Critaria for Greem Card : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा देशाचा कारभार हाती घेतल्यानंतर स्थलांतरितांबाबत काही दूरगामी निर्णय घेतले आहेत. याचा फटका मोठ्या प्रमाणात अशा स्थलांतरितांना बसू लागला आहे जे ‘ग्रीन कार्ड’च्या प्रतीक्षेत आहेत. हे स्थलांतरित कोणत्या ना कोणत्या तात्पुरत्या व्हिसाच्या आधारावर अमेरिकेत वास्तव्यास आहेत, पण सातत्याने तेथे राहून ग्रीन कार्ड म्हणजेच अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याची परवानगी मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. अलीकडेच त्यांनी नवीन ‘गोल्ड कार्ड’ योजना जाहीर केली आहे. श्रीमंत गुंतवणूकदारांना पाच दशलक्ष डॉलर्समध्ये (जवळपास ४३ कोटी रुपये) निवासी परवाना देऊ करणाऱ्या या योजनेमुळे ग्रीन कार्डची वाट पाहत असलेल्या भारतीयांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. सध्याच्या EB-5 या इमिग्रंट इन्व्हेस्टर प्रोग्राममध्ये बदल करणे आणि श्रीमंत व्यक्तींना अमेरिकेच्या नागरिकत्वाचा नवा मार्ग खुला करणे हे या योजनेचं प्रमुख उद्दीष्ट आहे.

ग्रीन कार्ड म्हणजे काय?

दरम्यान, ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की हे ग्रीन कार्ड म्हणजे नक्की काय आहे? तर, ग्रीन कार्ड म्हणजे अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याचा निवासी परवाना. ग्रीन कार्ड धारक हे मूळचे अमेरिकन नागरिक नसतात. त्यामुळे जन्मसिद्ध नागरिकत्व (बर्थराइट सिटिझनशिप) किंवा स्वाभावीकृत नागरिकत्व (नॅचरलायझेशन सिटिझनशिप) यापैकी कोणत्याही प्रकारात ते मोडत नाहीत. ग्रीन कार्ड धारक किंवा इच्छुक हे नेहमीच अमेरिकेमध्ये कोणत्या ना कोणत्या तात्पुरत्या व्हिसावर तिथे वास्तव्यास असतात. साधारण ९० दिवस ते दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ हे अमेरिकेत राहिलेले असतात.

ग्रीन कार्ड कधी मिळतं?

ग्रीन कार्ड कधी दिलं जाणार यासाठी विशिष्ट निकष नाहीत. सध्या हजारो इच्छुक अमेरिकेत ग्रीन कार्डची वर्षानुवर्षे प्रतीक्षा करत आहेत. नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेलेले, विद्यार्थी म्हणून गेल्यानंतर तेथे नोकरी करू लागलेले असंख्य भारतीय आणि वेगवेगळ्या देशांचे नागरिक ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, अमेरिकन नागरिक असलेल्या एखाद्या व्यक्तीशी विवाह झाल्यास ग्रीन कार्ड अधिक तत्परतेने मिळतं. तसेच अमेरिकेच्या विविधता प्रोत्साहन व्हिसा उपक्रमाअंतर्गत ग्रीन कार्ड लॉटरी काढली जाते. हा देखील व्हिसा मिळवण्याचा एक मार्ग आहे.

ग्रीन कार्ड कोण देतं?

ग्रीन कार्डला अधिकृतपणे ‘पर्मनंट रेसिडेंट कार्ड’ (Permanent Resident Card) असंही म्हणतात. हे एक प्रकारचं ओळखपत्र आहे जे एखाद्या परदेशी नागरिकाला अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याचा आणि तिथे काम करण्याचा अधिकार देतं. हे कार्ड मिळालेल्या व्यक्तीला ‘लॉफुल पर्मनंट रेसिडेंट’ (Lawful Permanent Resident – LPR) म्हणून ओळखलं जातं. ग्रीन कार्ड हे नाव त्याच्या मूळ हिरव्या रंगामुळे पडलं आहे. अलीकडेच ग्रीन कार्डचा रंग व डिझाइन बदलण्यात आलं असलं तरीही ग्रीन कार्ड हेच नाव प्रचलित आहे. हे कार्ड अमेरिकेच्या नागरिकत्व व इमिग्रेशन सेवा (USCIS) विभागाद्वारे जारी केलं जातं, जे सामान्यतः १० वर्षांसाठी वैध असतं.

