उत्तर प्रदेश सरकारपाठोपाठ आता हरयाणा सरकारने देखील ‘तान्हाजी-द अनसंग वॉरिअर’ला टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला. मात्र महाराष्ट्रामध्ये अद्याप ‘तान्हाजी’ चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलेला नाही. मात्र चित्रपट टॅक्स फ्री होतो म्हणजे नक्की काय होतं? कोणते चित्रपट टॅक्स फ्री होतात? चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आल्यावर त्याचा तिकीटाच्या दरांवर परिणाम होतो का? टॅक्स फ्री म्हणजे नक्की काय? अशा अनेक प्रश्न सामान्य प्रेक्षकांना पडतात. याच प्रश्नांची उत्तरं देणारा हा लेख…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपट टॅक्स फ्री होतो म्हणजे नक्की काय होतं?

एखादा चित्रपट टॅक्स फ्री होतो म्हणजे त्या चित्रपटाला लागणारा मनोरंजन कर सरकारकडून आकारला जात नाही. मनोरंजन कर हा उपकर किंवा सेवा कराप्रमाणे असतो. चित्रपट टॅक्स फ्री झाल्यानंतर हाच कर सरकारकडून माफ केला जातो. सामान्यपणे चित्रपट प्रदर्शित करणारे चित्रपटगृहाचे मालक आणि निर्माते हा कर प्रेक्षकांकडून तिकीटांच्या दरांमध्येच समाविष्ट करुन गोळा करतात आणि तो सरकारला देतात.

चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आल्यावर त्याचा तिकीटाच्या दरांवर परिणाम होतो का?

आता सामान्यपणे पडणार पहिला प्रश्न म्हणजे चित्रपट टॅक्स फ्री झाल्यावर तिकीटांचे दर कमी होतात का? तर याचे उत्तर नाही असे आहे. उदाहरणार्थ मुंबईमध्ये एखाद्या चित्रपटाचे तिकीट मनोरंजन कराची रक्कम पकडून १२० रुपये असेल तर त्यामधील ११ रुपये हे चित्रपटगृहाच्या मालकांना सरकारला द्यावे लागतात. पण चित्रपट टॅक्स फ्री झाल्यास हा कर द्यावा लागत नाही.

फायदा कोणाला?

सामान्यपणे चित्रपटावरील मनोरंजन कर रद्द झाल्यानंतर त्याचा फायदा चित्रपटगृहांच्या मलकांना किंवा निर्मात्यांना होतो. अर्थात तिकीटाचे दर कमी करुन हा फायदा थेट ग्राहकांना म्हणजेच प्रेक्षकांना देता येतो. मात्र आपल्याकडे चित्रपटगृहांचे मालक शक्यतो असं करत नाही. त्यामुळेच चित्रपट करमुक्त झाल्यावर तिकीटाचे दर कमी न होता त्याचा फायदा प्रेक्षकांना होत नाही.

कोणते चित्रपट टॅक्स फ्री होतात?

प्रत्येक राज्याकडून चित्रपटावर मनोरंजन कर आकारला जातो. मात्र चित्रपटाचा विषय काय आहे यावर तो चित्रपट टॅक्स फ्री करायचा की नाही हे ठरते. मनोरंजन कर हा राज्य सरकार गोळा करते म्हणून चित्रपट टॅक्स फ्री करावा की नाही हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार हा राज्य सरकारकडे असतो. चित्रपट टॅक्स फ्री कोणत्या आधारावर करायचा याचे कोणतेही नियम ठरलेले नाहीत. चित्रपटामधून कोणता आणि काय संदेश दिला जात आहे यावरुन तो जास्तीत जास्त लोकांनी पहावा म्हणून तो टॅक्स फ्री केला जातो.

मग चित्रपट टॅक्स फ्री करुन फायदा काय?

आता वरील सगळी माहिती वाचल्यावर जर प्रेक्षकांना चित्रपट टॅक्स फ्री केल्याचा फायदा होत नसेल तर ते टॅक्स फ्री करण्याचा फायदा काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर चित्रपटाच्या तिकिटांचे दर हे सरकारकडून ठरवले जात नाहीत. बाजारामधील घटक (मागणी आणि पुरवठा) तिकिटांचे दर ठरवण्यास कारणीभूत ठरतात. चित्रपट टॅक्स फ्री झाला तरी चित्रपट वितरक, निर्माते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चित्रपटगृहांचे मालक तिकिटांच्या किंमती ठरवतात. चित्रपट टॅक्स फ्री झाल्याने त्यामुळे निर्मात्यांचा नफा वाढतो. निर्मात्यांनी अशाप्रकारचे चित्रपट पुन्हा बनवावेत या उद्देशाने चित्रपट टॅक्स फ्री केले जातात असं म्हणता येईल.

कोणते चित्रपट झाले आहेत टॅक्स फ्री

हिंदी मिडियम (२०१७) – दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात

सचिन: अ बिलियन ड्रिम्स (२०१७) – महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड, केरळ

सरबजीत (२०१६) – उत्तर प्रदेश

दंगल (२०१६) – दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश

निरजा (२०१६) – दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र

एअरलिफ्ट (२०१६) – उत्तर प्रदेश, बिहार

मांजी: द माऊंटन मॅन (२०१५) – बिहार, उत्तराखंड

बाजीराव मस्तानी (२०१५) – उत्तर प्रदेश

मेरी कोम (२०१४) – उत्तर प्रदेश, आसाम, महाराष्ट्र

टॉयलेट: एक प्रेम कथा (२०१७) – उत्तर प्रदेश

सुपर ३० (२०१९) – बिहार

तान्हाजी-द अनसंग वॉरिअर (२०२०) – उत्तर प्रदेश, हरियाणा

छपाक (२०२०) – राजस्थान

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What does it mean for a film to be declared tax free does it affect movie ticket price scsg