Digital Gold Investment : पूर्वी सोन्याचा वापर चलन म्हणून केला जायचा. सोन्याच्या नाण्यांना अनन्यसाधारण महत्त्व होतं. खरं तर सोनं हे गेल्या ३००० वर्षांहून अधिक काळापासून मौल्यवान वस्तूंचे भांडार म्हणून ओळखले जाते. भारतात सोन्याला एक धार्मिक महत्त्वसुद्धा आहे. सोन्याला ‘देवाचे पैसे’ मानले जातात आणि कोणत्याही शुभ प्रसंगी सोने मंदिरांना अर्पण केले जातात. याच कारणाने भारत आज जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार बनला आहे.

जागतिक महामारीच्या काळात भारतीयांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा एक नवीन मार्ग शोधला होता, तो म्हणजे डिजिटल गोल्ड. करोना काळात लोक दागिन्यांच्या दुकानांना किंवा विक्रेत्यांना भेट देण्यास टाळायचे; अशावेळी ऑनलाइन सोने खरेदी करणे हा गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय ठरला. पण, तुम्हाला डिजिटल गोल्ड म्हणजे काय हे माहितीये का? हे जाणून घेण्यापूर्वी आपण गेल्या काही वर्षांपासून सोन्यात कशी गुंतवणूक करत आहोत हे जाणून घेऊ या.

१. नाणी
२. बुलियन (सोन्याची बिस्किटे- किमान ९९.५ टक्के शुद्ध सोने म्हणून ओळखले जाते.)
३. दागिने

याशिवाय सॉवरेन गोल्ड बाँड्स (Sovereign Gold Bonds), गोल्ड म्युच्युअल फंड्स (Gold Mutual Funds) आणि गोल्ड ईटीएफ (Gold ETFs) आहेत.

पण, करोना काळात सोन्यात गुंतवणूक करण्याची आणखी एक पद्धत प्रचंड लोकप्रिय झाली, ती म्हणजे डिजिटल गोल्ड. हे डिजिटल गोल्ड म्हणजे काय, ते कसे काम करते, यामध्ये गुंतवणूक कशी करावी याविषयी द फाइनेंशियल एक्स्प्रेसनी एका वृत्तात सविस्तर माहिती सांगितली आहे.

डिजिटल गोल्ड म्हणजे काय?

डिजिटल गोल्ड ऑनलाइन खरेदी करता येते आणि ग्राहकाच्या वतीने विक्रेत्याकडून ते विमाधारकाच्या सुरक्षित तिजोरीत साठवता येते, यासाठी तुम्हाला फक्त इंटरनेट किवा मोबाइल बँकिंगची आवश्यकता असते आणि तुम्ही कधीही, कुठेही डिजिटल पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करू शकता.

डिजिटल गोल्डमध्ये कशी गुंतवणूक करावी?

पेटीएम, गूगल पे आणि फोन पेसारख्या अनेक मोबाइल ई-वॉलेटमधून तुम्ही डिजिटल सोन्यात गुंतवणूक करू शकता. एचडीएफसी सिक्युरिटीज आणि मोतीलाल ओसवालसारख्या ब्रोकर्सकडूनदेखील डिजिटल सोन्यात गुंतवणूक करता येते.

पेटीएम, जी-पे इत्यादी अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स फक्त सेफगोल्ड आणि एमएमटीसी पीएएमपी या मेटल ट्रेडिंग कंपन्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतात. एकदा तुम्ही डिजिटल सोन्यात गुंतवणूक केली की, या ट्रेडिंग कंपन्या तितक्याच प्रमाणात फिजिकल सोने खरेदी करतात आणि ते तुमच्या नावाने सुरक्षित तिजोरीत ठेवतात. डिजिटल सोन्यात तुम्ही कशी गुंतवणूक करू शकता, हे जाणून घेऊ या.

सुरुवातीला ग्रो, पेटीएम, एचडीएफसी सिक्युरिटीज, जी-पे, मोतीलाल ओसवाल इत्यादी डिजिटल गोल्डच्या गुंतवणुकीची सेवा देणाऱ्या कोणत्याही प्लॅटफॉर्मला भेट द्या.

१. INR किंवा ग्रॅममध्ये तुम्ही रक्कम टाका- तुम्ही एका ठराविक किमतीचे सोने खरेदी करू शकता किंवा थेट बाजार मूल्य लक्षात घेऊन वजनानुसार खरेदी करू शकता.

२. पेमेंट पद्धत निवडा – तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण केली की तुम्हाला खाते, कार्ड किंवा वॉलेट असे अनेक पेमेंट पर्याय दिसेल, त्यातील एक पर्याय निवडा.

३. तुमचे सोने सुरक्षित लॉकरमध्ये ठेवा – तुमचे खाते त्वरित अपडेट केले जाईल आणि तुम्ही कधीही ते तपासू शकता.

४. तुम्हाला पाहिजे तेव्हा विकू शकता – तुम्ही तुमचे सोने डिजिटल पद्धतीने विकू शकता.

५. सोने डिलिव्हरीच्या स्वरुपात मागवू शकता – जर तुम्ही सोने विकत नसाल तर तुम्ही नाणी किंवा बुलियन (सोन्याच्या बिस्किटांच्या) च्या स्वरूपात तुमचे सोने घरी मागवू शकता.

Story img Loader