What is Bell’s Palsy Disease : महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा आजार झाला आहे. त्यांनी एक्सवर या आजारासंबंधित एक पोस्ट करत माहिती दिली आहे. या आजारामुळे त्यांना दोन मिनिटंही नीट बोलता येत नाही, ज्यामुळे त्यांना मंत्रिमंडळाच्या बैठका आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नाही, अशी माहिती त्यांनी पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. बेल्स पाल्सी हा एक दुर्मीळ असा आजार आहे, ज्यात चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. यात अनेकदा चेहऱ्याच्या एका बाजूवर परिणाम होतो, त्यामुळे दैनंदिन कामं करताना अडचणी जाणवू शकतात. पण, हा आजार नेमका काय आहे? कशामुळे होतो? त्याची लक्षणं आणि उपाय काय जाणून घेऊ….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेल्स पाल्सी म्हणजे काय?

बेल्स पाल्सी म्हणजे चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये अचानक येणारा कमकुवतपणा, यात अनेकदा चेहऱ्याच्या एका बाजूला परिणाम होतो. स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या चेहऱ्याच्या नसांमध्ये जळजळ झाल्याने असे होते, यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला लकवा मारल्यासारखे जाणवते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स अँड स्ट्रोक (NINDS) नुसार, अमेरिकेत दरवर्षी ४० हजार लोक बेल्स पाल्सी आजाराने ग्रस्त होत आहेत. पण, हा आजार होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होत नाहीयेय. परंतु, विषाणूजन्य संसर्ग, कमकुवत प्रतिकारशक्ती, मज्जासंस्थेच्या समस्यांपासून ते अनुवांशिकतेपर्यंत कोणत्याही कारणामुळे हा आजार होऊ शकतो असे सांगितले जाते. दरम्यान, याचा मधुमेही आणि दम्याच्या रुग्णांना अधिक त्रास जाणवतो.

बेल्स पाल्सी आजाराची लक्षणे

बेल्स पाल्सी आजाराची लक्षणे योग्यरित्या समजून घेण्यासाठी वेळ लागतो, परंतु काही लक्षणांच्या माध्यमातून तो ओळखता येऊ शकतो. कारण यातील काही लक्षणं ही सामान्य लक्षणांपेक्षा थोडी वेगळी असतात.

१) चेहऱ्याच्या एका बाजूला कमकुवतपणा जाणवणे

या आजारात सहसा चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो, जसे की डोळे बंद करण्यात अडचण येणे आणि एका बाजूला चेहरा थोडा वाकलेला दिसणे.

२) चेहरा सुजणे

बेल्स पाल्सी आजारामुळे हसताना किंवा बोलताना चेहऱ्याची एक बाजू सुजलेली दिसते. चेहऱ्यावर मुंग्या आल्यासारखे आणि चेहरा सुन्न झाल्यासारखे वाटते.

३) डोळे उघडताना अडचण

या आजारात रुग्णाचा डोळा पूर्णपणे बंद होऊ शकत नाही, विशेषतः एक डोळा उघडताना किंवा बंद करताना त्रास होतो.

४) बोलताना अडचण

बेल्स पाल्सीमुळे चेहऱ्यावरील स्नायूंना योग्यरित्या हालचाल करता येत नाही, ज्यामुळे भाषेच्या स्पष्टतेवर परिणाम होतो; जसे मंत्री मुंडे यांच्या बाबतीत घडत आहे. त्यांना नीट बोलता येत नाहीये.

५) चवीत बदल

कधीकधी काही खाताना चवीत बदलदेखील जाणवू शकतो, विशेषतः ज्या भागात या आजाराने ग्रस्त आहे त्या भागात असे होते.

६) डोळे कोरडे पडणे

या आजारात डोळ्यांमध्ये जास्त अश्रू निर्माण होत नसल्यामुळे कोरडेपणा येतो, त्यामुळे डोळे नीट उघडताना किंवा मिचकवताना त्रास होतो.

७) श्रवण क्षमतेवर परिणाम

काही रुग्णांमध्ये हायपरॅक्युसिस नावाची स्थितीदेखील विकसित होते, ज्यामध्ये एका कानात विशिष्ट आवाजांबद्दल संवेदनशीलता वाढते. अशाने व्यक्तीच्या श्रवणक्षमतेवर परिणाम होतो.

बेल्स पाल्सीवरील उपचार पद्धती

१) बेल्स आजारावर सामान्यतः स्टिरॉइड्स औषधांनी उपचार केले जातात.
२) चेहऱ्याचे स्नायू बळकट करण्यासाठी रुग्णास फिजिकल थेरपी करण्याचा सल्ला दिला जातो.
३) तसेच डोळ्यांच्या सुरक्षेसाठी आय ड्रॉप्सचा वापर केला जातो.
४) तसेच वेदना कमी करण्यासाठी आयबुप्रोफेनसारखी ओव्हर-द-काउंटर वेदनाशामक औषधे दिली जातात.

पण, या आजारावरील योग्य उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. दिलासाजनक बाब म्हणजे बेल्स पाल्सी आजार प्राणघातक नाही, कारण उपचार घेतल्यानंतर बहुतेक लोक पूर्णपणे बरे होऊ शकतात. या आजारातून बरं होण्यासाठी सहसा एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. काही प्रकरणांमध्ये अधिक वेळ लागू शकतो, तर काहींना दीर्घकालीन समस्यांचादेखील सामना करावा लागतो.