सध्या देशातल्या करोनाच्या प्रादुर्भावासोबतच फेक न्यूजचा प्रादुर्भावही वाढतो आहे. अनेक दिशाभूल करणारे मेसेजेस सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होतात आणि समाजात गैरसमज पसरवण्यास कारणीभूत ठरतात. असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या मेसेजमागचं सत्य आता भारत सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेकने समोर आणलं आहे.

काय सांगितलं आहे या मेसेजमधून?
या मेसेजमध्ये असं सांगण्यात आलं आहे की मास्क घालण्याने शरीरातल्या ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो आणि शरीरातलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं.

हा मेसेज असा आहे-
माणसाला दिवसभरात ५५० लीटर ऑक्सिजनची गरज असते जी नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या ऑक्सिजनच्या माध्यमातून भागवली जाते. मात्र मास्कच्या अडथळ्यामुळे आपण केवळ २५० ते ३०० लीटर ऑक्सिजन घेऊ शकतो. त्यामुळे शरीरातला कार्बनडायऑक्साईड जो बाहेर पडतो तो पुन्हा फुफ्फुसांत जात आहे. गेल्या वर्षी मास्कवरची बंधनं क़डक नव्हती पण आता ती बंधनं जास्तच कडक झाली आहेत. त्यामुळे लोक कार्बनडायऑक्साईडमुळे मरत आहेत. हे विषाणू मास्कच्या छिद्रांमधून आत शिरुच शकतात. आपण वास घेऊच शकतो, अशा आशयाचा हिंदीमधला हा मेसेज आहे.
पण सावधान, ह्या मेसेजवर तुम्ही विश्वास ठेवत असाल किंवा हा मेसेज पुढे पाठवत असाल तर तुम्ही फार मोठी चूक करत आहात. कारण ह्या मेसेजमधली सर्व माहिती चुकीची आहे.

फॅक्ट चेक काय सांगतं?
हा मेसेज खोटा असल्याचं भारत सरकारकडून सांगण्यात आलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यवस्थित मास्क घालणं, सुरक्षित अंतर पाळणं आणि हात वारंवार धुणं हे उपाय परिणामकारक असल्याचं पीआयबीने स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे असा कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना किंवा अशा मेसेजवर विश्वास ठेवताना सजग राहणं फार गरजेचं आहे. कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नका. करोनाचा प्रसार रोखण्यासोबतच खोट्या मेसेजेसचा, दिशाभूल कऱणाऱ्या माहितीचा प्रसारही थांबवा.

Story img Loader