European Union Countries and Their Rights : युरोपियन युनियन अर्थात युरोपियन महासंघ ही युरोप खंडातील २७ देशांची एक राजकीय आणि आर्थिक संघटना आहे. ही संघटना १९९३ मध्ये मास्ट्रिच कराराद्वारे औपचारिकपणे स्थापन झाली आहे. परंतु, तिची सुरुवात १९५० च्या दशकात झाली आहे. युरोपियन कोळसा व पोलाद समुदाय (European Coal and Steel Community), युरोपियन आर्थिक समुदायापासून (European Economic Community) याची सुरुवात झाली. युरोपियन महासंघातील सदस्य देशांमध्ये शांतता, स्थैर्य व आर्थिक समृद्धी निर्माण करणे हे या संघटनेचं प्रमुख उद्दीष्ट आहे.

त्याचबरोबर व्यापार, पर्यावरण, सुरक्षा व मानवाधिकार यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे, युरोपिय देशांमध्ये समान अर्थव्यवस्था, समान व्यापार-नियम लागू करणे, समान चलन (युरो) अस्तित्त्वात आणणे ही या संघटनेची इतर महत्त्वाची उद्दीष्टे आहेत.

युरोपियन महासंघातील सदस्य देश कोणते?

युरोपियन महासंघात एकूण २७ सदस्य देश असून संघनेचं काम २३ भाषांमध्ये चालतं. संघटनेने २३ भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा दिलेला आहे.

  1. ऑस्ट्रिया
  2. बेल्जियम
  3. बल्गेरिया
  4. क्रोएशिया
  5. सायप्रस
  6. चेक प्रजासत्ताक
  7. डेन्मार्क
  8. अ‍ॅस्टोनिया
  9. फिनलंड
  10. फ्रान्स
  11. जर्मनी
  12. ग्रीस
  13. हंगेरी
  14. आयर्लंड
  15. इटली
  16. लात्व्हिया
  17. लिथुएनिया
  18. लक्झम्बर्ग
  19. माल्टा
  20. नेदरलँड्स
  21. पोलंड
  22. पोर्तुगाल
  23. रोमानिया
  24. स्लोव्हाकिया
  25. स्लोव्हेनिया
  26. स्पेन
  27. स्वीडन

युनायटेड किंगडम हे युरोप खंडातील बलाढ्य राष्ट्र पूर्वी युरोपियन महासंघाचं सदस्य राष्ट्र होतं. मात्र ३१ जानेवारी २०२० रोजी ब्रेक्झिटनंतर हा देश युरोपियन महासंघातून बाहेर पडला.

युरोपियन महासंघातील सदस्य राष्ट्रांना कोणते अधिकार असतात?

  • युरोपियन महासंघातील सदस्य देशांना संघटनेने आर्थिक, राजकीय अधिकार प्रदान केले असून निर्णय प्रक्रियेत सहभाग व मतदानासह इतरही अधिकार दिले आहेत.
  • सदस्य देशांना वस्तू, सेवा, भांडवल व लोकांच्या मुक्त संचलनाचा अधिकार आहे. यामुळे व्यापार व गुंतवणुकीला चालना मिळते. युरोपियन महासंघातील २० देशांनी युरो हे चलन स्वीकारलं असून त्यामुळे आर्थिक स्थैर्य व व्यापार सुलभ होतो.
  • प्रत्येक सदस्य देशाला युरोपियन संसदेत आपला प्रतिनिधी पाठवण्याचा, महासंघाच्या धोरणांवर प्रभाव टाकण्याचा अधिकार आहे.
  • सदस्य देशांना युरोपियन युनियनच्या निर्णय प्रक्रियेत मतदान करण्याचा व व्हेटोचा अधिकार आहे. व्हेटो एखाद्या देशाच्या प्रतिनिधीला किंवा देशाला दुसऱ्या प्रतिनिधीच्या किंवा देशाच्या निर्णयाला नकार देण्याचा अधिकार असतो.
  • देशांना पर्यावरण, संशोधन, सुरक्षा व संरक्षण यांसारख्या क्षेत्रात एकत्रित धोरणांचा लाभ घेण्याचा अधिकार आहे.
    महासंघाच्या निधीतून उदाहरणार्थ रिजनल डेव्हलमेंट फंडाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळते.

नागरिकांचे अधिकार

  • सदस्य राष्ट्रांमधील नागरिकांना युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे.
  • युरोपियन महासंघातील सदस्य राष्ट्रांमधील नागरिकांना कोणत्याही देशात राहण्याचा, काम करण्याचा व शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. या सर्वांना युरोपियन मानवाधिकार संघटनेचं संरक्षण मिळतं.

मर्यादा

युरोपियन महासंघाची स्थापना झाल्यामुळे यातील सदस्य देशांची प्रगती होण्यास अधिक हातभार लागला असला, सर्व राष्ट्रांची ताकद वाढली असली तरी त्यास काही मर्यादा देखील आहेत. जसे की सदस्य देशांना त्यांचं सार्वभौमत्व युरोपियन महासंघाकडे सोपवावं लागतं. जसे की व्यापाराचे करार व सीमा नियंत्रणाचे अधिकार सोपवावे लागतात. बऱ्याचदा या देशांच्या स्वायत्ततेवर मर्यादा येतात.

Story img Loader