मराठी भाषा म्हणजे मोठा विलक्षण प्रकार आहे. तसं तर भाषा म्हणजेच एक विलक्षण प्रकार आहे. कारण आपण उच्चारत असलेला प्रत्येक शब्द हा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्या अर्थाला येऊन पोहोचलेला असतो. मनुष्यप्राण्यानं संवाद करण्याची सुरुवात हावभाव, मग त्याला जोड वेगवेगळ्या आवाजांची आणि त्यानंतर हळूहळू या दोन्ही गोष्टींनी मिळून अवतरलेल्या शब्दांपर्यंत हा ‘संवादप्रवास’ येऊन पोहोचला. यानंतरही त्यात वेगवेगळ्या लिपी आणि चिन्हांद्वारे नवनवे प्रयोग होतच राहिले. पण शब्द हा संवादाचा मूलभूत आधार राहिला. त्यामुळे आज आपण वापरत असलेल्या असंख्य शब्द, म्हणी, वाक्प्रचारांचाही जन्म अशाच एखाद्या क्रियेशी निगडित अर्थातूनच झालेले असतात. असाच एक वाक्प्रचार म्हणजे ‘सूप वाजलं’!
कुठे वापरला जातो हा वाक्प्रचार?
आपण बऱ्याचदा ‘सूप वाजलं’ हा वाक्प्रचार ऐकतो. नुकतंच राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. यावेळी बातम्यांच्या मथळ्यामध्ये किंवा माहितीमध्ये ‘अधिवेशनाचं सूप वाजलं’ अशी वाक्य आपण ऐकली असतील. शिवाय दरवर्षी होणारी मराठी साहित्य संमेलने जेव्हा आटोपतात, तेव्हा त्यावेळीही ‘साहित्य संमेलनाचं सूप वाजलं’ असा शब्दप्रयोग केला जातो. अनेकदा लग्नकार्यावेळीही कार्य पार पडल्यानंतर ‘सूप वाजलं’ म्हणण्याचा प्रघात आहे. पण हा वाक्प्रचार नेमका आला कुठून? त्याच्यामागे खरंच सूप वाजण्याची प्रक्रिया आहे का? मग ती प्रक्रिया नेमकी एखादा कार्यक्रम संपण्याच्या घटनेशी कशी लागू पडते?
सूप वाजणे हाच अर्थ!
हा वाक्प्रचार सामान्यपणे एखादं मोठं कार्य किंवा अनेक दिवस चाललेला कार्यक्रम संपुष्टात आल्यानंतर त्यासंदर्भात वापरला जातो. अधिवेशन, साहित्य संमेलन हे त्यातलेच प्रकार. या वाक्प्रचाराचा अर्थही त्यातील क्रियेनुसार सूप वाजू लागणे असाच आहे. पण ती क्रिया मोठे कार्यक्रम आटोपण्याच्या घटनेशी कशी लागू होते, याची मोठी रंजक माहिती आहे. सदानंद कदम यांनी आपल्या ‘कहाणी वाक्प्रचारांची’ या पुस्तकात यावर सविस्तर माहिती दिली आहे.
‘गौडबंगाल’ हा शब्द मराठी भाषेला कसा मिळाला? काय आहे नेमका अर्थ?
“सूप वाजणे हा वाक्प्रचार महिलांच्या रोजच्या कामातून तयार झालाय. पूर्वी सूप हे बांबूच्या चिवाट्यापासून तयार व्हायचं. आता ते असतं प्लास्टिक किंवा पत्र्याचं. या सुपात धान्य घेऊन आयाबाया ते पाखडत असतात. असं करताना शेवटी शेवटी सुपाखाली बोटं धरून त्या सुपाला बडवतात. तेव्हा ते सूप वाजतं. काम संपल्याची ती खूण असते. यावरून काम संपलं याअर्थी तयार झालेला वाक्प्रचार म्हणजे सूप वाजणे. पूर्वी लग्नकार्य चार चार दिवस चालत. या चार दिवसांत देवकही सुपार मांडले जात. कार्य झाल्यावर ते विसर्जित करून रिकामं सूप वाजवत. याचाही अर्थ कार्य संपन्न झाले असा होतो”, असं सदानंद कदम यांनी पुस्तकात म्हटलं आहे.
इतरही काही संदर्भ…
सूप वाजणे याचा अर्थ काम संपणे असा असला तरी त्याला इतरही काही संदर्भ जोडले जातात. लग्नकार्यासारख्या मोठ्या प्रसंगी बरीच माणसं जेवायला असतात. त्यामुळे आधीच धान्य पाखडून ठेवलेलं असतं. शेवटी शेवटी धान्य संपत आलं, की पुन्हा नवीन धान्य काढून पाखडावं लागतं. त्यासाठी सूप वाजायला लागलं, ती आता कार्य संलं आहे किंवा कार्यासाठी केलेली साठवण संपली आहे असा बोध घेतला जातो अशी एक धारणा आहे.
काही ठिकाणी शेतातील मळणी प्रक्रियेवरून हा वाक्प्रचार रूढ झाल्याचं सांगितलं जातं. भाताची मळणी चालू असताना सुपानं उंचावरून धान्य खळ्यात टाकलं जातं. फुफाटा उडून गेल्यानंतरही काही टाकाऊ भाग धान्याच्या वजनानं खाली दबून राहातो. तेव्हा पुन्हा एकदा सुपानं पुन्हा धान्याला वारे देण्याची पद्धत आहे. रास संपल्यानंतर शेवटी जमिनीला सूप लागू लागलं की त्याचा आवाज येऊ लागतो. धान्य वाहून नेणाऱ्यांना या आवाजावरून रास संपली, काम संपत आल्याचा अंदाज येतो!