Hong Kong Cricket Sixes: एकेकाळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा समावेश असलेली ‘हाँगकाँग सिक्सेस’ स्पर्धा पुनरागमन करत आहे. टी२० क्रिकेटचा मागमूसही नसताना क्रिकेट चाहत्यांना झटपट खेळाची पर्वणी मिळवून देणारी स्पर्धा असं या स्पर्धेचं वर्णन केलं जातं. नव्वदच्या दशकात जन्मलेल्या मंडळींसाठी हाँगकाँग क्रिकेट ही स्पर्धा त्यांच्या बालपणीच्या आठवणीचा सुवर्णकाळ. आपले लाडके खेळाडू हसतखेळत, गप्पाटप्पा, हशा-किस्सेटाळ्या देत तडाखेबंद षटकार लगावताना पाहणं सुखद अनुभव असे. हाँगकाँग क्रिकेटच्या पटलावर लिंबूटिंबू. शहरातल्या मोठ्या बागेत क्रिकेटची स्पर्धा भरवली तर कशी दिसेल तसं या स्पर्धेचं स्वरुप असे. तब्बल ७ वर्षानंतर या स्पर्धेचं पुनरागमन होत आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारताचा संघ खेळणार असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय असतं स्पर्धेचं स्वरुप?

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत प्रत्येक संघात केवळ सहाच खेळाडू असतात. विकेटकीपर आणि गोलंदाज हे दोन वगळता अन्यत्र केवळ चार खेळाडूच क्षेत्ररक्षणासाठी उपलब्ध असतात. प्रत्येक संघाला पाच षटकं मिळतात. विकेटकीपर वगळता बाकी सगळे एकेक षटक टाकू शकतात.

फलंदाज वैयक्तिक ३१ धावांवर पोहोचल्यानंतर त्याला डाव सोडावा लागतो. पण संघाचा ऑलआऊट झाला किंवा सगळेच फलंदाज निवृत्त झाले तर ३१ वर डाव सोडलेला फलंदाज पुन्हा खेळायला येऊ शकतो. यामुळे तळाचे फलंदाज एकेरी-दुहेरी धाव घेण्याचा धोका पत्करतात. कारण मुख्य फलंदाज पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो याची त्यांना कल्पना असते.

वाईड आणि नोबॉलकरता फलंदाजी करणाऱ्या संघाला दोन धावा मिळतात. पाच षटकं पूर्ण होण्याआधीच पाच विकेट्स पडल्या तर शेवटचा नाबाद फलंदाज रनरच्या साह्याने फलंदाजी करू शकतो. हा नाबाद फलंदाजच स्ट्राईकवर असतो. हा नाबाद राहिलेला फलंदाज बाद झाला की डाव आटोपला असं समजण्यात येतं. सामना जिंकणाऱ्या संघाला प्रत्येकी २ गुण मिळतात.

स्पर्धेत किती संघ खेळतात?

यंदा या स्पर्धेत १२ आंतरराष्ट्रीय संघ आणि यजमान हाँगकाँग असे एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत. ३ दिवस ही स्पर्धा चालेल. प्रत्येक सामना ४५ मिनिटांपेक्षा अधिक काळ चालत नाही. प्रत्येकी चार अशा दोन गटात ८ संघ विभागले गेले आहेत. पहिल्या दिवशीच्या निकालानुसार दुसऱ्या दिवशीच्या सामन्यांसाठी सीडिंग देण्यात येतं. दुसऱ्या दिवशी चार उपउपांत्यपूर्व सामने होतात. चार तळाचे संघ प्लेट गटात जातात. चार संघांमध्ये जेतेपदासाठी मुकाबला होतो.

शेवटची हाँगकाँग सिक्सेस स्पर्धा कोणी जिंकली होती?

२०१७ मध्ये झालेल्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. या स्पर्धेची सर्वाधिक ५ जेतेपदं दक्षिण आफ्रिकेच्याच नावावर आहेत.

भारताने ही स्पर्धा जिंकली आहे का?

भारतीय संघाने २००५ मध्ये या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. रीतिंदर सिंग सोधी याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. अतुल बेदाडेने १९९६ मध्ये झालेल्या स्पर्धेत सर्वाधिक धावा (१२३) केल्या होत्या. २००६ मध्ये रॉबिन सिंग सर्वाधिक धावा केल्या होत्या.

स्पर्धेचे सामने कुठे होतात?

स्पर्धेच्या नावातच स्पष्ट होत असल्याप्रमाणे हाँगकाँग या स्पर्धेसाठी यजमान आहे. काऊलून क्रिकेट क्लब आणि हाँगकाँग क्रिकेट स्टेडियम इथे स्पर्धेचे सामने खेळवण्यात आले आहेत.

स्पर्धा कधी सुरू झाली?

१९९२ मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त धावांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन हा या स्पर्धेमागचा उद्देश होता. त्याकाळी टेस्ट आणि वनडे अशा दोनच प्रकारात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं जायचं.

स्पर्धेला मान्यता आहे का?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने या स्पर्धेला मान्यता दिली आहे. मात्र टेस्ट, वनडे आणि टी२० अशा कोणत्याही प्रकारात याची आकडेवारी समाविष्ट केली जात नाही. क्रिकेट हाँगकाँग या स्पर्धेचं आयोजन करतं.

कोणते मोठे खेळाडू या स्पर्धेत खेळले आहेत?

मास्टरब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांच्यासह शेन वॉर्न, वासिम अक्रम, शोएब मलिक, सनथ जयसूर्या, ग्लेन मॅक्सवेल असे असंख्य आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेत खेळले आहेत.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is hong kong cricket sixes tournament sachin tendulkar used to play in this tournament what is history rules of the tournament psp