डॉल्बी साऊंड हा शब्द आपल्या कानावर आत्तापर्यंत अनेकदा पडला असेल. सिनेमा पाहताना डॉल्बी साऊंड सिस्टीम, डॉल्बी सराऊंड, डॉल्बी डिजिटल असे अनेक प्रकार आपण ऐकले आहेत. मात्र या साऊंड सिस्टीमला डॉल्बी नाव कसं पडलं? हे तुम्हाला माहीत आहे का? तसंच या डॉल्बी साऊंडचे प्रकार किती आहेत ठाऊक आहे का? चला आपण जाणून घेऊन या साऊंडच्या नावाचा इतिहास आणि या साऊंडचे प्रकार.
डॉल्बी साऊंड हे नाव कसं पडलं?
डॉल्बी या साऊंड सिस्टीमचे जनक होते रे डॉल्बी. डॉल्बी लॅबची स्थापना त्यांनी केली होती. त्यानंतर १९६५ मध्ये त्यांनी याच नावाने कंपनी सुरु केली. डॉल्बी साऊंड हे जे नाव आपण ऐकतो ते रे डॉल्बी यांच्या नावावरुनच ठेवण्यात आलेलं नाव आहे. २०१३ मध्ये रक्ताचा कर्करोग होऊन रे डॉल्बी यांचा वयाच्या ८० व्या वर्षी मृत्यू झाला. मात्र सिनेमा, साऊंड यांना महत्त्वाची देणगी ते देऊन गेले. ज्याचं नाव होतं डॉल्बी साऊंड सिस्टीम. कॅसेटमधला अनावश्यक गोंगाटाचा आवाज काढण्यापासून ते स्टार वॉर्ससारखे चित्रपट मोठ्या पडद्यावर जिवंत करण्यापर्यंत अनेक किमया रे डॉल्बी यांनी साधल्या. डॉल्बी यांनी पन्नास अमेरिकी पेटंट मिळवली होती.
डॉल्बी ध्वनियंत्रणेचे महत्त्व काय?
डॉल्बी यंत्रणेने ध्वनीतील गोंगाटाचा भाग कमी करून त्यात अधिक स्पष्टता आणली. ही डॉल्बी यंत्रणा चित्रपटांसाठी वरदान ठरली. अनेक चित्रपटगृहांत आता ती वापरली जाते. त्यातून पुढे संगीत, चित्रपट व करमणूक उद्योगात वापरले जाणारे अनेक प्रकारचे ध्वनितंत्रज्ञान त्यांनी विकसित केले होते.
डॉल्बी साऊंडचे प्रकार कुठले आहेत?
डॉल्बी स्टिरिओ: डॉल्बी स्टिरिओ हा असा प्रकार आहे जो सर्वात आधी शोधला गेला. या स्टिरिओ सिस्टिममध्ये आवाज दोन भागात विभागला गेला. त्यात पहिला होता मुख्य ध्वनी दुसरा होता गोंगाट किंवा त्या ठिकाणी असलेला नैसर्गिक आवाज. प्रमुख ध्वनी या प्रकाराचा उपयोग चित्रपटांमधले संवा आणि संगीत यांच्यासाठी केला गेला. दुसरा प्रकार जमिनीवरचा नैसर्गिक आवाज, आकाशातला आवाज हे ऐकवण्यासाठी वापरला गेला. डॉल्बी स्टिरिओ ही सिस्टिम मुख्यतः सिनेमा थिएटरसाठी वापरली जाते.
डॉल्बी सराऊंड साऊंड: हा प्रकारही थिएटरमध्ये वापरला जातो. या प्रकारात ध्वनी हा चार भागांमध्ये विभागला जातो. मुख्य ध्वनी, विशिष्ट पृष्ठभागावरचा ध्वनी, डावीकडून येणारा ध्वनी आणि उजवीकडून येणारा ध्वनी. या प्रकाराचा उपयोग अनेक सिनेमांसाठी करण्यात आला आहे.
डॉल्बी डिजिटल : डॉल्बी डिजिटल हा डॉल्बी साऊंडचा एक लोकप्रिय प्रकार आहे. उत्तम ऑडिओ दर्जासाठी हा प्रकार वापरण्यात येतो. या प्रकारात ऐकलेली गाणी, संवाद हे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. इतर प्रकारांपेक्षा डॉल्बी डिजिटल हा प्रकार जास्त सुमधूर आणि काळजाला भिडणारा ठरतो.
डॉल्बी एटमोस: डॉल्बी एटमोस ही आणखी एक प्रगत चित्रपट ध्वनी प्रणाली आहे. या प्रकारात गाणं, संवाद, चित्रपट पाहण्याचा अनुभव हा डॉल्बी डिजिटलच्याही दोन पावलं पुढे नेणारा असतो. चित्रपटांप्रमाणेच हल्ली डॉल्बी एटमोस ही प्रणाली टीव्हीच्या साऊंडमध्येही वापरली जाते.