Difference Between E-ticket and I-ticket: भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. सर्वात जलद आणि स्वस्त प्रवासासाठी भारतीय रेल्वे ही ओळखली जाते. यामुळे जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय रेल्वेचा विस्तार हा सर्वात मोठा आहे. परंतु या रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रत्येक प्रवाश्याला तिकीट अनिवार्य असते. रेल्वेचे जसे अनेक प्रकार आहेत, जसे की, एसी ट्रेन, सुपरफास्ट ट्रेन, लोकल, एक्स्प्रेस, तसेच त्यांच्या तिकीटांमध्ये अनेक प्रकार आहे. तुम्ही कधी रेल्वेने प्रवास करताना ई-तिकीट (E-ticket) आणि आय- तिकीटाबाबत (I-ticket) ऐकले आहे का? अनेक प्रवाशांना अद्याप ई-तिकीट आणि आय-तिकीटमध्ये नेमका काय फरक असतो हे माहित नाही. त्यामुळे हा फरक नेमका काय जाणून घेऊ…
भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट ऑनलाईन बुक करण्याचा पर्याय मिळतो. एकतर तुम्ही थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाऊन तिकीट बुक करु शकता किंवा घरबसल्या ऑनलाईन बुकिंग करु शकता. पण ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्येही दोन पर्याय दिले जातात. हे तिकीट तुम्ही एकतर ई- तिकीट किंवा आय-तिकीट स्वरुपात असू शकते. साधारणपणे ई-तिकीट हे प्रिंटेड तिकीट असते, तर आय-तिकीट हे भारतीय रेल्वेकडून प्रवाशाला कुरियर केले जाते.
ई-तिकीट म्हणजे काय?
ई-तिकीट म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रिंटेड तिकीट. प्रवाशांना आपल्या सोयीनुसार हे तिकीट प्रिंट करुन घेता येते. ई-तिकीट हे रेल्वे काउंटरवर न जाता घरबसल्या किंवा कोणत्याही कॉम्प्युटर कॅफेमधून ऑनलाईन बुक केले जाते. पण त्या तिकीटती वैधता ही रेल्वे तिकीट बुकिंग काउंटरवरून घेतलेल्या तिकीटासारखीच आहे. पण ई-तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्या एक सरकारी ओळखपत्र (आधार कार्ड, पॅनकार्ड) ठेवणे आवश्यक आहे.
आय-तिकीट म्हणजे काय?
आय-तिकीट हे भारतीय रेल्वेच्या वतीने प्रवाशांच्या पत्त्यावर कुरियर केले जाते. हे तिकीट इंटरनेटवरून जरी बुक केले असले तरी ते प्रिंट करता येत नाही. आयआरसीटीसी वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही दिलेल्या पत्त्यावर रेल्वेकडून ते कुरिअर केले जाते. हे तिकीट प्रवाशांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान ४७ तास लागतात. महत्त्वाचे म्हणजे आय-तिकीट प्रवासाच्या दोन दिवस आधी बुक केले पाहिजे. तसेच कुरियर आलेले तिकीट घेण्यास घरात कोणीतरी असले पाहिजे, अन्यथा ही प्रक्रिया खूप लांबू शकते.
या दोन्ही तिकीटांमध्ये नेमका फरक काय?
भारतीय रेल्वेच्या आय-तिकीटापेक्षा ई-तिकीट किंचित स्वस्त आहेत. कुरियरची किंमत भरून काढण्यासाठी आय- तिकीटामध्ये डिलिव्हरी शुल्क देखील समाविष्ट आहे. तुम्ही प्रवास करण्याच्या दिवशी ई-तिकीट बुक करु शकता. पण आय-तिकीट दोन दिवस अगोदर बुक करावे लागते. ई-तिकीट रद्द करणे सोपे आहे, जे ऑनलाइन रद्द करता येते. पण आय-तिकीट ऑनलाइन रद्द करता येत नाही. यासाठी तुम्हाला रेल्वे स्थानकावर योग्य काउंटरवर जाऊन एक फॉर्म भरावा लागतो. ई-तिकीटात सीट बर्थ कन्फर्म किंवा आरएसी असतो. पण आय-तिकीट कन्फर्म, RAC किंवा वेटिंग तीन कॅटगरीमध्ये मिळू शकते.