देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. करोना प्रतिबंधक लसीकऱण सुरु असल्याने सध्या सर्वजण लस घेण्याच्या मागे लागले आहेत. मात्र, देशासह अनेक राज्यांमध्येही लसींचा तुटवडा असल्याने लसीकऱणात अडथळे निर्माण होत आहेत. अशावेळी पहिला डोस ज्या लसीचा घेतला असेल ती लस दुसऱ्या डोससाठी उपलब्ध असेलच असं नाही. अशावेळी दोन्ही डोस वेगवेगळ्या लसींचे घेतले तर त्याचा काय परिणाम होईल? याचे काही साईड इफेक्ट्स होतील का? काही त्रास होईल का?अशा अनेक शंका सर्वसामान्यांच्या मनात आहेत. याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी इंडिया टुडेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
हेही वाचा- राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित, राज्य सरकारचा निर्णय
या अहवालानुसार, दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेतल्यास सौम्य ते मध्यम साईड इफेक्ट्स जाणवू शकतात. कदाचित ताप, थंडी किंवा डोकेदुखीचाही त्रास होऊ शकतो. लान्सेटच्या वैद्यकीय अहवालानुसार, पहिला डोस घेतल्यानंतर जो त्रास झाला त्याच पद्धतीचा त्रास वेगळ्या लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. या त्रासाची वारंवारिता कमी जास्त होऊ शकते.
ऑक्सफर्ड विद्यापीठाचे व्हायरॉलॉजीचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. मॅथ्यू स्नेप यांनी सांगितलं की, लस घेतानाच हा त्रास सहन करावा लागणार याची तयारी ठेवावी. पहिला डोस घेतल्यानंतर जसा त्रास होतो. त्याच प्रकारचा त्रास वेगळ्या लसीचा दुसरा डोस घेतल्यासही होतो. मात्र, त्याची वारंवारिता ही वेगळी असते. हा त्रास काही कालावधीच्या अंतराने पुन्हा पुन्हा होऊ शकतो. मात्र, त्यावर त्वरित उपचार करता येऊ शकतात.
आणखी वाचा- Covid-19 vaccine registration: लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची? जाणून घ्या…
ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये याबद्दलचा अभ्यासही झाला आहे. ज्यामध्ये संशोधकाच्या गटाने ८३० स्वयंसेवकांवर वेगवेगळ्या लसींचा प्रयोग केला. या स्वयंसेवकांना २८ दिवसांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या लसी देण्यात आल्या.
या अभ्यासादरम्यान काही लोकांना अॅस्ट्राझेन्का लसीचा पहिला डोस देण्यात आला तर दुसरा डोस फायझर या लसीचा देण्यात आला. काही स्वयंसेवकांना दोन्ही डोस फायझरचे किंवा दोन्ही डोस अॅस्ट्राझेन्का लसीचे देण्यात आले. या अभ्यासातून हे समोर आलं की ज्यांना दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देण्यात आले होते, त्यांना जास्त साईड इफेक्ट्स दिसून आले. दोन वेगवेगळ्या लसी देण्यात आलेल्या ३४ टक्के लोकांना तापासारखी लक्षणं दिसून आली तर फक्त अॅस्ट्राझेन्का लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेल्यांपैकी फक्त १० टक्के लोकांना ही लक्षणं दिसून आली. तर ज्यांना पहिला डोस फायझरचा आणि दुसरा डोस अॅस्ट्राझेन्का लसीचा देण्यात आला, त्यापैकी ४१ जणांना ताप आला. तर फायझर लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेल्या लोकांपैकी फक्त २१ टक्के लोकांना असा त्रास झाला.
हे सर्व साईड इफेक्ट लस घेण्याच्या ४८ तासांनंतर दिसून आले. दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेतले तर कोणते परिणाम होतील याबद्दल अद्यापही अभ्यास सुरु आहे. याबद्दल ठोस निष्कर्ष सांगता येत नाही. अजून काही आठवड्यांचा अभ्यास आवश्यक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
जागतिक आरोग्य संघटना, अमेरिकेची रोग नियंत्रण संघटना किंवा भारतातील आयसीएमआर संघटना यापैकी कोणीही दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेण्याचा सल्ला देत नाहीत.