लग्न म्हणजे वधू आणि वर यांच्या आयुष्याची एकत्रित सुरुवात, कुटुंबात असणारी लगबग, खरेदी आणि बरंच काही. लग्न सोहळ्यापूर्वी अनेक कार्यक्रम उत्साहात करण्यात येतात आणि या प्रत्येक कार्यक्रमाचे एक खास महत्वसुद्धा असते. साखरपुडा, हळद, मेहेंदी, संगीत आदी अनेक कार्यक्रमानंतर वधू आणि वर बोहल्यावर चढतात. ‘बोहल्यावर चढणार’ असं आपण सहज म्हणून जातो. पण, तुम्हाला माहीत आहे का नेमकं बोहलं म्हणजे काय? हा शब्द नेमका कुठून आला? या शब्दाचा अर्थ काय? तर आज हे आपण या लेखातून जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी बोहलं या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. लेखक सदानंद कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार मातीचा फूटभर उंचीचा कट्टा म्हणजेच ‘बोहले.’ पूर्वी अश्या कट्ट्यावरच लग्न लावली जायची. तसेच या मातीच्या कट्ट्याखाली नांगरफाळ ठेवला जायचा. बोहलं हे शेतीचं तर नांगर हे पुरुषत्वाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. नांगराला संस्कृतात शब्द आहे ‘लाङ् गलम’… म्हणजेच भू आणि हल. जमीन आणि नांगराचं प्रतीक म्हणजे भूहलं… आणि याच शब्दाचं पुढे झालं ते बोहलं…

हेही वाचा…‘शाब्बास’ या शब्दाचा मूळ अर्थ काय? मराठी भाषेत कुठून आला हा शब्द? जाणून घ्या रंजक गोष्ट 

पूर्वी जमिनीत पहिल्यांदा नांगर चालवला की, त्याचा फाळ जमिनीत रात्रभर तसाच ठेवला जायचा; ऋग्वेदातही याचा उल्लेख आहे. तसेच भूमीप्रमाणेच स्त्रीसुद्धा सर्जनशील आहे, म्हणून मग भूमीचं प्रतीक म्हणून बोहलं हा शब्द आला. भूमीप्रमाणे स्त्रीसुद्धा सुफल व्हावी म्हणून पुढे लोकांनी लाकडी उंचवट्यावर लग्न लावण्यास सुरुवात केली. तरीही एका बाजूला मातीचं छोटं बोहलं करून ठेवलं जायचं. पण, आता जसजसा काळ पुढे जातोय, लग्नसोहळे मंडपात होऊ लागले आहेत. तसं हे सुद्धा हळूहळू कमी होऊ लागलं आहे. आता उरलाय तो केवळ ‘बोहले’ हा शब्द. आता मंडपाच्या फळकुटाच्या कट्ट्यालाच बोहलं असं म्हणतात.

हिंदू धर्मात लग्नातील प्रत्येक विधीला एक शास्त्रीय महत्व आहे. पूर्वी गावाच्या अंगणात विवाह सोहळा संपन्न व्हायचे, पण आता काळानुसार वेळेची कमी, जागेची कमतरता या कारणाने बहुतेक विवाह कधी कधी एका दिवसात सार्वजनिक मंगल कार्यालयात (हॉल) पार पाडले जातात. आताच्या तरुण मंडळींना डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग, फोटोशूटची क्रेझ आहे. असे असले तरीही हौसेने विधीवत लग्न सोहळा करण्याकडेही या पिढीचा कल तितकाच आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wedding season know real meaning of bohal marathi word of indian marriage rituals asp
Show comments