Virtual Credit Card : देशात अद्याप देखील सर्वाधिक व्यवहार रोख रक्कमेने केले जात आहेत. मात्र, सध्याच्या काळात मोबाइल आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. यातच देशभरात ऑनलाईन खरेदी देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंगचा बाजार देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये आता डिजिटल क्रेडिट कार्ड ही सुविधा ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या जोडीला आता व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड देखील मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मात्र, अजूनही अनेकांना व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड म्हणजे काय आणि त्याचे सात फायदे कोणते? हे माहिती नसेल. त्या पार्श्वभूमीवर आपण आज या संदर्भातील थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड हे तुम्हाला तुमच्या बँकेकडून किंवा एखाद्या वित्तीय संस्थेद्वारे प्रदान करण्यात आलेल्या फिजिकल कार्डचे डिजिटल व्हर्जन असतं. म्हणजे क्रेडिट कार्डची तात्पुरती डिजिटल आवृत्ती असंही म्हणता येईल. आता व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड सामान्यतः ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरलं जातं. व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड वापरल्याने फसवणुकीचा धोका कमी होतो. हे कार्ड ठराविक ट्रान्झँक्शनसाठी आणि मर्यादित अवधीसाठी असतं.
ठराविक व्यवहारांनंतर हे निरुपयोगी होतं. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना पुढील कोणत्याही खरेदीमध्ये त्यांचा पुन्हा वापर करता येत नाही. हे कार्ड ऑनलाइन असतं. ते प्रत्यक्ष रूपात हाती दिलं जात नाही. ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी बँकेने दिलेली ही मोफत सेवा असते. भारतातील अनेक मोठमोठ्या बँकांनी ही सेवा सुरू केलेली आहे. तसेच काही खासगी संकेतस्थळांनी देखील ही सेवा सुरू केल्याचं पाहायला मिळतं.
व्हर्च्युअल क्रेडिट कार्डचे सात फायदे कोणते?
सुरक्षित ऑनलाइन खरेदी : व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड ऑनलाइन शॉपिंगसाठी सुरक्षित मानले जाते. कारण ते तात्पुरते कार्ड तपशील वापरतात. त्यामुळे तुम्ही फसव्या वेबसाइटपासून सुरक्षित राहता.
अधिकचा खर्च टाळू शकता : तुम्ही व्हर्च्युअल क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अधिकचा खर्च टाळू शकता आणि वापरावर मर्यादा ठरवू शकता. याचा फायदा तुम्हाला बिलिंग सायकलच्या शेवटी पाहायला मिळतो. कारण बिलिंग सायकलच्या शेवटी मोठे बिल टाळू शकता.
विमा पेमेंट फसवणुकीपासून संरक्षण : विमा प्रदात्यांद्वारे सुरक्षित आणि जलद दाव्याचे वितरण करून विमा पेमेंटमधील फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी व्हीसीसी (VCC) चा वापर केला जातो.
व्हर्च्युअल कार्ड मोफत मिळते : अनेक बँका व्हर्च्युअल कार्ड मोफत देतात. त्यामुळे तुमच्या बजेटमधून जास्त खर्च न करता तुम्ही व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड घेऊ शकता.
फसवणुकीसह डेटा चोरीचा धोका कमी : व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड प्रत्येक व्यवहारासाठी एक अद्वितीय कार्ड नंबर तयार करतात. त्यामुळे फसवणूक आणि डेटा चोरीचा धोका कमी होतो.
डेटा उल्लंघनापासून संरक्षण : व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड व्यवहाराच्या दरम्यान प्रत्यक्ष कार्डचे तपशील शेअर केले जात नाहीत. त्यामुळे डेटा उल्लंघनाच्या परिणामापासून संरक्षण मिळतं. तुमची सर्व माहिती सुरक्षित राहते.
स्मार्ट व्यवहार करू शकता : व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड डिजिटल वॉलेटसह एकत्रित केले जातात. त्यामुळे तुम्ही दोन्हीचा सोयीस्करपणे फायदा घेऊ शकता आणि स्मार्ट व्यवहार करू शकता.