सर्वोच्च न्यायालयाने आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) वापरावर लावण्यात आलेली बंदी उठवली असून व्यवहारात वापर करण्यासाठी परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) एप्रिल २०१८ मध्ये बिटकॉइनसारख्या आभासी चलनाच्या ट्रेडिंगवर बंदी आणली होती. आरबीआयने बिटकॉइन तसंच इतर आभासी चलनांसंबधी नियम अत्यंत कठीण केले होते. यावेळी त्यांनी बँक आणि इतर आर्थिक संस्थांना कोणत्याही सेवा देण्यापासून बंदी आणली होती मात्र आता ही बंदी उठवण्यात आली आहे. पण क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? त्याचा इतिहास काय आहे? यासंदर्भात अनेकांना माहिती नाही. जाणून घेऊयात त्याचबद्दल…
- आभासी चलन ही संकल्पना आता जवळपास दशकभर जुनी झाली आहे. त्यामुळे आभासी चलन म्हणजे काय, हे बहुतेकांना माहीत असेलच. आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता.
- २००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली.
- एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या.
- अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही.
कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे. - अनेक देशांतील बँका, हॉटेल, कंपन्या, संकेतस्थळे यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातूनच या आभासी चलनांचे विनिमय बाजार उभे राहिले. या बाजारांत जगभरातील आभासी चलनांचे भौतिक चलनांच्या तुलनेतील मूल्य दररोज ठरते.
- ‘बिटकॉइन’ या आद्य आभासी चलनाचे मूल्य तर आकाशाला गवसणी घालत आहे. मागील वर्षी (२०१९) एप्रिल मे महिन्यामध्ये एका बिटकॉइनचे मूल्य जवळपास ९ हजार डॉलरइतके पोहोचले होते. भारतीय रुपयाच्या चौकटीत सांगायचे झाले तर एका बिटकॉइनचे मूल्य जवळपास सहा लाख सहा हजार रुपये इतके आहे.
- ‘बिटकॉइन’सारख्या सर्वच आभासी चलनांच्या घोडदौडीचे आणखी एक उदाहरण भारताच्याच अनुषंगाने देता येईल. २८ एप्रिल २०१९ रोजी एका बिटकॉइनचे मूल्य ३ लाख ६० हजार रुपये इतके होते. तेच मुल्य २८ मे २०१९ रोजी ६ लाख ६ हजार रुपयांवर पोहोचले. म्हणजेच, जर एखाद्याने एप्रिलमध्ये खरेदी केलेला एक बिटकॉइन मेमध्ये विकला तर महिनाभरात त्याला तब्बल तीन लाख रुपयांचा घसघशीत नफा कमवता आला असेल.
- तर असं हे आभासी चलनाचं वाढतं साम्राज्य. आभासी चलनाला अजूनही अनेक देशांत मान्यता मिळालेली नाही. आजही ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तरीही या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात आहे.
- साहजिकच फेसबुकने हे ताडले आणि या नव्या उद्योगात शिरकाव करण्याचा निर्णय घेतला. तसं तर फेसबुकने दहा वर्षांपूर्वीही ‘फेसबुक क्रेडिट’ हे आभासी चलन जारी केले होते.
- फेसबुकवरून खेळल्या जाणाऱ्या गेम्स किंवा वापरल्या जाणाऱ्या अॅपमधील खरेदीसाठी ‘फेसबुक क्रेडिट’चा वापर करता येत होता. त्या वेळी एका डॉलरला दहा फेसबुक क्रेडिट मिळत होते. मात्र, ‘फेसबुक क्रेडिट’ वापरकर्त्यांच्या पचनी पडले नाही. याची दोन कारणे होती. एक म्हणजे, त्या काळी फेसबुक आजच्याइतके जगभरात रुजले नव्हते आणि दुसरे म्हणजे, तोपर्यंत आभासी चलन ही संकल्पना रूढ झाली नव्हती. आज हे दोन्ही अडथळे दूर झाले आहेत.
(टीप- ‘नव्या जागतिक चलनाची नांदी?’ हा मूळ लेख आसिफ बागवान यांनी ३१ मे २०१९ च्या व्हिवा पुरवणीमध्ये लिहिला होता. तो वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )
आणखी वाचा