जगभरामध्ये करोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर चीनमधील एका शहरामध्ये रविवारी ब्यूबॉनिक प्लेगचे दोन नवीन संक्षयित रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर शहरामधील आरोग्य यंत्रणेने हाय अलर्ट जारी केला आहे. चिनी प्रसारमाध्यमांनी सध्या तरी या आजाराचे दोन रुग्ण आढळून आल्याचं म्हटलं आहे. मात्र प्राण्यांमधून मानवामध्ये या आजाराचा सहज संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच भविष्यात अशी आणखीन काही रुग्ण आढळण्याची शक्यता असल्यानेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे. मात्र आता या ब्यूबॉनिक प्लेगचे वृत्तसमोर आल्यानंतर अनेकजण या आजारासंदर्भात इंटरनेटवर माहिती शोधताना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या आजारासंदर्भातील माहिती देणारा हा लेख…
नक्की वाचा >> करोनानंतर आता ब्यूबॉनिक प्लेगचा धोका; चीनने जारी केला अलर्ट
काय आहे ब्यूबॉनिक प्लेग
ब्यूबॉनिक प्लेगला ग्लिटीवाला प्लेग असही म्हणतात. या आजारामध्ये शरीराला असह्य वेदना होतात, खूप ताप येतो तसेच नाडीचे ठोके वाढतात. त्यानंतर शरीरावर फोड येतात आणि दोन आठवड्यांमध्ये ते पिकतात. शरीरावर फोड आल्यानंतर त्वाचेची प्रचंड जळजळ होते. प्लेग हा उंदारांमार्फत पसरणारा रोग आहे. उंदीर मेल्यानंतर त्याच्या शरीरावरील पिसवांच्या माध्यमातून प्लेगच्या विषाणूंचा संसर्ग मानवाला होतो. उंदारच्या शरीरावरील पिसवे मानवाचा चावल्याने प्लेगचा संसर्ग होतो. उंदीर मेल्यानंतर जवळजवळ दोन ते तीन आठवड्यांच्या कालावधीमध्ये प्लेगचा संसर्ग मानवाला होतो.
जागतिक आरोग्य संघटना म्हणते…
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, ब्यूबॉनिक प्लेग हा रोग साधारणपणे लहान सस्तन प्राण्यांमध्ये आणि त्यांच्या पिसूमध्ये आढळून येणा-या येरसिनिया पेस्टिस या जीवाणूमुळे होतो आणि या रोगाची लक्षणे एक ते सात दिवसांच्या कालावधीनंतर दिसून येतात. हा रोग सामान्यतः उंदीर, ससे आणि खारी सारख्या संक्रमित प्राण्यांच्या शरीरावर जगणाऱ्या पिसवांनी दंश केल्याने पसरतो.
प्रामुख्याने दोन प्रकार आणि किती प्रकरण सापडली
उंदरांमार्फत होणाऱ्या प्लेगचे दोन मुख्य प्रकार आहेत: ब्यूबोनिक आणि न्यूमोनिक (जेव्हा प्लेग फुफ्फुसात जात असेल तेव्हा त्याला न्यूमोनिक असं म्हणता). डब्ल्यूएचओच्या मते, ब्यूबॉनिक प्लेग हा एक सामान्य प्रकार आहे आणि वेदनादायक सूजलेल्या गाठी आणि फोडी तसेच त्वचेवर लाल रंगाचे चट्टे पडणे ही या प्लेगची प्रमुख लक्षणं आहेत. त्वचेवर येणाऱ्या फोडींमुळे या आजाराला ब्यूबोनिक (बबल) असं नाव पडलं आहे. हा आता एक दुर्मिळ आजार आहे. २०१० ते २०१५ दरम्यान जगभरात ३ हजार २४८ प्रकरणं नोंदली गेली आहेत. त्यापैकी ५५८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतांश प्रकरणं ही काँगो, मादागास्कर आणि पेरू देशांमधील आहेत.
मृत्यूदर किती?
मध्ययुगात या आजाराला ‘ब्लॅक डेथ’ देखील म्हटले जाते होते. या काळामध्ये या आजाराच्या साथीमुळे युरोपमधील निम्म्याहून अधिक लोकं दगावली होती. तथापि, प्रतिजैविकांच्या उपलब्ध झाल्यामुळे या आजार उपचार करणे शक्य झालं. वेळेवर उपचार न केल्यास ब्यूबॉनिक प्लेगमुळे मरण पावण्याचे प्रमाण ते ३० ते ६० टक्क्यांपर्यंत आहे. तर सेप्टेसीमिक (रक्तप्रवाहात रक्ताभिसरण) आणि न्यूमोनिक प्रकारामध्ये मृत्यूदर हा थेट १०० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. वेळेवर निदान करून त्यावर उपचार केल्यास या आजाराचा मृत्यूदर हा केवळ १० टक्के आहे.
लक्षणं काय?
डब्ल्यूएचओनुसार अचानक ताप येणे, थंडी वाजणे, डोके व अंगदुखी आणि अशक्तपणा, उलट्या होणे आणि मळमळ होणे ही ब्यूबोनिक प्लेगची प्रमुख लक्षणं आहेत, या आजारामध्ये शरीरावर लिम्फ नोड म्हणजेच मोठ्या आकाराच्या गाठी तयार होतात. त्याला बल्ब म्हणतात. वेळीच उपचार न मिळाल्यास या गाठीचा आकार एखाद्या कोंबडीच्या अंडाचा आकारऐवढा वाढू शकतो. संसर्गाचे प्रमाण अधिक असेल तर शरीरावरील सूजलेल्या लिम्फ नोड्समधून पू बाहेर पडतो आणि फोडांचे रुपांतर जखमांमध्ये होते. आजाराच्या पुढच्या टप्प्यात तो न्यूमोनिक प्लेगमध्ये रुपांतरीत होतो. मेयो क्लिनिकच्या मते सेप्टिकाइमिक प्लेगमुळे रक्तप्रवाहात अडथळा येऊन शरीराच्या पेशी मृत होतात. त्यानंतर बोटं आणि नाकाची त्वचा काळी पडते.