What Is Chatgpt Ghibli Studio: ओपनएआयच्या चॅट जीपीटीने नुकतेच युजर्ससाठी नवी इमेज जनरेटर सेवा सुरू केली आहे. या इमेज जनरेटर सेवेचे नाव घिब्ली स्टुडिओ असे आहे. दरम्यान ही सेवा सुरू झाल्यानंतर याबाबत इंटरनेटवर याची खूप चर्चा होत आहे. या सेवेतील कलाकृती माय नेबर टोटोरो आणि प्रिन्सेस मोनोनोके सारख्या प्रसिद्ध जपानी अ‍ॅनिमेशन स्टुडिओ घिब्लीच्या छायाचित्रांपासून प्रेरित आहेत.

सध्या जगभरातील सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर चॅट जीपीटीच्या घिब्ली जनरेटेड कलाकृतींचा पूर आल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक युजर्स याचा वापर करून त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि इतरांचे एआय-जनरेटेड घिब्ली शैलीतील छायाचित्र तयार करत आहेत. इतकेच नव्हे तर अने बड्या ब्रँड्सना देखील या ट्रेंडची भुरळ पडली असून, ते याचा वापर त्यांच्या जाहिरातीसाठी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

चॅट जीपीटीवरील या नवीन वैशिष्ट्यामुळे युजर्स मोठ्या प्रमाणात घिब्ली शैलीतील एआय जनरेटेड छायाचित्र तयार करत आहेत. याचबरोबर ही घिब्ली शैलीतील छायाचित्रे ते सोशल मीडियावरही शेअर करत आहेत.

मुख्यमंत्र्यांनाही भूरळ

दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चॅट जीपीटीच्या घिब्लीची भूरळ पडली असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा घिब्ली शैलीतील छायाचित्र एक्सवर शेअर केले आहे. या छायाचित्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा दिसत आहेत.

ट्रम्प यांच्यापासून शहारूखपर्यंत अनेकांची छायाचित्रे व्हायरल

ओपनएआयच्या चॅट जीपीटीने बुधवारी सुरू केलेल्या या सेवेनंतर अनेक युजर्सनी घिब्ली शैलीतील एलोन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची छायाचित्रे शेअर केली आहेत. याचबरोबर या छायाचित्रांमध्ये द लॉर्ड ऑफ द रिंग्जमधील दृश्ये आणि अगदी ११ सप्टेंबरच्या हल्ल्यांचे चित्रणही दर्शविले आहे. तसेच बॉलिवूड चित्रपटांमधील फिर हेरा फोरी, बाहुबली, भुलभुलैय्या आणि शाहरूख खानच्या जगप्रसिद्ध दिलवाले दुल्हनिया ले जायेंग यातील काही दृश्यांच्या छायाचित्रांचाही समावेश आहे.

घिब्ली स्टुडिओ

१९८५ मध्ये हयाओ मियाझाकी, इसाओ ताकाहाता आणि तोशियो सुझुकी यांनी स्थापन केलेला स्टुडिओ घिब्ली हा एक प्रसिद्ध जपानी अ‍ॅनिमेशन स्टुडिओ आहे.

घिब्ली कला

घिब्ली कला म्हणजे स्टुडिओ घिब्लीच्या अनोख्या शैलीतील छायाचित्रे आहेत. ज्यामध्ये पेस्टल आणि म्यूट कलर पॅलेट आणि गुंतागुंतीच्या तपशीलांचा वापर केलेला असतो. ही दृश्य शैली तिच्या सर्जनशील खोलीमुळे आणि कथाकथनाच्या आकर्षणामुळे अ‍ॅनिमे चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे.

घिब्ली शब्दाचा अर्थ

‘घिब्ली’ या इटालियन भाषेतील शब्दाचा मराठी अर्थ “सहारा वाळवंटातून वाहणारा गरम वारा” असा आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान इटालियन स्काउटिंग विमानांशी संबंधित हा शब्द आहे. मियाझाकी यांनी विमाने आणि इटलीवरील त्यांच्या प्रेमामुळे स्टुडिओचे नाव घिब्ली असे ठेवले.