पाणी हा प्रत्येकाच्या जीवनाचा आधार आहे. पाण्याशिवाय मनुष्य जास्त दिवस जगू शकत नाही. कारण तहान भागवण्यापासून आपली अनेक दैनंदिन महत्त्वाची कामं ही पाण्यावर अवलंबून असतात. पण ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी असते तेथील लोकांना पाण्याची कसलीच किंमत नसते. तेथील लोक सर्रास मोठ्याप्रमाणात पाणी वाया घालवतात. पण तुम्ही कधी असा विचार तरी करु शकता का की, जर पाणी मोजून, मापून दिले तर काय होईल. होय, जगातील एका देशात लोकांना पिण्यासाठी पाणी मोजून मापून दिले जात आहे. जिथे पिण्याच्या पाण्याचा कोटा पद्धत लागू करण्यात आली आहे. यामुळे लोकांना पिण्यासाठी मर्यादित पाणीच उपलब्ध करुन दिले जाणार आहे. ( Rules For Water Use)
ट्युनिशियामध्ये शेतीसाठी पाण्याचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय लोकांना पिण्यासाठी मर्यादित प्रमाणातचं पाणी मिळणार असून पुढील सहा महिने ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत ट्युनिशियातील लोकांना पाण्याचे पाणी हे मोजून आणि मापून मिळणार आहे. टयुनिशियामधील भीषण दुष्काळामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. हवामानातील बदल आणि जमिनीच्या आत असलेल्या पाण्याच्या अतिवापरामुळे दुष्काळाची स्थिती ओढवल्याचे सांगितले जाते.
ट्युनिशिया कृषी मंत्रालयाचे अधिकारी हमादी हबीब यांनी सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून देशात भीषण दुष्काळ आहे. तसेच १०० कोटी घनमीटर पाण्याची क्षमता असलेल्या धरणांमध्ये आता केवळ ३० टक्के पाणी आहे.
नियम मोडणाऱ्यांना होणार तुरुंगवास
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता कृषी मंत्रालयाने पुढील ६ महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे रेशनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गाड्या धुणे, झाडांना पाणी देणे आणि रस्ते साफ करण्यासारख्या कामांसाठी पाणी वापरण्यास बंदी आहे. जर कोणत्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले तर त्या व्यक्तीस जेल, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ट्युनिशियाच्या जल कायद्यानुसार, नियम मोडणाऱ्या व्यक्तीला सहा दिवस ते सहा महिने तुरुंगवास होऊ शकतो.