What In Black Monday : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर अतिरिक्त व्यापार कर लादल्यानंतर याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झाला आहे. आज (सोमवारी) जगभरातील सर्वच शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान शेअर बाजाराच्या इतिहासातील काळ दिवस मानल्या जाणाऱ्या ‘ब्लॅक मंडे’ची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडियावर देखील लोक याबद्दल चर्चा करताना दिसत आहेत.

चर्चा का सुरू झाली?

शेअर बाजार तज्ज्ञ आणि सीएनबीसीचे होस्ट जिम क्रॅमर काही दिवसांपूर्वीच हा सोमवार (७ एप्रिल) शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरेल असे भाकीत केले होते. त्यांनी म्हटले होते की, बाजारात आज १९८७ च्या ‘ब्लॅक मंडे’ नंतरची एका दिवसातील सर्वोत मोठी घसरण होईल. यानंतर सोशल मीडियावर या विधानाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. नेमकं हा काळा सोमवार म्हणजेच ‘ब्लॅक मंडे’ नेमका आहे तरी काय? आणि या दिवशी नेमकं काय घडलं होतं? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

अमेरिकी शेअर बाजारात शुक्रवारी म्हणजेच ४ एप्रिल रोजी कोरोना महामारीनंतरची सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतर ‘ब्लॅक मंडे २.०’ चा इशारा देण्यात आला होता. ६ एप्रिल रोजी अमेरिकेचा डाऊ जोन्स इंडस्ट्रियल निर्देशांक १,४०५ अंकांनी (३.७ टक्क्यांनी) घसरला होता. ही ‘ब्लॅक मंडे’ची चाहुल असल्याचे बोलले जात होते..

‘ब्लॅक मंडे’ म्हणजे काय?

काळा सोमवार म्हणजेच ब्लॅक मंडे हा १९ ऑक्टोबर १९८७ मधील असा दिवस होता जेव्हा जगभरातील बाजार कोसळले होते. ज्यामध्ये अमेरिकेचा डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी २२.६ टक्के घसरला होता. त्यानंतर रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी अमेरिकन शेअर बाजाराचे विश्लेषक जिम क्रॅमर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे सोमवारी ७ एप्रिल रोजी पुन्हा तसाच ‘ब्लडबाथ’ पाहायला मिळेल असा इशारा दिला. यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा होत आहे. सर्वत्र ‘ब्लॅक मंडे’ ट्रेंड होताना पाहायला मिळत आहे.

‘ब्लॅक मंडे’च्या दिवशी काय झालं होतं?

१९ ऑक्टोबर १९८७ हा दिवस ‘ब्लॅक मंडे’ म्हणजेच काळा सोमवार म्हणून ओळखला जातो. या दिवशी डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल एव्हरेज(DJIA) मध्ये एकाच दिवसात २२.६ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. या घटनेने जगभरातील शेअर बाजारात मंदी सुरू झाली. ‘ब्लॅक मंडे’ हा दिवस आर्थिक घडामोडींच्या इतिहासात सर्वात कुप्रसिद्ध दिवस म्हणून ओळखला जातो.

एसअँडपी ५०० मध्ये त्याच दिवशी ३० टक्के घसरण झाली होती. ही घसरण संपूर्ण महिनाभर सुरू होती आणि नोव्हेंबर १९८७ च्या सुरुवातीपर्यंत बहुतेक प्रमुख शेअर बाजार निर्देशांकांनी त्यांचे २० टक्क्यांहून अधिक मूल्य गमावले होते.