ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेपर्यंत मतदानाच्याआधी मतदारांना निळी शाई लावली जाते. ही शाई अनेक दिवस बोटावर तशीच राहते. कारण, कुठल्याही मतदाराला दुसऱ्यांदा मतदान करता येऊ नये म्हणून. पण, ही शाई कुठं बनवली जाते? तिचा इतिहास काय? याबद्दल एक रंजक गोष्ट आहे. ती जाणून घेणार आहोत…
देशात १९५१-५२ साली पहिल्यांदा निवडणुका झाल्या होत्या. यावेळी अनेकांनी दोनदा मतदान केल्याचा प्रकार समोर आला. निवडणूक आयोगाकडे याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यातून निवडणूक आयोगाने मार्ग काढण्याचा विचार केला. तेव्हा, मतदाराच्या बोटावर शाई लावण्याची संकल्पना समोर आली.
पण, ही शाई पाणी किंवा कुठल्याही रसायनाने पुसली जायला नको होती. यानंतर निवडणूक आयोगानं नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीशी ( एनपीएल ) संपर्क साधला. ‘एनपीएल’ने म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड ( एमपीव्हीएल ) या कंपनीला ही शाई बनवण्याची ऑर्डर दिली.
स्वातंत्र्यानंतर कर्नाटक सरकारच्या ताब्यात कारखाना गेला
आता ‘एमपीव्हीएल’ ही कंपनी आहे, म्हैसूर येथील वाडियार या राजघराण्याची… वाडियार राजघराण्याची म्हैसूरवर सत्ता होती. स्वातंत्र्यापूर्वी त्याचे शासक महाराज कृष्णराज वाडियार होते. जगातील सर्वात श्रीमंत घराण्यापैकी एक म्हणजे वाडियार घराणे… यांची सोन्याची खाणी होती. १९३७ साली महाराज कृष्णराज वाडियार यांनी म्हैसूर लैक आणि पेंट्स नावाच्या कारखान्याची सुरूवात केली. या कारखान्यात रंग आणि वार्निश बनवण्याचं काम केलं जातं होतं.
स्वातंत्र्यानंतर हा कारखाना कर्नाटक सरकारच्या ताब्यात गेला. १९८९ साली या कारखान्याचं नाव ‘म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड’ ठेवण्यात आलं. आज याच कारखान्यात मतदानासाठी वापरण्यात आलेली शाई बनवली जाते.
हेही वाचा : रेल्वेतील स्लीपर, एसी कोचबद्दल आपण ऐकलं असेल पण हे ‘एम’ कोच काय आहे?
१५ दिवस शाई पुसली जात नाही…
१९६२ साली झालेल्या निवडणुकीत ‘एमपीव्हीएल’ने तयार केलेल्या शाईचा पहिल्यांदा वापर करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत सर्व निवडणुकांत हीच शाई वापरण्यात येते. किमान १५ दिवस, तरी ही शाई पुसली जाऊ शकत नाही.
…म्हणून शाई लगेच वाळते
‘एनपीएल’ किंवा ‘एमपीव्हीएल’ने शाई बनवण्याची पद्धत कधीच सार्वजनिक केली नाही. कारण, याचं गुपित सार्वजनिक केलं, तर लोकांना शाई पुसण्याचा मार्ग सापडेल आणि यातून हेतू साध्य होणार नाही. तज्ज्ञांच्या मते, या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट मिसळलं जातं. ज्यामुळे शाई प्रकाशसंवेदनशील ( फोटोसेंसिटिव नेचर ) स्वरूपाची बनते. त्यामुळे शाई लगेच वाळली जाते.
हेही वाचा : ‘मसाला’ शब्दाचं मूळ कुठल्या भाषेत आहे? भाजी, लोणचं, मिसळ यातल्या घटकाशी याचा संबंध आहे का?
२८ देशांमध्ये शाई पुरवली जाते
‘एमपीव्हीएल’ने दिलेल्या माहितीनुसार, २८ देशांमध्ये ही शाई पुरवली जाते. त्यात दक्षिण आफ्रिका, कॅनडा, मलेशिया, मालदीव, कंबेडिया, अफगाणिस्तान, तुर्की, नायजेरिया, नेपाळ, घाना, पापुआ न्यू गिनी, बुर्किना, बुरुंडी, टोगो आणि सिएरा लियोन या देशांचा समावेश आहे. सध्या कंपनीच्या संचालकपदी मंत्री एम. बी पाटील आहे.