What Is Tariff: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे दुसऱ्यांदा हाती घेतल्यानंतर अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर टॅरिफ (आयात शुल्क) आकारण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. दरम्यान ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे कॅनडा, मेक्सिको आणि चीनमध्येच नव्हे तर जगभरात टॅरिफबाबत चर्चा सुरू आहे. सध्या अनेकजण या टॅरिफबाबत चर्चा करताना आजूबाजूला पाहायला मिळत आहेत. चला, मग जाणून घेऊया टॅरिफ म्हणजे काय असते आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचा का वापर करत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडा येथून होणाऱ्या आयातीवर नवीन टॅरिफ (आयात शुल्क) लादले आहे. तर, चिनी वस्तूंवर अलीकडेच लावलेला कर दुप्पट केला आहे. डोनाल्ड ट्रम्प या टॅरिफकडे आयातीवरील सीमा कर, अमेरिकेच्या उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी आणि व्यापार असमतोल साधण्यासाठी हा एक मार्ग असल्याचे स्पष्टीकरण देतात. यानंतर ट्रम्प यांना प्रत्युत्तर म्हणून कॅनडा आणि चीनने अमेरिकन वस्तूंवरही टॅरिफ लादले आहे. यामुळे आता जागतिक व्यापार युद्ध आणि वाढत्या महागाईची भीती निर्माण झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारत आणि इतर देशांना अमेरिकेवर लादलेल्या टॅरिफवर टीका करत, २ एप्रिलपासून रेसिप्रोकल टॅरिफ (परस्पर कर) लागू करणार असल्याची घोषणा केली आहे. इतर देश अमेरिकेवर जितके टॅरिफ आकारतात तितकेच टॅरिफ अमेरिकाही इतर देशांवर आकारणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
टॅरिफ म्हणजे काय?
टॅरिफ म्हणजे इतर देशांमधून आयात केलेल्या वस्तूंवर आकारला जाणारा कर. परदेशी वस्तू देशात आणणाऱ्या कंपन्या सरकारकडे त्याचा कर भरतात. सामान्यतः, टॅरिफ म्हणजे उत्पादनाच्या मूल्याच्या टक्केवारीच असते. चिनी वस्तूंवर २०% टॅरिफ लावल्याने १० डॉलर्स किमतीच्या उत्पादनावर अतिरिक्त २ डॉलर्स शुल्क आकारले जाईल. कंपन्या टॅरिफचा काही किंवा सर्व खर्च ग्राहकांवर टाकण्याचा पर्याय निवडू शकतात.
अमेरिकेतील ३२८ बंदरांवर गोळा केले जाणारे सीमाशुल्क हे वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळे असते. उदाहरणार्थ, प्रवासी कारवर हे टॅरिफ सामान्यतः २.५% तर गोल्फ शूजवर ६% असते. असे द असोसिएटेड प्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.
तसेच, अमेरिकेशी व्यापार करार असलेल्या देशांसाठी, विशेषतः कॅनडा आणि मेक्सिको सारख्या शेजारी देशांसाठी, सामान्यपणे टॅरिफ दर दर असतात. अमेरिका-मेक्सिको-कॅनडा व्यापार करारामुळे या तीन देशांमध्ये अनेक वस्तूंना टॅरिफमुक्त वाहतूक करण्याची परवानगी आहे. दरम्यान २०२४ मध्ये अमेरिकेत होणाऱ्या आयातीपैकी ४०% पेक्षा जास्त आयात चीन, मेक्सिको आणि कॅनडामधील वस्तूंची होती.
ट्रम्प का लादत आहेत टॅरिफ?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक योजनांमध्ये टॅरिफ हा एक महत्त्वाचा घटक आहे. ते म्हणतात की, टॅरिफमुळे अमेरिकन उत्पादन वाढेल आणि नोकऱ्यांचे संरक्षण होईल, तसेच कर महसूल वाढेल आणि अर्थव्यवस्था भक्कम होईल.
नवीन टॅरिफच्या योजनांची घोषणा करताना, व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले होते की, “बेकायदेशीर स्थलांतर थांबवण्याच्या आणि विषारी फेंटानिल आणि इतर औषधे आपल्या देशात येण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष धाडसी कारवाई करत आहेत”.
ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, ही रसायने चीनमधून येतात, तर मेक्सिकन टोळ्या बेकायदेशीरपणे त्याचा पुरवठा करतात. तर कॅनडामध्ये फेंटानिलच्या प्रयोगशाळा आहेत. दरम्यान अमेरिकेत फेंटानिलच्या अतिसेवनामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो.