CCTV Camera Types : सीसीटीव्ही (CCTV) म्हणजे Closed Circuit Television (क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन). हे एक व्हिडीओ निरीक्षण (देखरेख) तंत्रज्ञान आहे. ज्यामध्ये कॅमेरे विशिष्ट जागेचं निरीक्षण करतात आणि त्याचं चित्रण करतात. म्हणजेच कॅमेऱ्याचंच विकसित तंत्रज्ञान आहे जे कुठल्याही गोष्टीवर, घरावर, परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी तयार केलेलं असतं. या कॅमेऱ्याद्वारे एखादी जागा अथवा परिसर मॉनिटर (निरक्षण) केला जातो. त्या जागेवर जे काही घडतंय त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करून हे चित्रण साठवून ठेवलं जातं. हे सामान्य टेलिव्हिजन प्रसारणापेक्षा थोडं वेगळं आहे. कारण यातील व्हिडीओ हे सर्वांसाठी नसतात. केवळ हे कॅमेरे बसवणाऱ्या व अधिकृत व्यक्तीच या कॅमेऱ्यांनी केलेलं चित्रण पाहू शकतात.

सुरक्षा, निरीक्षण, पुरावे गोळा करणे, प्रतिबंधात्मक उपाय व रिअल टाइम मॉनिटरिंग या गोष्टींसाठी सीसीटीव्हीचा वापर केला जातो.

सीसीटीव्हीचा वापर कशासाठी केला जातो?

१. संरक्षण

घर, कार्यालय, दुकाने, बँका, आणि सार्वजनिक ठिकाणी चोरी, दरोडा किंवा इतर गुन्हे टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातात. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारांना ओळखण्यासाठी हे उपयुक्त आहे.

२. देखरेख

कारखाने, शाळा, रुग्णालये आणि वाहतूक व्यवस्थेत कर्मचारी, विद्यार्थी किंवा लोकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. कुठल्याही गोष्टीवर देखरेख करण्यासाठी पूर्वी माणसं असायची. आता एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवला तर तो २४ तास कोणत्याही अडथळ्याशिवाय या गोष्टींची देखरेख करू शकतो.

३. पुरावे गोळा करणे

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत एखादा गुन्हा घडला तर त्या कॅमेऱ्याने केलेलं चित्रण पुरावा म्हणून न्यायालयात वापरलं जातं. गुन्हेगाराची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याने केलेलं चित्रण उपयोगी पडतं. तसेच इतर पुरावे देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मिळतात.

४. प्रतिबंधात्मक उपाय

एखाद्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला असेल तर गुन्हेगारी कृत्यांना आपोआप आळा बसतो. कारण गुन्हेगारांना माहिती असतं की आपल्यावर लक्ष ठेवलं जात आहे. मुंबईसारख्या शहरात महापालिका व पोलीस प्रशासनाने लाखो कॅमेरे बसवले आहेत. यासह खासगी कॅमेऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

५. रिअल-टाइम मॉनिटरिंग

मोठ्या कार्यक्रमांमध्ये (उदा. मैफिली, सभा) किंवा विमानतळ, रेल्वे स्थानकांसारख्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी निरीक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे उपयोगी पडतात.

CCTV कॅमेऱ्यांचे प्रकार

CCTV कॅमेऱ्यांचे अनेक प्रकार असून ते त्यातील तंत्रज्ञानावर, वापरावर आणि डिझाइनवर आधारित वर्गीकृत केले जातात.

१. अ‍ॅनालॉग सीसीटीव्ही कॅमेरा : हे पारंपरिक कॅमेरे आहेत. अ‍ॅनालॉग स्वरुपात व्हिडीओ रेकॉर्ड करतात. या कॅमेऱ्यांना डीव्हीआरची (डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डर) आवश्यकता असते.

२. आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) सीसीटीव्ही कॅमेरा : हे आधुनिक डिजिटल कॅमेरे आहेत जे इंटरनेटवर डेटा साठवून ठेवतात व पाठवतात. या कॅमेऱ्यांचं रिझॉल्यूशन जास्त असतं. तसेच ते NVR (नेटवर्क व्हिडीओ रेकॉर्डर) सोबत वापरले जातात.

३. डोम कॅमेरा : हे गोलाकार आकाराचे कॅमेरे असतात, जे सहसा घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये वापरले जातात. यांचा आकार लहान आणि आकर्षक असतो. बँकांच्या एटीएममध्ये तुम्हाला हे कॅमेरे पाहायला मिळतील.

४. बुलेट कॅमेरा : हे कॅमेरे लांब व आकाराने मोठे असतात. मोठ्या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी, दूरपर्यंतच्या गोष्टींवर देखरेख करण्यासाठी हे कॅमेरे वापरले जातात. सिग्नलवर तुम्हाला हे कॅमेरे पाहायला मिळतील.

५. पीटीझी (Pan-Tilt-Zoom) कॅमेरा : हे कॅमेरे फिरवता येतात, झुकवता येतात आणि झूम करता येतात. यांचा वापर मोठ्या क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी होतो. मॉल्समध्ये, चौकांमध्ये, मोठ्या मैदानांवर असे कॅमेरे बसवलेले असतात.

६. थर्मल कॅमेरा : हे कॅमेरे रात्री किंवा कमी प्रकाशातही प्रभावी असतात. बँकांच्या आसपास असे कॅमेरे बसवलेले असतात.

७. वायरलेस CCTV कॅमेरा : हे वाय-फायद्वारे काम करतात आणि यांना वायरिंगची गरज नसते.

Story img Loader