Voter List Checking Procedure : लोकसभा निवडणुकीत झालेल्या जोरदार राजकीय संघर्षानंतर संपूर्ण राज्याला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सध्या निवडणुकांचे वातावरण असून, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. तुमचे वय १८ वर्षे किंवा १८ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही मतदानासाठी सज्ज असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, आपले मतदान केंद्र नक्की कोठे आहे याचा शोध आपण ऐन मतदानाच्या दिवशी घेतो. त्यामुळे काही वेळा अडचणींचा सामना करावा लागतो; तर अनेकदा मतदान केंद्र माहीत नसल्याने मनस्तापही सहन करावा लागतो. हे लक्षात घ्या की, तुमच्याकडे मतदान कार्ड असेल आणि मतदार यादीत तुमचं नाव नसेल, तर तुम्हाला मतदान करता येणार नाही. मतदार यादीत नाव असल्याशिवाय मतदानाचा हक्क बजावता येत नाही. त्यामुळे सर्वप्रथम मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासून घ्या. मतदानापूर्वी ऑनलाइन पद्धतीने आपले नाव मतदार यादीत शोधणे अगदी सहज शक्य आहे. चला तर मग, शोधूया आपले नाव…

(हे ही वाचा : लग्नानंतर मतदान ओळखपत्र नवीन पत्त्यावर ट्रान्सफर कसे करायचे माहितीये का? अवघ्या ७ सोप्या स्टेप्समध्ये; जाणून घ्या प्रक्रिया )

मतदान यादीत तुमचे नाव कसे तपासायचे?

मतदान यादीत आपले नाव तपासणे खूप सोपे आहे. तुम्ही काही मिनिटांत ऑनलाइन प्रकियेद्वारे मतदान यादीत तुमचे नाव तपासू शकता.

  • तुम्हाला सर्वांत आधी तुम्हाला electoralsearch.eci.gov.in ला भेट द्यावी लागेल.
  • या लिंकवर जाताच तुम्हाला एका पेजवर तुमचे नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, जन्मतारीख, वर्ष, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ यांच्या माहितीची नोंद करावी लागेल.
  • ही सर्व माहिती भरल्यानंतर ‘कॅप्चा’ कोड टाकावा लागेल आणि मग ती संबंधित यादी उघडेल.

आणखी एक मार्ग आहे; ज्याद्वारे तुम्ही electoralsearch.eci.gov.in वर EPIC किंवा मतदार आयडी क्रमांकाद्वारे यादीतील तुमचे नाव तपासू शकता.

EPIC क्रमांक आणि राज्य निवडून, तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तुम्हाला कळेल. मतदार यादीतील नाव शोधण्याचे दोन्ही पर्याय तुम्ही electoralsearch.eci.gov.in ला भेट दिल्यावर सर्वांत वर दिसतील.

या प्रकारे तुम्ही विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान यादीत तुमचे नाव तपासू शकता.

मतदार यादीत नाव कसे नोंदवावे?

मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी तुम्हाला अर्ज क्रमांक ६ भरावा लागेल, जो इतर फॉर्मसह ECI वेबसाइटवर उपलब्ध आहे. तुमचा मोबाईल फोन नंबर किंवा ईमेल पत्ता वापरून साइन अप केल्यानंतर तुम्ही हा फॉर्म ऑनलाइन भरू शकता.

नाव, लिंग, पत्ता, जन्मतारीख आणि नातेवाईक (वडील, आई, पती किंवा पत्नी) यांसारखे तपशील भरण्याव्यतिरिक्त अर्जदाराला जन्मतारीख सिद्ध करण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका कागदपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत द्यावी लागेल.

सक्षम स्थानिक संस्था/महानगरपालिका प्राधिकरणाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र दस्तऐवज म्हणून जोडता येईल.

अशाप्रकारे तुम्हाला मतदार यादीत तुमचे नाव नोंदविता येईल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhansabha election 2024 how to check your name in the voters list know in detail pdb