देशाच्या विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तर भारतात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे देशाची राजधानी दिल्लीतील अनेक भाग पाण्याखाली गेला होता. तर अनेक ठिकाणच्या गाड्या पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या पावसाचा देशासह महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तर अजूनही संपूर्ण किनारपट्टीसह मुंबई आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे.
राज्यात पडणाऱ्या पावसामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नुकतेच मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडीवर रात्रीच्या सुमारास दरड कोसळली होती. तर हवामान विभागाने पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे. पुणे, पालघर, ठाणे, रायगडला शुक्रवारी ‘रेड ॲलर्ट’ देण्यात आला असून, बहुतांश ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील तयार झालेला कमी दाबाचे पट्टा दक्षिणेकडे झुकला आहे. उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओदिशा किनारपट्टी दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुणे, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना रेड ॲलर्ट दिला असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. मुंबई, रत्नागिरी, साताऱ्याला ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिकसह विदर्भाला यलो ॲलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा- मुंबईसह ठाण्यात पुढील चार तास मुसळधार पावसाची शक्यता
अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. अशावेळी प्रत्येकाला एक प्रश्न पडतोच. तो म्हणजो ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय ? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो ? जाणून नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सतर्कतेचा इशारा देण्यासाठी जारी केल्या जाणाऱ्या या अलर्ट्सचा नेमका अर्थ काय?
ग्रीन अलर्ट –
पावसाळ्यात अनेक भागांमध्ये ग्रीन अलर्ट दिला जातो. याचा अर्थ या शहरांमध्ये पावसाची परीस्थिती सामान्य असून यावेळी कुठलेही निर्बंध घालण्याची गरज नाही.
यलो अलर्ट –
हवामान खात्याकडून अनेक शहरांना यलोअलर्ट दिला जातो. याचा अर्थ पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सुचना जारी करण्यात येते. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो.
हेही पाहा- सावधान! पावसाळ्यात दुचाकी चालवताय? २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, अपघाताचा ‘हा’ व्हिडीओ एकदा बघाच
ऑरेंज अलर्ट –
कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.
रेड अलर्ट –
नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्टला जारी करण्यात येतो. जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज असतो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याता असते.