समीर जावळे
Lezim : छावा सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना लेझिम खेळताना दाखवण्यात आलं आहे. मात्र याच दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला असून ही दृश्यं चित्रपटातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लेझिम हा खेळ आणि त्याची परंपरा कशी सुरु झाली? याबाबत आपण जाणून घेऊ.
छावा चित्रपटातील दृश्यांचा नेमका वाद काय?
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यातील काही दृश्यांवर नेतेमंडळी व सामाजिक संघटनांकडून आक्षेप घेतला जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवण्यात आलं आहे. लेझिम या नृत्यप्रकारात संभाजी महाराजांना नाच करताना दाखवण्यात आल्याने समाजमाध्यमांवरून अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. तर, काही संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागल्या आहेत. ज्यानंतर ही दृश्यं वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंडीत महादेव शास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृतिकोशातली लेझिमची व्याख्या काय?
पंडीत महादेव शास्त्री जोशी यांनी संपादित केलेल्या भारतीय संस्कृतिकोशातील व्याख्येनुसार, लेझीम हा एक खेळ आहे. लेझम या फारसी शब्दापासून हा शब्द तयार झाला असावा. लेझिमला योगचाप असंही म्हटलं जातं. पंधरा ते अठर इंच लाकडाचा एक दांडा घेऊन त्याच्या दोन्ही टोकांना लोखंडी कोयंडे बसवले जातात. त्या कोयंड्यांतून तीन-चार चकत्या असलेल्या कड्या अडकवतात. कड्यांच्या मधोमध एक लोखंडी वज्रमूठ असते. लेझिमचा दांडा हा सामान्यतः बाभळीच्या लाकडाचा असतो, तो लवकर मोडत नाही आणि तो फारसा जडही नसतो. लाकूड जड असेल तर लेझिम सहज वापरता येत नाही. लेझिमच्या लाकडी दांड्यांना रंग दिलेले असतात. लेझिमचा दांडा डाव्या हातात तर लोखंडी मूठ उजव्या हातात धरली जाते. असं म्हटलं आहे.
लेझिम हा वीरनृत्याचा प्रकार आहे अशीही माहिती संस्कृती कोशात आहे
याच कोशातील पुढे माहिती देण्यात आली आहे की लेझिमचा खेळ हा वीरनृत्याचा प्रकार आहे. महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये लेझिम हे नृत्य प्रचलित आहे. या नृत्यात विविध प्रकारचे अंगसंचालन असते. त्यात पुढे जाणे, मागे येणे, खाली वाकणे, उड्या मारणे, गिरक्या घेणे असे प्रकार असतात. या नृत्याला ढोल, झांजा, ताशा यांचीही साथ मिळते. ढोलाच्या आवाजात बेभान होऊन अनेकदा खेळगडी लेझिम खेळतात. देवतांच्या पालख्या, मिरवणुडीका, खेड्यांमधल्या जत्रा, उरुस यांच्यापुढे लेझिम खेळणारे ताफे असतात. या नृत्यप्रकार किंवा खेळामुळे चांगला व्यायाम होतो. या खेळाचा प्रारंभ कुठे झाला ते सांगणं कठीण आहे. काही तज्ज्ञांच्या मते लेझिम हा खेळ पेशवेकालीन किंवा त्या पूर्वीपासूनही असावा असं सांगितलं जातं. भारतीय संस्कृतिकोशात ही माहिती देण्यात आली आहे.
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी लेझिमबाबत काय माहिती दिली?
“लेझिम हा प्रकार पर्शियातून आलेला व्यायामाचा प्रकार होता, नंतर आपण लेझिम नृत्य हा प्रकार सुरु केला. लेझिमचे शिवकाळातले उल्लेख मला मिळालेले नाहीत. मात्र लेझिम हा व्यायामाचा जुना प्रकार आहे हे संदर्भ मिळतात. आपल्याकडे परंपरगातरित्या म्हणजे जवळपास १५० वर्षांपासून लेझिम हा प्रकार खेळला जातो किंवा लेझिम नृत्य केलं जातं. शिवकाळात लेझिमचा उल्लेख मिळत नाही याचा अर्थ ते त्या काळात नसेलच असं ठामपणे सांगता येत नाही. खाशी माणसं लेझिम खेळत नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आज्ञापत्र आहे, त्यात उल्लेख आहे की दरबारात नाच करु नये, समजा कुणी केला तर त्यात खाशी माणसांनी म्हणजेच योद्धा किंवा राजाने सहभाग घेऊ नये असाही उल्लेख आहे. त्यामुळे चित्रपटात अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांना लेझिम खेळताना दाखवणं योग्य नाही.” असं इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितलं.
इतिहासकार जयसिंग पवार यांनी लेझिम बाबत काय म्हटलं आहे?
“लेझिम या खेळाची सुरुवात कशी झाली? ते निश्चितपणे सांगता येणार नाही. कारण लाठी-काठी चालवणं हा देखील एक खेळ आहे. खो-खो हादेखील खेळ आहे. लेझिम हा पिढ्यान् पिढ्या खेळला जातो. अमुक एका कालावधीत हा खेळ सुरु झाला असं निश्चितपणे सांगता येणार नाही. महाराष्ट्रातले लोक पूर्वापार लेझिम खेळ खेळतात. लेझिम खेळ हा व्यायाम प्रकारही आहे, करमणूकही आहे, चित्त प्रसन्न करणारा भागही त्यात आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीतून हा खेळ सुरु झाला आहे.” अशी माहिती इतिहासकार जयसिंग पवार यांनी लोकसत्ता ऑनलाइनला दिली.