What is Hangnails, How to treat hangnails: हँगनेल्स लहान असतात, पण ते आश्चर्यकारकपणे त्रासदायक आणि वेदनादायकदेखील असू शकतात. जेव्हा तुमच्या नखांभोवती असणारी त्वचा कोरडी होते, त्याला भेगा पडतात किंवा ती खराब होते तेव्हा हॅंगनेल्स अनेकदा दिसून येतात. बहुतेक हँगनेल्स हार्मलेस असतात आणि त्यांच्यावर घरी उपचार करता येऊ शकतो, परंतु योग्य काळजी न घेतल्यास कधीकधी ते संसर्गास कारणीभूत ठरू शकतात.
हँगनेल म्हणजे काय? (What is Hangnail)
हँगनेल म्हणजे नखाच्या काठावर दिसणारा त्वचेचा एक छोटा निघालेला तुकडा. हँगनेल असं नाव असलं तरी हा नखाचा भाग नसून नखाच्या काठावरून निघून जाणाऱ्या त्वचेचा एक तुकडा आहे. हँगनेल्स असणं सामान्य आहे आणि ते वेदनादायकही असू शकतात.
हँगनेल्स का होतात?
जेव्हा तुमच्या नखांभोवतीची त्वचा कोरडी आणि खराब होते तेव्हा अनेकदा हँगनेल्स तयार होतात. याची सामान्य कारणे म्हणजे थंड हवामान, वारंवार हात धुणे किंवा कठोर रसायनांचा संपर्क. जे लोक नखे चावतात किंवा नखाच्या बाजूच्या त्वचेला वारंवार हात लावून ती खेचत असतात, त्यांनाही हँगनेल्स होण्याची शक्यता जास्त असते. जर तुमची नखे ठिसूळ असतील किंवा तुमचे हात खूप पाण्यात असतील तरीदेखील हँगनेल्स होऊ शकतात, जसे की भांडी धुताना होऊ शकतात.
घरी हँगनेल्सवर उपचार करणे
हँगनेल्सवर बहुतेकदा घरीच उपचार केले जाऊ शकतात…
१. बोटे भिजवा – त्वचा मऊ करण्यासाठी प्रथम तुमच्या बोटांना सुमारे १० मिनिटे कोमट, साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवा.
२. काळजीपूर्वक काढा – सॅनिटाइज्ड नेल क्लिपर किंवा लहान कात्री वापरून हँगनेल त्वचेजवळ हळूवारपणे कापून घ्या. तुम्हाला कदाचित त्वचेचा वरचा भागदेखील त्याचबरोबर ओढून काढण्याचा मोह होईल, परंतु तुम्ही ते टाळले पाहिजे. त्वचेचा हा भाग ओढल्याने आणखी नुकसान होऊ शकते आणि क्यूटिकलमध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.
३. मॉइश्चरायझर लावा – तुमच्या नखांभोवतीची त्वचा मॉइश्चराइझ ठेवण्यासाठी सुगंध-मुक्त (fragrance-free) मॉइश्चरायझिंग क्रीम किंवा थोडी पेट्रोलियम जेली वापरा. दुसरा पर्याय म्हणजे बॅसिट्रासिनसारखे (bacitracin) अँटीबॅक्टेरियल मलम थोड्या प्रमाणात वापरणे.
४. गरज पडल्यास मलमपट्टी करा – जर त्या भागात जखम झाली असेल किंवा रक्तस्त्राव होत असेल, तर तो बरा होईपर्यंत संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी पट्टीने झाकून ठेवा.
हँगनेल्स होण्यापासून कसे टाळायचे
हँगनेल्स रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या नखांभोवतीची त्वचा निरोगी आणि हायड्रेटेड ठेवणे. त्वचा आणि नखांची काळजी घेण्यासाठी या टिप्स मदत करू शकतात:
स्वच्छ, कोरडी आणि हायड्रेटेड त्वचा ठेवा – तुमचे हात आणि पाय सौम्य क्लींजरने धुवा, नंतर ते पूर्णपणे वाळले आहेत याची खात्री करा. दररोज मॉइश्चरायझर्स वापरा आणि प्रत्येक वेळी हात धुतल्यानंतर ते पुन्हा लावा. तुमची त्वचा मऊ ठेवण्यासाठी सुगंध-मुक्त हँड क्रीम किंवा क्यूटिकल ऑइल वापरा.
नखे चावू नका – नखे चावल्याने किंवा त्यांच्या सभोवतालची त्वचा उपटून काढल्याने संसर्ग होऊ शकतो.
हातमोजे घालून तुमचे हात सुरक्षित ठेवा – भांडी धुण्यासारख्या कामांसाठी, विनाइलसारख्या वॉटरप्रूफ ग्लोव्हजच्याखाली कापसाचे ग्लोव्हज वापरा. थंड हवामानात स्वच्छता करताना, बागकाम करताना किंवा बाहेर वेळ घालवताना हातमोजे वापरा.
नखांची काळजी घेण्यास प्राधान्य द्या – नेल क्लिपर किंवा कात्री वापरून तुमची नखे सरळ आकारात कापून घ्या. नखाच्या टोकांना किंचित गोल करण्यासाठी आणि नखे खडबडीत वाटू नये म्हणून एमरी बोर्ड वापरा. तुमच्या नखांचा वापर हत्यारे म्हणून करणे टाळा – उदाहरणार्थ, सोडा कॅन उघडण्यासाठी.
हँगनेल्ससाठी डॉक्टरांना कधी भेटावे
बहुतेक हँगनेल्स घरगुती काळजीने स्वतःहून बरे होतात. तथापि, जेव्हा नखांभोवतीच्या त्वचेचा संरक्षक अडथळा खराब होतो, तेव्हा बॅक्टेरिया आत येऊ शकतात, ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो. याला तीव्र पॅरोनिचिया (acute paronychia) म्हणतात. संसर्गाची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :
लालसरपणा : नखांभोवतीची त्वचा लाल आणि सूजलेली दिसते.
सूज : प्रभावित भाग फुगीर किंवा सुजलेला दिसू शकतो.
वेदना : नखाभोवतीचा भाग दुखू शकतो किंवा वेदनादायक वाटू शकतो. विशेषतः स्पर्श केल्यावर हे दुखू शकते.
उबदारपणा : संक्रमित त्वचा स्पर्शास उबदार वाटू शकते.
पू : जर संसर्ग वाढला तर नखाजवळ पिवळ्या किंवा पांढऱ्या द्रवाचा पू (pus) तयार होऊ शकतो.
जर तुम्हाला ही लक्षणे दिसली, विशेषतः जर संसर्ग सुधारत नसेल किंवा आणखी बिघडत असेल तर वैद्यकीय मदत घेणे चांगले आहे. संक्रमित हँगनेल्स वेदनादायक असू शकतात आणि उपचार न केल्यास संसर्ग तुमच्या बोटाच्या इतर भागात पसरू शकतो.