Why Songs Get Stuck in Your Head : सध्या सोशल मीडिया उघडलं की त्यामधील प्रत्येक रील व्हिडीओवर तुम्हाला ‘बदो बदी’, ‘गुलाबी साडी’ किंवा अशा अनेक विविध भाषांमधील गाणी सतत ऐकू येत असतात. यापैकी एखादे गाणे किंवा विशिष्ट धुन तुमच्या डोक्यात नकळत घर करून राहते आणि दिवसभर तुम्ही ते गुणगुणत राहता. मग ही गाणी तुम्ही ऑफिसमध्ये, परीक्षेत किंवा दिवसातील कोणत्याही वेळेला गुणगुणत राहता. गाण्यांच्या अशा प्रकाराला किंवा डोक्यात घर करून राहण्याच्या प्रकाराला ‘इयरवर्म सॉंग’ असे म्हणतात, अशी माहिती इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @sharvary_heals नावाच्या अकाउंटने शेअर केली आहे. शर्वरी ही एक सायकॉलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट असल्याचे तिने व्हिडीओमध्ये सांगितले आहे.
इयरवर्म गाणी कशी तयार होतात?
मात्र, इतर गाण्यांपेक्षा अशी विचित्र किंवा निवडक गाणीच आपल्याला का बरं लक्षात राहत असतील? असा साधा प्रश्न आपल्याला पडतो. तर शर्वरीच्या म्हणण्यानुसार, “ही गाणी बनवलीच अशा पद्धतीने असतात की, ती आपल्या डोक्यामध्ये एखाद्या पावसाळी किड्याप्रमाणे इच्छा नसतानाही घुसतात. विशिष्ट रिपिटेशन, ऱ्हिदमचा वापर करून ही गाणी बनवली जातात.”
तर, वायर्डच्या [wired] एका लेखानुसार असे समजते की, गाणी आपल्या डोक्यात का अडकून बसतात याबद्दल अद्यापही शास्त्रज्ञांना ठोस अशी माहिती नाहीये. मात्र, कदाचित आपल्या मेंदूच्या मानसिक घडणीनुसार त्यामध्ये ठराविक गाणी किंवा संगीत वारंवार वाजवण्याचे संकेत दिले जात असावे. सायकोलॉजी ऑफ म्युझिक या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असे समजते की, इयरवर्म हे साधारण रिसेन्सी, परिचितता आणि कंटाळा यांसारख्या ट्रिगर्सना प्रतिसाद देत असतात.
“माहितीचा साठा करणाऱ्या न्यूरॉन्सच्या प्रचंड गुंतागुंतीच्या जाळ्याने आपला मेंदू बनलेला असतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपले मन रिकामे असते, त्याच्याकडे काही करण्यासारखे नसते तेव्हा मन मुक्तपणे भटकत असताना नकळतपणे रिसेन्सी आणि रिपिटेशन असणाऱ्या गाण्यांची निवड करतात. खरंतर संगीतकार आणि गीतकारदेखील जाणूनबुजून गाण्यांमध्ये, संगीतात अशी पुनरावृत्ती निर्माण करतात, ज्यामुळे असे इयरवर्म गाणी तयार होतील”, अशी माहिती न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील प्राध्यापक आणि संशोधक एमरी शुबर्ट यांनी दिली असल्याचे वायर्डच्या लेखावरून समजते.
ही इयरवर्म गाणी डोक्यातून काढायची कशी? [How to get rid of Earworm songs]
जी गाणी आपल्या डोक्यात अडकून बसलेली असतात ती कधीच निघून जाणार नाहीत असे जर तुम्हाला वाटत असेल तर शर्वरीने तिच्या व्हिडीओमध्ये याबद्दलही माहिती दिली आहे. “इयरवर्म गाणी जशी डोक्यात बसून राहतात, तशी ती काढतादेखील येतात”, असे तिने सांगितले आहे. त्यासाठी हे अतिशय साधे सोपे उपाय करून पाहू शकता.
हेही वाचा : भटकंती करताना हे मशरूम दिसले तर अजिबात लावू नका हात! असू शकतात प्रचंड विषारी, पाहा
१. जोरजोरात टाळ्या वाजवणे :
नकळत तुम्ही जर ठराविक गाणं गुणगुणू लागलात तर लगेच जोरजोरात टाळ्या वाजवा. अशा टाळ्या वाजवल्याने तुम्ही तुमच्या मेंदूला संदेश पोहोचवू शकता की आता हे गाणे संपले आहे आणि ते पुन्हा गायची गरज नाही.
२. गाणे पूर्ण ऐका
तुम्ही सतत गुणगुणत असलेले गाणे एकदा संपूर्ण ऐका. अनेकदा आपण गाण्यांमधील केवळ एखादी ओळ वारंवार म्हणत राहतो. तेव्हा ती पुनरावृत्ती थांबण्यासाठी संपूर्ण गाणे ऐकणे फायद्याचे ठरू शकते.
तुमचे आवडते किंवा कोणतेही गाणे जेव्हा तुमच्या डोक्यात घर करून राहतात तेव्हा नकळत तुमच्या अनेक गोष्टींवर परिणाम करत असतात. “इयरवर्म गाण्यांमुळे लक्ष विचलित होणे, फोकस करण्यात अडथळा निर्माण होण्यासारख्या गोष्टी होऊ शकतात”, असेही शर्वरीने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
तुमच्या डोक्यात कोणत्या गाण्यांनी घर केले आहे? कमेंट करून नक्की सांगा.