What is Charitable Hospital : पुण्यातल्या तनिषा भिसे प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप झाला आहे. इतकंच नाही तर या रुग्णालयावर आरोग्य समितीनेही ठपका ठेवला आहे. दरम्यान हे रुग्णालय धर्मादाय रुग्णालय आहे असं असतानाही या रुग्णालयाने अनामत रक्कम म्हणून १० लाख रुपये का मागितले? असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. धर्मादाय रुग्णालय म्हणजे काय? हे आपण या बातमीतून समजून घेऊ.
धर्मादाय रुग्णालय योजना काय आहे?
मुंबईतील सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम १९५० मधील कलम ४१ क अन्वये धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब आणि निर्धन रुग्णांसाठी खाटा सवलतीच्या दरात आणि मोफत राखून ठेवल्या जातात. मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या योजनेतील तरतुदींचं पालन करणं हे या रुग्णांसाठी बंधनकारक असतं. या योजनेची माहिती https://charity.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसंच या योजनेच्या लाभासाठी १८००२२२२७० या टोल फ्री क्रमांकावर संपर्कही करता येतो.
धर्मादाय योजनेचा वैद्यकीय लाभ कसा घेता येतो?

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांनी मेडिकल सोशल वर्कर्सना भेटून आपली माहिती आणि आवश्यक कागदपत्रं तपासणीसाठी द्यायची असतात. तातडीच्या वेळी धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णाला तातडीने दाखल करुन घेऊन रुग्णाची प्रकृती स्थिर होईपर्यंत वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणं बंधनकारक असतं. मेडिकल सोशल वर्कर्सनी पुढील समन्वय साधणं बंधनकारक आहे.

रुग्णांना उपचारांच्या संदर्भात रुग्णालयात काही अडचण आल्यास संबंधित धर्मादाय निरीक्षक, धर्मादाय कार्यालयाशी संपर्क साधता येतो. तसंच काही तक्रार असल्यास लेखी स्वरुपातही म्हणणं मांडता येतं. एवढंच नाही तर १८००२२२२७० या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क करता येतो.

उपचारांबाबत काही तक्रार असल्यास रुग्णांना लेखी मत धर्मदाय कार्यालयाकडे सादर करावं. यानंतर रुग्णालयातील प्रतिनिधी आणि रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक अशा दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून पुढे धर्मादाय आयुक्त निर्णय देतात.

आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असलेले धर्मादाय निरीक्षक यांच्याशी रुग्णांनी संपर्क करुन त्यांच्याशी आपल्या प्रकरणाबाबत मदत घेता येते.

निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांना सवलतीच्या दरांत उपचार कसे मिळतात?

निर्धन रुग्ण- रुग्णाचं वार्षिक उत्पन्न १ लाख ८० हजार रुपये किंवा त्याहून कमी असल्यास अशा रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव असतात. वैद्यकीय उपचार हे पूर्णपणे मोफत असतात.

दुर्बल घटकातील रुग्ण : रुग्णाचं वार्षिक उत्पन्न ३ लाख ६० हजार किंवा त्यापेक्षा कमी असल्यास अशा रुग्णांसाठी १० टक्के बेड राखीव ठेवले जातात. अशा रुग्णांना सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार केले जातात.

या सगळ्यासाठी आवश्यक कागदपत्रं काय?

शिधापत्रिका किंवा दारिद्र्यरेषेखालील पत्रिका हे दोन्ही नसल्यास वार्षिक उत्पन्नाचे तहसीलदार यांचं प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्रं आवश्यक असतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is a charitable hospital know how it works types functions benefits services in marathi scj