What is Decidophobia: आपल्याला दोन किंवा अनेक पर्यायांमधला नेमका योग्य निवडता न येणं, निवडताना गोंधळ उडणं आणि सरतेशेवटी ठरवण्याशिवाय पर्यायच नाही म्हणून कुठलातरी पर्याय निवडणं असं तुमच्याबाबत कधी घडलंय का? असेल, तर बऱ्याचदा ते स्वाभाविक किंवा प्रासंगिक असू शकतं. पण एखाद्याच्या बाबत हे नेहमीच किंवा प्रत्येक वेळी होत असेल, तर कदाचित त्या व्यक्तीमध्ये डिसायडोफोबिया अर्थात निर्णयभयाची किंवा निर्णयाच्या भयगंडाची लक्षणं असू शकतात! मनुष्यप्राण्याच्या अगणित मानसिक अवस्थांपैकी ही एक अवस्था आहे.
एखाद्या हॉटेलमध्ये किंवा रेस्तराँमध्ये मेनूकार्ड वारंवार चाळणारी माणसं तुम्ही कधी बघितली आहेत का? काही ठरवता न येणं किंवा नेमक्या निर्णयावर येण्यासाठी विलंब लागणं हे डिसायडोफोबियाचं लक्षण असेलच असं नाही. साधारण परिस्थितीत अशी अवस्था म्हणजे संबंधित व्यक्ती अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व गोष्टींची व्यवस्थित खातरजमा करून मगच काहीतरी ठरवते, असा त्याचा अर्थ निघू शकतो. पण डिसायडोफोबियामध्ये अशा गोष्टी कधीकधीच न घडता प्रत्येक वेळी घडू शकतात!
डिसायडोफोबिया म्हणजे नेमकं काय?
सर्वप्रथम आपण फोबिया म्हणजे काय? हे समजून घेऊ. “फोबिया म्हणजे एखादी व्यक्ती, ठिकाण किंवा अगदी एखाद्या परिस्थितीची अनाकलनीय अशी भीती वाटणं म्हणजे फोबिया अर्थात भयगंड. आणि जर निर्णय घेताना प्रत्येकवेळी ही अशी भीती वाटत असेल, तर तो झाला निर्णयाचा भयगंड”, अशी या फोबियाची साधी सोपी व्याख्या दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलचे वरीष्ठ सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजीव मेहता यांनी केली आहे.
एखाद्या निर्णयाचे सकारात्मक व नकारात्मक असे परिणाम पडताळून पाहणं ही सर्वोत्तम पर्याय निवडण्याची सर्वोत्तम पद्धत असू शकेल. पण काही लोकांसाठी निर्णय घेण्याचा साधा विचार किंवा प्रत्यक्ष कृती या दोन्ही गोष्टी ताण व अतिचिंतेला कारणीभूत ठरू शकते. पण एखाद्याला डिसायडोफोबिया आहे, हे कसं समजणार?
डॉ. राजीव मेहता यांनी यावर सविस्तर विश्लेषण केलं आहे. “साधारणपणे डियासडोफोबिया ही स्वतंत्रपणे उद्भवणारी बाब नाही. हा प्रकार अँझायटी डिसॉर्डर, नैराश्य आणि कम्पल्सिव्ह डिसॉर्डरचा भाग म्हणून उद्भवू शकतो”, असं डॉ. मेहता यांनी नमूद केलं आहे. ऑब्सेसिव्ह-कम्पल्सिव्ह (सोप्या भाषेत तेच ते वर्तन वारंवार करण्याचे विचार वा कृती), अॅन्क्शियस-अवॉइडंट (सतत कोणत्या ना कोणत्या चिंताग्रस्ततेतून गोष्टींचा सामना करण्यास टाळाटाळ करणे) किंवा परावलंबी व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तींमध्येही हा प्रकार दिसून येऊ शकतो. जेव्हा या गोष्टीमुळे आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये बाधा येऊ लागते, तेव्हा ही बाब प्रचंड मनस्ताप निर्माण करते. काहींना तर त्यांची नेहमीची कामं करणं, नातेसंबंध जपणं आणि कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता दर्शवणं यातही समस्यांचा सामना करावा लागतो.
डिसायडोफोबिया असल्यास काय करावं?
कोणतेही उपचार सुरू करण्यापूर्वी आपल्याला खरंच डिसायडोफोबिया आहे की नाही, याची योग्य पद्धतीने खात्री करून घेणं आवश्यक आहे. “जर एखाद्या व्यक्तीमध्ये डिसायडोफोबिया हा चिंताग्रस्तता किंवा नैराश्याचा भाग म्हणून उद्भवला असेल, तर त्यासाठी मानसोपचार व औषधे अशा दोन्ही प्रकारे उपचार करण्याची आवश्यकता असते”, असं डॉ. मेहता यांनी स्पष्ट केलं आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असणारी उपचार पद्धती मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच ठरवता येऊ शकते.
याशिवाय, संबंधित व्यक्ती त्यांच्या या स्थितीवर मात करण्यासाठी त्यांची निर्णयक्षमता टप्प्याटप्प्याने सुधारण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करू शकते. म्हणजे फक्त मनातच निर्णय घेण्यासाठी गोष्टींचा विचार न करता प्रत्यक्ष कागदावर सर्व पर्याय लिहून काढून मग त्यातून एकाची निवड करणं जास्त सोयीस्कर ठरतं. त्यातून मग प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि तोटे यांची यादी तयार करा आणि त्यानंतर सर्वात जास्त फायदे आणि सर्वात कमी तोटे असणाऱ्या पर्यायाची निवड करा. एक मात्र डोक्यात कायम ठेवणं गरजेचं आहे. ज्याच्यात कोणतीच नकारात्मक बाजू नाही, असा पर्याय मिळणं ही अतिशय दुरापास्त बाब असते!
सूचना: हा लेख सार्वजनिक व्यासपीठांवर उपलब्ध माहितीच्या आधारे आणि/किंवा आम्ही चर्चा केलेल्या तज्ज्ञांच्या माहितीच्या आधारे लिहिलेला आहे. कोणतेही उपचार सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.