ससेमिरा हा शब्द ऐकला की आपल्याला वाटतं या शब्दाचा आणि ससा या शब्दाचा काही संबंध आहे का? मात्र तसं नाहीये. आजवर अनेकदा आपण हा शब्द ऐकला आहे. पोलिसांचा ससेमिरा मागे लागला, ससेमिरा कधी संपणार देवास ठाऊक? अशी वाक्यं आपण अनेकदा ऐकतो. मात्र हा शब्द मराठी भाषेत कसा आला? तसंच या शब्दाचा अर्थ काय आपण समजून घेऊ.
ससेमिरा शब्दाचा अर्थ काय?
ससेमिरा या शब्दाचा अर्थ पिच्छा पुरवणे किंवा एक प्रकारचे वेड घेणे किंवा ध्यास घेणे असा होतो. मराठी भाषेत हा शब्द पंचतंत्रातून आला आहे. पंचतंत्रात चार श्लोक आहेत. त्या प्रत्येक श्लोकाची सुरुवात स, से, मि, रा या चार अद्याक्षरांनी होते. या अद्याक्षरांचा मिळून ससेमिरा हा शब्द तयार झाला आहे. कुणीही पाठपुरावा केला किंवा पिच्छा पुरवला की हे संपूर्ण श्लोक म्हणण्याऐवजी ससेमिरा हा शब्दच वापरु लागले. त्यामुळे ससेमिरा हा शब्द तयार झाला. श्लोक म्हणण्याऐवजी अद्याक्षरं म्हटली जाऊ लागली आणि ससेमिरा शब्द अस्तित्त्वात आला.
ससेमिरा आणि ससा या प्राण्याचा काही संबंध आहे का?
ससेमिरा शब्द पंचतंत्रातून आला आहे. ज्याचा अर्थ पिच्छा पुरवणे असा होतो. पण बिचाऱ्या सशाचा आणि ससेमिरा शब्दाचा काहीही संबंध नाही. ससा हा स्वभावाने गरीब आणि भित्रा प्राणी आहे. तो चुकूनही कुणाच्या मागे लागत नाही. उलट त्याच्या मागे कुणी लागलं तर तो लांब पळतो. चार श्लोकांच्या अद्याक्षरांमध्ये ससे हा शब्द येतो. त्यामुळे वाटू शकतं की ससा आणि ससेमिरा यांचा काही संबंध आहे का? पण या दोहोंचा बादरायण संबंधही नाही. ‘कहाणी शब्दांची’ या पुस्तकात सदानंद कदम यांनी या शब्दाचा अर्थ देण्यात आला आहे.