जागतिक भूक निर्देशांक अर्थात Global Hunger Index 2023 मध्ये भारताची मोठी घसरण झाली असून १२५ देशांच्या यादीत भारत तब्बल १११व्या स्थानी आहे. त्यामुळे भारतातील कुपोषण, उपासमार, गरिबी, बेरोजगारी हे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. भारतानं या निर्देशांकासाठी आवश्यक आकडेवारीमध्ये २८.७ मानांकन मिळवलं असून त्याआधारे भारतात उपासमारीची भीषण स्थिती असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. मात्र, एकीकडे जागतिक पातळीवर हा निर्देशांक काढला जात असताना दुसरीकडे भारतानं मात्र या निर्देशांकातील आकडे चुकीचे असल्याचं सांगत ते फेटाळले आहेत.
काय सांगतो जागतिक भूक निर्देशांक?
या निर्देशांकानुसार, भारताची पाकिस्तानच्याही खाली घसरण झाली आहे. यादीनुसार, पाकिस्तान १०२व्या स्थानी, बांगलादेश ८१व्या स्थानी तर नेपाळ ६९व्या स्थानी आहे. एकीकडे आशिया खंडातील आपल्या शेजारी राष्ट्रांच्या तुलनेत भारताचं स्थान बरंच खाली घसरलं असताना दुसरीकडे दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील देशांपेक्षा भारताचं मानांकन चांगलं असल्याचंही यादीतून स्पष्ट झालं आहे. या देशांना सरासरी प्रत्येकी २७ इतकं मानांकन मिळालं आहे.
भूक निर्देशांक का मोजला जातो?
जगभरातील विविध देश भूक किंवा उपासमारीशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करत आहेत की नाही? यावर लक्ष ठेवण्यासाठी जागतिक भूक निर्देशांक मोजला जातो. तसेच याचा वापर आंतरराष्ट्रीय क्रमवारीसाठीही केला जातो.
हेही वाचा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी नागपूरचीच निवड का केली होती?
भूक निर्देशांक कसा मोजला जातो?
जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळानुसार, जागतिक भूक निर्देशांक मोजताना उपासमारीचे तीन घटक विचारात घेतले जातात. पहिलं म्हणजे अन्नाची अपुरी उपलब्धता, दुसरं म्हणजे मुलांच्या पोषण स्थितीतील कमतरता आणि तिसरं बालमृत्यूचं प्रमाण (५ वर्षांखालील मुलांचे मृत्यू). याबाबतची माहिती ‘संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संस्था’, ‘युनिसेफ’ व ‘जागतिक आरोग्य संघटना’ यांच्याकडून घेतली जाते. या माहितीच्या आणि निकषांच्या आधारे भुकेचे बहुआयामी पद्धतीने विश्लेषण करून, गुणांची वर्गवारी करून निर्देशांक ठरवला जातो. त्या अनुषंगाने प्रत्येक देशाला ० ते १०० पॉइंट स्केलवर मानांकन दिले जातात. ० आणि १०० हे अनुक्रमे ‘सर्वोत्तम’ आणि ‘सर्वात वाईट’ मानलं जातं.
हेही वाचा- हमासने हल्ला केलेला ‘सुपरनोव्हा’ संगीत महोत्सव नेमका काय आहे?
भूक निर्देशांकांचे मानांकन आणि त्याचा अर्थ
भूक निर्देशांक मानांकन | उपासमारीची स्थिती |
५० किंवा त्याहून अधिक | अत्यंत चिंताजनक |
३५ ते ४९.९ | चिंताजनक |
२० ते ३४.९ | गंभीर |
१० ते १९.९ | मध्यम |
९.९ किंवा त्याहून कमी | कमी |