How to do UPI payment without Internet : डिजिटल युगात UPI द्वारे व्यवहार आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अगदी भाजी खरेदीपासून मोठ्या व्यवहारासाठी आपण सर्वजण कॅशलेस व्यवहार स्वीकारले आहेत. युपीआयला सुरुवात झाल्यापासून भारतात सर्वाधिक लोक ऑनलाइन पेमेंटवर जास्त अवलंबून आहेत. परंतु, हे व्यवहार इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असतात. ऐनवेळेला जर इंटरनेटची सेवा खंडित झाली तर ऑनलाईन पेमेंट करण्यास व्यत्यय येऊ शकतो. यामुळे गैरसोय होऊ शकते. पण तुम्हाला माहितेय का इंटरनेट कनेक्शनशिवायही तुम्ही युपीआय पेमेंट करू शकता.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक नवीन सेवा सुरू केली आहे जी इंटरनेट अॅक्सेसशिवाय UPI पेमेंट करण्याची परवानगी देते. ही सेवा वापरकर्त्यांना अधिकृत USSD कोड, *99# डायल करून ऑफलाइन बँकिंग सेवांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम करते. या नंबरद्वारे, वापरकर्ते इंटरबँक फंड ट्रान्सफर, अकाउंट बॅलन्स तपासणे आणि UPI पिन सेट करणे किंवा बदलणे यासह विविध बँकिंग सुविधा वापरू शकतात.
पेमेंटसाठी USSD कोड कसा वापरायचा?
- तुमच्या बँकेत नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरवरून *९९# डायल करा.
- तुमच्या फोन स्क्रीनवर, प्राप्त झालेला क्रमांक निवडून तुमची पसंतीची भाषा निवडा.
- सुरुवातीला तुम्हाला तुमचा पिन कोड सेट करण्याची आवश्यकता भासेल.
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा *99# नंबर डायल करा.
- आता तुमच्यासमोर ७ पर्याय दिसतील. Send Money, Request Money, Check Banalance, My Profile, Pending Requests, Transactions, UPI PIN असे पर्याय तुमच्यासमोर असतील.
- यापैकी पहिला पर्याय तुम्हाला निवडायचा असेल तर डायलपॅडवर १ नंबर दाबून सेंड बटणावर क्लिक करा.
- पैसे ट्रान्सफर करण्यासाठी, ‘1’ टाइप करा.
- पैसे पाठवण्याची पद्धत निवडा, जसे की मोबाईल नंबर, UPI आयडी, सेव्ह केलेला संपर्क किंवा दुसरा पर्याय.
- जर तुम्ही मोबाईल नंबर पर्याय वापरत असाल, तर प्राप्तकर्त्याचा नंबर एंटर करा.
- पेमेंट रक्कम एंटर करा.
- पर्यायी म्हणून, पेमेंटसाठी एक टिप्पणी जोडा.
- व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुमचा UPI पिन एंटर करा.
- अशा पद्धतीने तुमचा व्यवहार पूर्ण झालेला आहे.
- तुम्हाला आता तुमच्या अकाऊंटमधून डेबिटचा मेसेज येईल आणि समोरच्या व्यक्तीला पैसे क्रेडिट होतील.