Udyogini Scheme : उद्योगिनी ही योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे. महिलांना व्यवसायासाठी कर्ज मिळावं म्हणून ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ८८ प्रकारचे व्यवसाय सुरु करण्यासाठी महिलांना कर्ज उपलब्ध होतं. आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम व्हाव्यात म्हणून ही योजना केंद्र सरकारने आणली आहे. या योजनेत किती कर्ज उपलब्ध होतं आणि अर्ज कसा करायचा? हे आपण जाणून घेऊ.
काय आहे केंद्र सरकारची उद्योगिनी योजना?
उद्योगिनी योजना ( Udyogini Scheme ) ही महिलांना लघु उद्योग करुन आर्थिक स्वावलंबी होता यावं म्हणून केंद्राने आणलेली योजना आहे. ८८ प्रकारचे उद्योग या योजनेच्या अंतर्गत येतात. उद्योगिनी योजनेच्या अंतर्गत महिलांना ३ लाखांपर्यंत कर्ज मिळवता येतं.
केंद्र सरकारचा या योजनेमागचा उद्देश काय आहे?
केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचा एक उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक मदत करणं हा आहे. त्यामुळेच उद्योगिनी योजना ( Udyogini Scheme ) ही योजना आणण्यात आली आहे. ही योजना महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यास मदत करते. सर्वात आधी कर्नाटक सरकारने ही योजना ( Udyogini Scheme ) सुरु केली. त्यानंतर केंद्र सरकारने देशभर ही योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून ही योजना राबवली आहे. या योजनेचा लाभ प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांना होतो, त्यांना या योजनेत कर्ज मिळण्यासाठी प्राधान्य आहे.
उद्योगिनी योजनेची कर्ज मर्यादा किती आहे?
उद्योगिनी योजनेतंर्गत ( Udyogini Scheme ) महिलांना तीन लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं.
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार महिलेचं कौटुंबिक उत्पन्न हे दीड लाख रुपयांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे.
दिव्यांग महिला, विधवा आणि परित्यक्ता यांच्यासाठी उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. या महिलांना व्याजमुक्त कर्ज दिलं जातं.
इतर प्रवर्गातील महिलांना १० ते १२ टक्के व्याजदराने कर्ज दिलं जातं. ज्या बँकेकडून कर्ज दिलं जातं त्या बँकेच्या नियमांनुसार व्याजदर असतो.
या योजनेसाठी १८ वर्षे ते ५५ वर्षे वयोगटातील महिला पात्र आहेत. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी त्यांचा क्रेडिट स्कोअर व्यवस्थित आहे ना? याची खात्री करुन घेतली पाहिजे. महिलांनी आधी कर्ज घेतलं असे आणि त्याची परतफेड केली नसेल तर कर्ज दिलं जाणार नाही असंही केंद्राने स्पष्ट केलं आहे.
हे पण वाचा- काय आहे इस्रोचे ‘मिशन व्हीनस’? इस्रोला शुक्राचा अभ्यास का करायचा आहे? जाणून घ्या या मोहिमेचे उद्दिष्ट
या योजनेतून कर्ज मिळावीत म्हणून कुठली कागदपत्रं सादर करावी लागतात?
अर्जासह दोन पासपोर्ट साइज फोटो
अर्ज करणाऱ्या महिलेचे आधार कार्ड आणि जन्माचा दाखला
दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींनी शिधापत्रिकेची प्रत जोडावी
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
जात पडताळणी प्रमाणपत्र
कर्ज मिळण्यासाठी संपर्क कुणाला करायचा?
उद्योगिनी योजनेच्या अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी महिला जवळच्या बँकेत संपर्क साधू शकतात.
बजाज फायनान्स सारख्या वित्तीय संस्थाही या योजनेच्या अंतर्गत कर्ज देतात.