ग्रीन कार्डसाठीचे निकष काय?

ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी अनेक मार्ग आणि निकष आहेत, जे लोकांच्या परिस्थितीनुसार बदलतात. ग्रीनकार्डसाठीचे निकष खालीलप्रमाणे आहेत.

१. कौटुंबिक आधारित (Family-Based) :

निकटचे नातेवाईक : अमेरिकन नागरिकाचे पती/पत्नी, अविवाहित मुलं (२१ वर्षांखालील), किंवा पालक पात्र ठरू शकता. यासाठी अमेरिकन नागरिकाने स्वतःहून फॉर्म I-130 (Petition for Alien Relative) दाखल करणं आवश्यक आहे.

इतर नातेवाईक: विवाहित मुलं, भावंडं किंवा ग्रीन कार्ड धारकांचे जोडीदार, ग्रीन कार्ड धारकांची मुलं देखील यासाठी अर्ज करू शकतात. परंतु, याला प्राधान्य कमी असतं आणि प्रतीक्षा कालावधी खूप जास्त असतो.

२. रोजगार आधारित (Employment-Based)

EB-1 : विशेष कौशल्य असलेले व्यक्ती (उदा. शास्त्रज्ञ, कलाकार, खेळाडू), उत्कृष्ट प्राध्यापक/संशोधक किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवस्थापक.

EB-2 : या व्हिसासाठी तुमच्याकडे मास्टर्स डिग्री किंवा त्यापुढे शिक्षण घेतल्याची पदवी असणं आवश्यक आहे. तसेच बॅचलर्स डिग्री व त्यानंतर त्या क्षेत्रातील किमान पाच वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. विज्ञान, कला व व्यवसाय क्षेत्रात मोठी कामगिरी केलेली असणं आवश्यक आहे.

EB-3: कुशल कामगार, व्यावसायिक किंवा अकुशल कामगार ज्यांना अमेरिकेत नोकरीची ऑफर आहे. यासाठी नियोक्त्याने फॉर्म I-140 (Immigrant Petition for Alien Worker) दाखल करणं आवश्यक आहे.

३. डायव्हर्सिटी व्हिसा लॉटरी (Diversity Visa Lottery)

अमेरिकेत कमी स्थलांतर करणाऱ्या देशांतील नागरिकांसाठी ही लॉटरी आहे. यासाठी किमान हायस्कूल शिक्षण किंवा समकक्ष कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. दरवर्षी ५०,००० लोकांना ही संधी मिळते.

४. शरणार्थी किंवा आश्रय घेणाऱ्यांसाठी (Refugee/Asylum)

शरणार्थी किंवा आश्रय मागणाऱ्यांना ते जर अमेरिकेत किमान एक वर्ष राहिलेले असतील तर ते ग्रीन कार्डसाठी अर्ज करू शकतात.

५. इतर विशेष श्रेणी

गुंतवणूकदार EB-5 अंतर्गत व्हिसासाठी अर्ज करू शकतात. अमेरिकेत १ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणारे आणि किमान १० नोकऱ्या निर्माण करणाऱे या व्हिसासाठी पाथर ठरतात.

इतर महत्त्वाचे निकष

  1. अमेरिकेत कायदेशीररित्या प्रवेश केलेला असवा (Adjustment of Status साठी).
  2. गंभीर गुन्ह्यांचे आरोप नसावेत.
  3. आरोग्य तपासणी (Form I-693) पास करावी लागते.

Story img Loader