Doomscrolling : सध्याच्या घडीला एक शब्द चांगलाच चर्चेत आहे तो म्हणजे डूमस्क्रोलिंग (Doomscrolling) डूमस्क्रोलिंग म्हणजे नेमकं काय? ते टाळण्यासाठी काय करता येऊ शकतं हे आपण जाणून घेणार आहोत. स्मार्ट फोन ही आता जवळपास प्रत्येकाजचीच गरज झाली आहे. अशात डूमस्क्रोलिंगची सवय लागली तर त्यामुळे डोळ्यांना, मेंदूला इजा होऊ शकते. तसंच मानसिक आरोग्य आणि शारिरीक आरोग्य या दोहोंवर परिणाम होतात.
काय आहे डूमस्क्रोलिंग (What is Doomscrolling?)
डूमस्क्रोलिंगचा अर्थ कुठलीही व्यक्ती तिचा ऑनलाइन स्क्रोलिंगचा वेळ हा नकारात्मक बातम्या, नकारात्मक व्हिडीओ, तसेच फोटो किंवा नकारात्मक माहिती मिळवण्यात घालवते. हे सातत्याने करण्याची सवय लागणे म्हणजे डूमस्क्रोलिंग. याचा परिणाम शारिरीकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या होतो. लहान मुलांना असो किंवा मोठ्या माणसांना असो कुणालाही डूमस्क्रोलिंगची सवय लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डूमस्क्रोलिंग हा शब्द नेमका कधी प्रचलित झाला?
२०२० च्या सुरुवातीला म्हणजेच साधारण कोव्हिडच्या काळात डूम स्क्रोलिंग हा शब्द चांगलाच प्रचलित झाला. कारण करोना साथीच्या संदर्भातल्या बातम्यांचा भडीमार त्यावेळी होत होता. किती रुग्ण कुठे आढळले? पॉझिटिव्ह किती? मृत्यू किती झाले? अशा बातम्या मोठ्या प्रमाणावर वाचल्या गेल्या. त्याचप्रमाणे युद्ध, गुन्हेगारी संदर्भातल्या बातम्या, अतर्क्य वाटणाऱ्या बातम्या रस घेऊन वाचणे, एक बातमी स्क्रोल केल्यानंतर दुसरी तशाच प्रकारची बातमी किंवा माहिती वाचणे म्हणजेच डूमस्क्रोलिंग जे २०२० च्या दरम्यान बरंच केलं गेलं.
लोक डूमस्क्रोलिंग का करतात?
लोक डूमस्क्रोलिंग करतात कारण सोशल मीडिया फिडवर त्या प्रकारची नकारात्मक माहिती समोर येते.
अनेदा असं फीड पाहिल्यानंतर लोक चर्चाही त्याच पद्धतीने करतात. त्यामुळे हे अशा प्रकारचं फिड पाहण्यास चालना मिळते.
एक दोनदा अशा प्रकारचं फिड पाहिलं गेलं तर पुन्हा तशाच संदर्भातले मेसेज पाठवले जातात. जे फिड समोर येतं त्याला काही अंत नसतो.
डूमस्क्रोलिंगमुळे काय नुकसान होतं?
डूमस्क्रोलिंगमुळे लहान मुलं असोत किंवा मोठी माणसं त्यांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर परिणाम होतो
नकारात्मक बातम्या, माहिती यामुळे विचार आणि भावनाही तशाच पद्धतीच्या होऊ लागतात.
अकारण चिंता आणि काळजी वाढू लागते, उदास वाटू लागतं.
या सगळ्या गोष्टी सातत्याने झाल्या तर मानसिक आरोग्य दीर्घकाळासाठी बिघडू शकतं.
डूमस्क्रोलिंगच्या सवयीपासून बचाव कसा कराल?
डूमस्क्रोलिंग करण्याची सवय सोडायची असेल तर मोबाइल जपून वापरा
स्क्रिन टाइम कमीत कमी ठेवा, त्यासाठी बंधनं घालून घ्या
स्क्रोल करताना शक्यतो नकारात्मक माहिती, बातम्या पाहणे टाळा
लहान मुलांच्या हाती मोबाइल देताना त्यावर आई वडिलांनी लक्ष ठेवणं आवश्यक. त्यांच्या नियंत्रणातच मोबाइल वापरु देणं आवश्यक
असे छोटे छोटे उपाय करुन डूमस्क्रोलिंगच्या सवयी टाळता येतात.