Wearing Leggings on Flight can be Dangerous: विमानात काय घालायचे हे ठरवणे एक कठीण काम असू शकते. तुम्हाला स्टायलिश दिसायचे असले तरी तुम्हाला नेहमीच कंफरटेबलही राहायचे असते. बहुतेक लोक विमानात स्पोर्ट्स वेअर घालूनच प्रवास करताना दिसतात; तर मुली बऱ्याचदा घट्ट आणि स्ट्रेची लेगिंग्ज – घालणे पसंत करतात, कारण त्यांना ती खूप कंफरटेबल वाटते. पण, तुम्हाला माहीत आहे का की विमान प्रवासात लेगिंग्ज घालणे खरोखर धोकादायक असू शकते?
लेगिंग्ज आणि विमान प्रवासाच्या घातक संयोजनामुळे भूतकाळात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. २०१७ मध्ये युनायटेड एअरलाइन्सने दोन किशोरवयीन मुलींना त्यांच्या लेगिंग्ज अयोग्य असल्याने विमानात चढण्यास मनाई केली होती आणि त्यामुळे त्यांना टीकाही सहन करावी लागली होती.
२०२२ मध्ये विमान आपत्तींबद्दल पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका क्रिस्टीन नेग्रोनी यांनी ‘द सन’ला सांगितले की, लोकांनी लेगिंग्ज घालू नयेत, कारण त्या सिंथेटिक मटेरियलपासून बनलेल्या असतात, ज्यामुळे विमानात आग लागल्यास तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो.
लेखिका क्रिस्टीन नेग्रोनी म्हणाल्या, “आता विमानात प्रत्येक जण योगा पँट घालतो, परंतु मी सर्व आर्टिफिशियल फायबर्स टाळते, कारण आग लागल्यास ते जळण्याची आणि तुमच्यावर चिकटण्याची शक्यता जास्त असते.” विमान अपघात इतके सामान्य नसले तरी स्वतःला सुरक्षित ठेवणे नेहमीच महत्त्वाचे असते. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की योगा पॅंट ही सिंथेटिक मटेरियलपासून बनलेली असते, ज्यामध्ये लाइक्रा किंवा स्पॅन्डेक्सचा समावेश आहे. नॅचरल फायबर्सदेखील आग पकडू शकतात, परंतु सिंथेटिक पदार्थ वितळतात, ज्यामुळे फॅब्रिक तुमच्या त्वचेला चिकटते. तसेच आपत्कालीन परिस्थितीत घट्ट बसणारे लेगिंग्ज काढणे कठीण होईल.
नॅचरल फायबर्सपासून बनवलेले कपडे घालणे केव्हाही चांगले असते. तसेच जर तुम्हाला सीटवरून चढावे लागले तर तुमच्या हालचाल करण्याच्या क्षमतेवर मर्यादा घालणारे कपडे घालणे टाळा.
दुसरे कारण म्हणजे आपण घालतो ते कपडे आपल्या रक्ताभिसरणावर परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ, घट्ट कपडे घालण्याची अजिबात शिफारस केलेली नाही. लेगिंग्ज आणि इतर घट्ट कपडे घातल्याने पायांमध्ये रक्तप्रवाह कमी होऊ शकतो; यामुळे सूज, वेदना येऊ शकतात.