विष्णूंच्या कानावर घातली. देवांच्या विजयात वृंदाची भक्ती आड येत होती. आणि ती भगवान विष्णूंची परमभक्त असल्याने तिला कुणीही काहीही करू शकत नव्हते. शेवटी सर्व देवांच्या सांगण्यावरून विष्णूनेच तिचे पातिव्रत्य भंग करण्याचे ठरविले. आणि खुद्द भगवान विष्णू जालंधराचे रूप घेऊन तिच्याकडे गेले. वृंदाने आपला पती समजून विष्णूकडे स्वतःला समर्पित केले. यामुळे तिचे पातिव्रत्य भंग पावले आणि जालंधराला त्यामुळे मिळणारे संरक्षण बंद झाले. याचाच फायदा घेऊन भगवान शिवाने जालंधराचा वध केला. यानंतर विष्णूने ती नेहमीच पवित्र मानली जाईल, आणि तुळशीच्या रूपात तिची पूजा केली जाईल तसेच कार्तिक शुक्ल एकादशीला तिचा विवाह माझ्याशी करण्यात येईल हे वरदान दिले. म्हणूनच दरवर्षी या कालखंडात तुळशीचा विवाह भगवान विष्णूंशी करण्यात येतो.

अधिक वाचा: भारतीय कला-साहित्यातील देवी लक्ष्मीची बदलती प्रतिमा!

तुळशी विवाह म्हणजे मंगल कार्यांची नांदी

तुळशी विवाहाने चातुर्मासाची सांगता होते. चातुर्मास हा पावसाळ्याचा कालावधी असल्याने अनेक आजार या काळात बळावतात. पूर्वी या काळात मुसळधार पावसामुळे लांबचे प्रवास टाळत असत, त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला. पावसाच्या या काळात आपल्या शरीरात अनेक बदल होतात. पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. शरीरातील अग्नी मंदावलेला असतो. शरीरातील ऊर्जा व वीर्यशक्ती कमी झालेली असते, याचेच भान ठेवून चातुर्मासातील व्रत- वैकल्यांची मांडणी केलेली दिसते. म्हणूनच या कालखंडात विवाहासारखे विधी टाळले जातात. आणि तुळशी विवाहापासून निसर्ग बदलानुरूप मंगल कार्यांना सुरुवात केली जाते. चातुर्मासाच्या काळात एक तरी व्रत करावे असा दंडक सांगितला जातो. या व्रतांच्या उपासनेत एक वेळ भोजन करणे, कमी व हलका आहार करणे, मांसाहार टाळणे, कांदा-वांगी, चिंचा इत्यादी पदार्थ टाळावेत असे काही दंडक सांगितलेले आढळतात. तर तुळशी विवाहात तुळशीच्या मुळाशी चिंचा, आवळे ठेवले जातात, मूलतः हा संकेत आहे, या दिवसापासून हे पदार्थ खाण्यास सुरुवात होते. एकूणच तुळशी विवाह हा नव्या ऋतूची बदलाची नांदी घेऊन येतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tulsi vivah 2023 what are the traditions behind tulsi vivah marriage between vishnu and tulasi in hindu culture and mythology svs