Fixed Dose Combination Drugs : केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने १५६ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अँटीबायोटिक्स, पेनकिलर आणि मल्टीविटामिन औषधांचाही समावेश आहे. औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० च्या कलम २६ अ अंर्तगत सरकारने अधिसूचना जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. यापुढे या औषधांच्या उत्पादन तसेच विक्रीवर बंदी घालण्यात येत असल्याचे या अधिसूचनेत सांगण्यात आलं आहे. मात्र, ही फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषध म्हणजे काय? आणि सरकारने यावर बंदी का घातली? याविषयी जाणून घेऊया.
सरकारच्या अधिसूचनेत नेमकं काय म्हटलंय?
भारतातील १५६ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांवर तत्काळ प्रभावाने बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापुढे या औषधांच्या उत्पादन आणि विक्रीवर प्रतिबंध असेल. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकार आणि डीटीएबीद्वारे या औषधांच्या तपासणीसाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या अहवालात या औषधांमुळे रुग्णाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, त्यामुळे यावर बंदी घालण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली होती. ही शिफारस मान्य करत सरकारने या औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. असं सरकारने काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
हेही वाचा – सर्वाधिक लोकांची पसंती NOTAलाच का? २०२४च्या लोकसभा निवडणुकीत किती लोकांनी NOTA पर्याय निवडला?
कोणत्या कॉम्बिनेशनच्या औषधांवर बंदी घालण्यात आली?
सरकारने काढलेल्या अधिसुचनेनुसार खालील कॉम्बिनेशनच्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे.
१) मेफेनॅमिक ॲसिड + पॅरासिटामोल इंजेक्शन, २) सेट्रीझिन एचसीएल + पॅरासिटामोल + फेनिलेफ्रीन एचसीएल,
३) लेव्होसेटीरिझिन + फेनिलेफ्रिन एचसीएल + पॅरासिटामोल,
४) पॅरासिटामॉल + क्लोरफेनामाइन मॅलेट + फेनिल प्रोपेनोलामाइन आणि कॅमिलोफिन डायहाइड्रोक्लोराइड २५ एमजी + पॅरासिटामोल ३०० एमजी.
फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधं म्हणजे काय?
फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांनाच कॉकटेल औषध असंदेखील म्हणतात. ही अशी औषधं असतात, ज्यांची निर्मिती करताना त्यात विशिष्ट प्रमाणात दोन किंवा त्यापेक्षा जास्त औषधांचा वापर केला जातो.
हेही वाचा – सतत मोबाइल वापरत आहात? तुम्हालाही होऊ शकतो ‘स्मार्टफोन पिंकी सिंड्रोम’! जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार?
सरकारच्या ‘या’ निर्णयावर डॉक्टरांचे म्हणणं काय?
सरकारच्या या निर्णयाचं अनेक डॉक्टरांनी स्वागत केलं आहे. हैदराबादच्या ग्लेनेगल्स रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर हरिचरण जी. म्हणाले, “कॉकटेल औषधांचा वापर एकाचवेळी अनेक लक्षणांवर उपचार करण्यासाठी केला जातो. यामध्ये पेनकिलर, मल्टीविटॅमिन आणि अँटीबायोटिक्स या औषधांचा समावेश असू शकतो. सर्वसमावेश उपचार करण्याच्या उद्देशाने या औषधांचा वापर केला जात असला तरी त्याचा रुग्णाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.”
याशिवाय अपोलो रुग्णालयचे डॉ. सुधीर कुमार म्हणाले, “फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांमुळे रुग्णांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अनेकदा हे परिणाम गंभीर स्वरुपाचे असतात. मुळात ज्याच्या उपचारासाठी ही औषधं वापरली जातात, त्यासाठी सुरक्षित उपचार पद्धती उपलब्ध आहेत. त्यामुळे सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे.”, वरील दोन्ही डॉक्टरांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.