UPSC Civil Services : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात एकूण ९३३ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यंदा इशिता किशोरने यूपीएससीमध्ये टॉप केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत आधी प्री एग्झाम असते. त्यानंतर मेन एग्झाम आणि शेवटी मुलाखत असते. या तीन टप्प्यांत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांचीच पुढे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी म्हणून निवड केली जाते. पण या पदांवर काम करणाऱ्या लोकांच्या कामाची किंवा पगाराची अनेकांना माहिती नसते. त्यामुळे आज आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि आयआरएसचे काम काय आणि त्यापैकी सर्वात मोठे पद कोणते याबद्दलची विस्तृत माहिती जाणून घेऊ…
आयएएस आणि आयपीएस या दोन्ही पदांवर काम करणाऱ्या व्यक्तीला काही विशेष अधिकार असतात. त्यांना लोकसेवा अधिकारी असेही म्हणतात. ही दोन्ही पदे खास आहेत. पण त्यावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या पगारातही मोठी तफावत आहे. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या व्यक्तीलाच या पदांवर नियुक्त केले जाते.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)
नागरी सेवा परीक्षेत सर्वोच्च क्रमांक मिळविणाऱ्या उमेदवारांनाच आयएएस म्हणून नियुक्त केले जाते. परंतु बर्याच वेळा टॉप रँक प्राप्त करणार्या उमेदवारांचा कल आयपीएस आणि आयएफएस होण्याकडे असतो. म्हणून आयएएसचे पद खालच्या श्रेणीतील उमेदवारांना उपलब्ध असते. एका आयएएस अधिकाऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्यातील सर्व विभागांची जबाबदारी असते. जिल्हा दंडाधिकारी या नात्याने ते अतिशय शक्तिशाली व्यक्ती असतात. पोलीस खात्याबरोबरच ते इतर अनेक विभागांचे प्रमुखही मानले जातात. कलम १४४ लागू करण्याचा निर्णय, जमाव किंवा कोणत्याही प्रकारचा गोळीबार आदींवर कारवाई करण्याचा निर्णय कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित सर्व बाबींमध्ये जिल्हा दंडाधिकारी देतात.
भारतीय पोलीस सेवा (IPS)
आयएएसप्रमाणे आयपीएस होण्यासाठी उमेदवारांना कठोर परिश्रम करावे लागतात. यासाठीही यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत चांगली रँक मिळवावी लागते. जे चांगली रँक मिळवतात त्यांना आयपीएस अधिकारी बनवले जाते. जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आयपीएस अधिकाऱ्याजवळ हजेरी लावतात, ज्यामध्ये एसपी, डीएसपी यांचा समावेश असतो. जिल्ह्यातील सर्व कामांचा प्रभारी आयपीएस अधिकारी असतो. पोलीस यंत्रणेतील कोणतीही समस्या दिसली की त्यावर तोडगा काढण्याचे काम तो करतो. त्याच्या परिसरात शांतता राखण्याचीही जबाबदारी त्याच्यावर असते. कायदा आणि सुव्यवस्था सुधारणे आणि आपल्या भागातील लोकांचे संरक्षण करणे हीदेखील त्याची जबाबदारी असते.
भारतीय परराष्ट्र सेवा (IFS)
आयएफएस अधिकाऱ्याची व्याप्ती आयएएस अधिकाऱ्यापेक्षा मोठी असते. कारण हे अधिकारी जागतिक व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे काम करतात. या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा थेट परिणाम देशाच्या प्रतिमेवर होतो. आयएफएस अधिकारी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे. कारण त्यांना इतर देशांचे राजदूत, नेते आणि अधिकाऱ्यांशी बोलायचे असते. परदेशात उपस्थित भारतीय लोकांना मदत करण्याचे काम भारतीय दूतावास करते, जे प्रत्यक्षात आयएफएस अधिकाऱ्याचे काम आहे. हे अधिकारी आहेत, जे मुत्सद्दी आणि राजदूत म्हणूनही काम करतात. आयएफएस अधिकाऱ्याचे काम हे दोन्ही देशांमधील चांगले आणि आनंददायी संबंध प्रस्थापित करणे आणि कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर त्या सोडवण्याचे असते.
भारतीय महसूल सेवा (IRS)
आयएएस, आयपीएस, आयएफएसव्यतिरिक्त, नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयआरएस अधिकारीदेखील केले जाऊ शकते. आयआरएस अधिकारी वित्त मंत्रालयातील महसूल विभागांतर्गत काम करतात. आयआरएसचे पददेखील सामान्य पद नाही. आयआरएस अधिकारी कस्टम विभाग आणि आयकर विभागाशी संबंधित आहेत. हे अधिकारी कर धोरण तयार करण्याचा सल्ला देतात. त्यासंबंधित धोरणे आणि नियम बनवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. एवढेच नाही तर आयआरएस अधिकारी आपल्या देशाच्या गुप्तचर संस्थांमध्ये सामील होऊन देशाचे रक्षण करतात.