What is Hot Desk in Office : रिमोट वर्किंग, ओपन ऑफिस, वी वर्क, शेअर वर्कसारख्या अनेक संकल्पना सध्या कॉर्पोरेट जगतात प्रसिद्ध आहेत. त्यात आता हॉट डेस्क ही संकल्पना अनेक कंपन्यांमध्ये कार्यान्वित झाली आहे. हॉट डेस्कचा एक ट्रेंडच निर्माण झाला आहे. त्यामुळे हॉट डेस्क ही संकल्पना नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात.

तुम्ही रोज ऑफिसला जाता. ऑफिसला गेल्यावर तुम्हाला दिलेल्या जागेवर तुम्ही बसता. तिथंच तुमचा लॅपटॉप किंवा संगणक किंवा तुमचं कार्यालयीन कामाचं साधन असतं. तिथून तुम्हाला कोणीही हलवणारं नसतं. त्या जागी कोणी बसलं की तुम्ही हक्काने त्याला तिथून उठवू शकता. पण हॉट डेस्क संकल्पनेत अगदी याच्या उलट असतं. या संकल्पनेत तुम्हाला ठराविक एक असा डेस्क दिला जात नाही. तुम्ही कुठेही बसून काम करू शकता.

हॉट डेस्क संकल्पना असलेल्या कंपन्यांमध्ये तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्हाला हव्या त्या डेस्कवर बसू शकता. काही खासगी कंपन्यांमध्ये किंवा समूहाने एकत्र काम करायला बसणाऱ्या ऑफिस स्पेसमध्ये ही संकल्पना आढळून येते.

हेही वाचा >> Boarding From Left Side : विमानात नेहमी डाव्या बाजूने का चढतात? प्राचीन काळातील ‘हे’ कारण जाणून घ्या!

लॅपटॉपवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना सुयोग्य ठरते. कारण लॅपटॉप कोणत्याही प्लगला कनेक्ट करून तुम्ही तुमचं काम सुरू करू शकता. फक्त वायफाय, प्रिंटर, फोन आदी सुविधा प्रत्येक डेस्कवर उपलब्ध असणं गरजेचं असतं. काही ठिकाणी हॉट डेस्क मॉनिटर, VGA, DVI किंवा HDMI कनेक्शन असतात. त्यामुळे प्लग इन करण्याकरता आणि दुसरी स्क्रीन वापरण्याकरता मिळते.

हॉट डेस्क फायदे

हॉट डेस्कमुळे अनेक कर्मचारी इतरांशी संवाद ठेवू शकतात. त्यामुळे कार्यालयातील कम्युनेशन वाढतं. तसंच, ऑफिस स्पेस पुरवणाऱ्या कार्यालयात हॉट डेस्कमुळे इतर क्षेत्रातील लोकांशी ओळख होते. त्यांच्याशी संवाद वाढून याचा फायदा व्यावसाय वाढीसाठीही करता येतो. तसंच, एकमेकांच्या विचारांचं आदान-प्रदान करता येतं.

हॉट डेस्कचे तोटे

हॉट डेस्कमुळे आपल्या बाजूला कोण बसेल यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. आपल्या शेजारी कोणीही बसायला येऊ शकतं. त्यामुळे तुमची डोकेदुखीही वाढू शकते. तसंच, हॉट डेस्कवर काम करत असताना तुम्हाला अधिकचे ऑफिस कल्चर सांभाळावं लागतं. तुम्ही आज ज्या डेस्कवर बसला आहात तिथेच तुम्ही उद्या बसणार नसता. त्यामुळे तो स्वच्छ ठेवणं तुमचं काम असतं. दुसरा महत्त्वाचा तोटा म्हणजे, कार्यालयीन कागदपत्रे ठेवण्याकरता तुमच्याकडे कायमस्वरुपी लॉकर (डेस्कशेजारी) मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे तुम्हाला तुमचे सर्व साहित्य घेऊनच ऑफिसमध्ये किंवा तत्सम जागेवर जावं लागतं.