उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात रविवारी सकाळी हिमकडा कोसळल्याने हिमनद्यांना प्रचंड मोठा पूर आला. यामध्ये १०० ते १५० लोक बेपत्ता झाल्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. लष्कराला सीमाभागाशी जोडणारा पूल, ऋषीगंगा हायड्रोपावर प्रकल्प तसेच अनेकांची घरंही या प्रलयात वाहून गेली आहेत. आपत्ती व्यवस्थापन दल आणि आयटीबीपीकडून सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु असून यामध्ये नक्की किती नुकसानं झालं, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, ज्यामुळे ही आपत्ती ओढवली त्याचं कारण काय आणि ते कसं घडलं याची माहिती जाणून घेऊयात.
हिमनदीला आलेल्या पुराने काय झालं नुकसान?
चामोली पोलिसांच्या माहितीनुसार, हिमकड्याचा कोसळलेला भागाचा राडारोडा हा वेगाने थेट तपोवन भागात आल्याने येथील ऋषीगंगा पावर प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. येथून वाहणाऱ्या अलकनंदा नदीच्या किनारी भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षितस्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हिमनदीच्या सरोवराला पूर येणं म्हणजे काय?
हिमनदीच्या सरोवराला पूर येणं म्हणजे एक असा उद्रेक असतो ज्यामध्ये पाण्याच्या प्रचंड प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणावर हिमनग, दगडगोटे आणि माती वाहून येते. तसेच हिमनदीच्या मार्गात असलेले धरण हे पाणी रोखण्यात अयशस्वी ठरल्यास असा उद्रेक होतो.
हिमनदीचा उद्रेक केव्हा आणि कधी होतो?
- हिमनदीचा उद्रेक होण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत ठरतात. यामध्ये बर्फाची झीज होणे, हिमनदीतील पाण्याचा दबाव वाढत वाढणे, हिमकडा कोसळणे तसेच बर्फामध्ये भूकंप होणे अशा अनेक कारणांमुळे हिमनदीचा उद्रेक होऊ शकतो.
- त्याचबरोबर हिमकडा कोसळून हिमनदीच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे हिमनदीचा उद्रेक होऊ शकतो.
- हिमनद्यांच्या सरोवरांचे प्रमाण वेगवेगळे असू शकते ही सरोवरे कोट्यावधी घनमीटर पाणी साठवतात. बर्फ किंवा हिमनदीत गाळ नसल्यामुळे काही मिनिटे, तास किंवा काही दिवस या पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने बाहेर पडत असतो.
- इतर अनेक कारणांमुळे हिमनदीचा उद्रेक होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, हिमवृष्टीच्या सरोवराच्या उद्रेकाची थेट कारणे म्हणजे मुसळधार पाऊस, हिमवृष्टी, भूकंप, धबधब्यांप्रमाणे कोसळण्याची प्रक्रिया, दीर्घावधी धरणाचे विसर्ग आणि तलावामध्ये जलद उतार ही असतात.