Five Mammals That Lay Eggs: मनुष्याव्यतिरिक्त निसर्गातील काही सस्तन प्राणी आपल्या बाळांना जन्म देतात; पण सस्तन प्राण्यांचा असा एक छोटा व दुर्मीळ गट आहे, जो अंडी घालतो. या विशेष प्राण्यांना मोनोट्रेम्स म्हणतात आणि ते जगातील सर्वांत अद्वितीय प्राण्यांपैकी आहेत. पण, हे प्राणी नेमके कोणते हे आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेऊ…
अंडी घालणारे प्राणी
प्लॅटिपस
प्लॅटिपस हा जगातील सर्वांत असामान्य प्राण्यांपैकी एक आहे. पूर्व ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवासी असलेला प्लॅटिपस अंडी घालतो. परंतु, ती अंडी बाहेर येईपर्यंत मादी ती अंडी सुमारे १० दिवस उबदार ठेवते. या प्राण्याची रचना पाहिली तर, चोच अन् जाळीदार पाय बदकासारखे आणि शेपटी बीव्हरसारखी असल्यामुळे तो वेगवेगळ्या प्राण्यांच्या मिश्रणासारखा दिसतो.
लहान चोचीचा एकिडना
लहान चोचीचा एकिडना, ज्याला काटेरी अँटिटरदेखील म्हणतात. हा आणखी एक अंडी देणारा सस्तन प्राणी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा हा लहान आणि काटेरी प्राणी प्रामुख्याने मुंग्या आणि वाळवी खातो. तो आपले भक्ष्य पकडण्यासाठी त्याच्या लांब व चिकट जिभेचा वापर करतो. मादी एकिडना फक्त एक अंडे घालते आणि ते तिच्या पोटावर त्वचेच्या थैलीसारख्या घडीत ठेवते.
सर डेव्हिडचा लांब चोचीचा एकिडना
सर डेव्हिडचा लांब चोचीचा एकिडना हा न्यू गिनीच्या दुर्गम सायक्लोप्स पर्वतांमध्ये राहणारा एकिडना प्रजातींपैकी एक दुर्मीळ प्राणी आहे. हा प्राणी पहिल्यांदा १९६१ मध्ये शोधला गेला होता. इतर एकिडनांप्रमाणे त्याचे नाक लांब, अरुंद असते. तोदेखील अंडी घालतो आणि अंडी उबवल्यानंतर बाळ एका थैलीत राहते.
पश्चिमेकडील लांब चोचीचा एकिडना
पश्चिमेकडील लांब चोचीचा एकिडना न्यू गिनीच्या दुर्गम फोजा पर्वतांमध्ये आढळणारा हा प्राणी सर्वांत कमी अभ्यासल्या गेलेल्या मोनोट्रेम्सपैकी एक आहे. हा दुर्मीळ सस्तन प्राणी पृथ्वीवरील सर्वांत वेगळ्या आणि अनपेक्षित प्रदेशांमध्ये एकांतात राहतो. इतर एकिडनांप्रमाणे तोही अंडी घालतो.
पूर्वेकडील लांब चोचीचा एकिडना
पूर्वेकडील लांब चोचीचा एकिडना न्यू गिनीच्या जंगलात राहतो आणि त्याच्या सभोवतालचा परिसर त्याला अनुकूल आहे. त्याच्या लांब नाकाद्वारे तो त्याचे मुख्य अन्न असलेले किडे शोधण्यासाठी माती खोदतो. इतर मोनोट्रेम्सप्रमाणे तोही अंडी घालतो. सध्या या प्राण्याच्या संख्येत घट होत आहे आणि ही प्रजाती त्याच्या पूर्वीच्या श्रेणीतील काही भागांमध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.