Daylight Saving Time : जगभरातील अनेक देशांमध्ये उन्हाळ्यात दिवस मोठे आणि हिवाळ्यात रात्री मोठ्या असतात. मग अशा परिस्थितीत अनेक देशांमध्ये डेलाइट सेव्हिंग टाइमची (Daylight Saving Time) व्यवस्था करण्यात आलेली असते. या माध्यमातून वर्षातून दोनदा घड्याळाची वेळ सेट करण्यात येत असते. घड्याळाची वेळ साधारणपणे एक तास पुढे किंवा मागे केली जाते. मात्र, तु्म्हालाही प्रश्न पडला असेल की खरंच हे शक्य आहे का? तर हो हे शक्य आहे. माहितीनुसार, अमेरिकेसह जगभरातील किमान ७० देशांत घड्याळ एक तास पुढे आणि पुन्हा एक तास मागे घेतलं जातं. अमेरिकेमध्ये मार्चमध्ये वेळ एक तास पुढे केली जाते आणि नोव्हेंबरमध्ये पुन्हा एक तास मागे केली जाते. यालाच डेलाइट सेव्हिंग टाईम म्हटलं जातं. मात्र, असं का केलं जातं? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात…
‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ म्हणजे काय?
उन्हाळ्यामध्ये घड्याळे एक तास पुढे नेण्याच्या प्रथेस ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ म्हटलं जातं. कारण या काळामध्ये सूर्यप्रकाश संध्याकाळी उशिरापर्यंत असतो. त्यामुळे उत्तर अमेरिकेतील बहुतांश भागात आणि युरोपीय देश ही प्रथा पाळतात. मात्र, इतर देश विशेषत: विषुववृत्ताजवळील प्रदेश असं करत नाहीत. खरंतर ही प्रथा आधीपासूनच वादग्रस्तच ठरलेली दिसून येते. कारण जगातील अनेक देशांनी ही प्रथा स्वीकारली आणि अनेक देशांनी या प्रथेला विरोधही केला आहे. ऊर्जेच्या सुसंगत वापरासाठी काही देश अशा प्रकारे ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ सेट करत असतात.
हेही वाचा : History Of Clock : घड्याळाचे काटे उजवीकडून डावीकडे का फिरतात? माहितीये का? जाणून घ्या!
२०२४ चा ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ कधी संपणार?
रिपोर्टनुसार, डेलाइट सेव्हिंग टाइम २०२४ मध्ये ३ नोव्हेंबर रोजी संपेल. मग काही देशांमध्ये घड्याळे एक तास मागे घेतली जातील. उन्हाळ्याच्या महिन्यांत घड्याळे एक तास पुढे नेण्याची प्रथा आहे. ही प्रथा उत्तर अमेरिका आणि युरोपच्या बहुतेक भागात पाळली जाते.कारण त्यांचा असा विश्वास आहे की वेळेतील बदल त्यांना सूर्यास्तापूर्वीचे तास अधिक उत्पादनक्षमतेने वापरण्यास अनुमती देईल. अमेरिकेत ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ मार्चमधील दुसऱ्या रविवारी सुरू होतो आणि नोव्हेंबरमधील पहिल्या रविवारी संपतो.
‘डेलाइट सेव्हिंग’ का तयार केला गेला?
ऋतूंनुसार घड्याळे बदलण्याची ही कल्पना १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात समोर आली. न्यूझीलंडचे कीटकशास्त्रज्ञ जॉर्ज हडसन यांनी ऊर्जाबचतीसाठी आणि उन्हाळ्याच्या उजेडाचे दिवस वाढवण्यासाठी हे सुचवण्यात आले होते. पहिल्या महायुद्धापर्यंत ही कल्पना फारशी रूढ नव्हती. मात्र, पुढे इंधनबचतीसाठीच्या उपायांचा शोध घेताना युरोपीय देशांनी ही पद्धत स्वीकारण्यास सुरुवात केली. १९१६ मध्ये ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ स्वीकारणारा जर्मनी हा पहिला युरोपीय देश होता आणि त्यानंतर १९१८ मध्ये अमेरिकेने ही पद्धत स्वीकारली. अमेरिकेनंतर १९६६ मध्ये एकसमान प्रमाणवेळेच्या कायद्यात ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’चा अंतर्भाव करण्यापूर्वी या प्रथेत अनेक बदलही करण्यात आले. आता वास्तवात ज्या देशात ही पद्धत राबवण्यात येते तेथील शेतकरी या प्रथेमुळे त्यांच्या वेळापत्रकात व्यत्यय येत असल्याचा आरोप करत या प्रथेला विरोधही करतात.