शेअर मार्केटमध्ये अनेकांना रस असतो. पण शेअर मार्केटची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी शेअर मार्केटमधील काही टर्म जाणून घेणार आहोत. मार्च महिन्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीने ‘बायबॅक’ धोरण राबवल्याचे अनेकांनी ऐकले असेल. विविध कंपन्या ‘बायबॅक’ धोरण राबवत असतात. या अनुषंगाने शेअर मार्केटमधील ‘बायबॅक’ संकल्पना, ‘बायबॅक’ का करतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
‘बायबॅक‘ म्हणजे काय ?
‘बायबॅक’ ला मराठीमध्ये समभाग पुनर्खरेदी असे म्हणतात. एखादी कंपनी तिच्या विद्यमान भागधारकांकडून एका निर्धारित किमतीला कंपनीचे समभाग खरेदी करते यालाच समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणतात. कंपनीकडून बाजारभावापेक्षा अधिक किमतीने गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदी केले जातात. प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) अगदी विरुद्ध अशी ही प्रक्रिया आहे. सामान्यतः कंपन्या जेव्हा बाजारात मागणी वाढवू इच्छितात तेव्हा शेअर बायबॅक करतात. शेअर बायबॅकमुळे चलनात असलेल्या शेअर्सची संख्या कमी होते, ज्यामुळे शेअरची किंमत आणि प्रति शेअर कमाई (EPS) वाढते. जेव्हा एखादी कंपनी शेअर्स परत विकत घेते तेव्हा ती शेअर्सची संख्या आणि कॅपिटल बेस कमी करते. अशा प्रकारे कंपनीचे EPS आणि ROE सुधारतात.
हेही वाचा : शेअर बाजारात वापरण्यात येणारी ‘इक्विटी’ संकल्पना काय आहे ?
कंपन्या ‘बायबॅक’ का करतात ?
कंपन्यांकडून शेअर बायबॅक केली जाण्याची अनेक कारणे आहेत. बऱ्याचदा कंपन्यांच्या ताळेबंदात बरीच रक्कम असते. बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या नियमानुसार, एका ठरावीक कालावधीत कंपन्यांना शिल्लक रकमेचा विविध कार्यासाठी, गुंतवणुकीसाठी किंवा कंपनीच्या विस्तारासाठी वापर करावाच लागतो आणि त्या व्यतिरिक्तदेखील ठराविक काळ कंपनीकडे अतिरिक्त निधी पडून असल्यास कंपनीला लाभांशाच्या माध्यमातून भागधारकांमध्ये तो वितरित करावा लागतो. शिवाय लाभांश वितरण करपात्र ठरविले गेल्यापासून, ताळेबंदात राखीव रकमेत असलेल्या कंपन्यांकडून भागधारकांच्या पदरी लाभ पोहोचविताना, लाभांशापेक्षा समभागांच्या अधिमूल्यासह पुनर्खरेदीचा मार्ग अनुसरला जातो.
हेही वाचा : २४ तासात रोज जगभरातील लोक काय काय करतात? काम, झोप, जेवण; कशी होते दिवसाची विभागणी, पाहा रिपोर्ट
‘बायबॅक’ची प्रक्रिया कशी असते?
कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीतील गंगाजळीचा आढावा घेऊन बायबॅकचा प्रस्ताव ठेवण्यात येतो. कंपनीच्या संचालकांनी बायबॅकच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर कंपनी बायबॅकसाठी एक सूचना जाहीर करते. यामध्ये बायबॅक किंमत, रेकॉर्ड डेट आणि बायबॅक कालावधी नमूद केला जातो. रेकॉर्ड डेट म्हणजेच कंपनीने निश्चित केलेल्या तारखेला तुमच्याकडे त्या कंपनीचे समभाग असणे आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे भागधारक समजले जातात आणि रेकॉर्ड तारखेला कंपनीच्या खतावण्यात भागधारक म्हणून तुमची नोंद असते. असे पात्र भागधारक कंपनीच्या बायबॅकमध्ये सहभागी होऊ शकतात. कंपनी ज्या प्रमाणात समभागांची पुनर्खरेदी करू पाहतेय, त्याच प्रमाणत भागधारकांकडील समभाग खरेदीसाठी पात्र समभाग किती हे देखील कंपनीकडून भागधारकांना ई-मेल संदेशाद्वारे कळविले जाते. भागधारक त्यांच्याकडील सर्वच समभाग या प्रक्रियेत कंपनीला विकू शकत नाहीत.
हेही वाचा : एकाच विमानातील दोन पायलट्सना देण्यात येते वेगवेगळे जेवण; कारण ऐकून व्हाल थक्क…
कंपन्यांसाठी बायबॅक फायदेशीर कसा असतो?
कंपनी बायबॅकची घोषणा करून एक प्रकारे भागधारकांना आणि बाजारातील गुंतवणूकदारांना कंपनी सशक्त आहे, असा संदेश देत असते. म्हणजेच कंपनीचा तिचा व्यवसायावर विश्वास असून कंपनी भविष्यात अधिक चांगली कामगिरी करेल, असा संदेशदेखील कंपनी देत असते. यामुळे इतर गुंतवणूकदारदेखील कंपनीच्या समभागाकडे आकर्षित होऊन समभाग खरेदी करतात आणि मागणी वाढल्यामुळे कंपनीच्या समभागाची किंमत देखील वधारते.