जगातील पहिल्या मलेरिया लसीला (Malaria Vaccine) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिली. वर्षाला जवळपास ४ लाख लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या या आजारावर लस आल्यानं आरोग्य क्षेत्राला आणि मलेरियामुळे बेजार झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच निमित्ताने मेलेरिया आजार नेमका काय आहे? या आजाराचा शोध ते त्यावरील लसीच्या निर्मितीचा प्रवास समजून घेणारा हा खास आढावा.

मलेरिया काय आहे?

प्लाझमोडियम नावाच्या एक पेशीय सुक्ष्मजीवांचा संसर्ग झालेले अॅनोफेल्स मादी डास चावल्यानं मलेरिया होतो. विशेष म्हणजे हे सुक्ष्मजीव आधी डासांमध्ये शिरकाव करतात आणि मग हे संसर्ग झालेले डास चावताना माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. ५ प्रकारच्या परपोषी सुक्ष्मजीवांमुळे माणसांमध्ये मलेरियाचा संसर्ग होतो. यापैकी पी. फाल्सीपॅरम (P. falciparum) आणि पी. व्हिव्हॅक्स (P. vivax) हे दोन प्रकार सर्वाधिक जीवघेणे आहेत. आफ्रिकेत २०१८ मध्ये ९९.७ टक्के रुग्ण फाल्सीपरमने संसर्गित होते आणि अमेरिकेत ७१ टक्के रुग्णांना व्हिव्हॅक्सची बाधा झाली होती.

book review Navi Pidhi Navya Vata book by Prakash Amte
पुढच्या पिढीची कर्तबगारी!
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यांगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट

मलेरियाची लक्षणं काय?

ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे अशा व्यक्तींना मलेरियाची बाधा होण्याचा सर्वाधिक धोका असतो. मलेरियाचे सुक्ष्मजीव असलेला डास चावल्यानंतर जवळपास १०-१५ दिवसांनी या आजाराची लक्षणं दिसण्यास सुरुवात होते. यात मलेरिया झालेल्या व्यक्तीला थंडी-ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि थकवा येणे अशी लक्षणं दिसतात. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मलेरिया गंभीर रुप धारण करतो आणि आजार वाढल्यास मृत्यूचाही धोका असतो. या रोगाचा सर्वाधिक परिणाम उष्णकटीबंधीय भागात झालेला आढळतो.

मलेरिया विषाणूचा शोध कसा लागला?

१८९८ मध्ये भारतात जन्मलेले ब्रिटीश डॉक्टर रोनाल्ड रॉस यांनी डासांमुळे होणाऱ्या मलेरियावर संशोधन केलं आणि नेमक्या कोणत्या डासांमुळे मलेरिया होतो हे शोधलं. त्यांनी कोलकातामध्ये असताना या डासांचे प्रामुख्याने ३ प्रकार शोधले. पक्ष्यांमधील मलेरिया प्रमाणेच माणसाच्या शरीरातही बदल घडतात हे त्यांना दिसून आले. त्यांच्या मलेरिया संसर्गावरील संशोधनाला १९०२ मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. या संशोधनामुळे मलेरियावरील नियंत्रणासाठी मोठी मदत झाली. ते ब्रिटीश काळात जवळपास २५ वर्षे भारतीय वैद्यकीय सेवेत होते.

रॉस यांनी कोणत्या डासांमुळे मलेरिया होतो हे शोधलं त्याच वर्षी ग्रासी, बिगनमी आणि बास्टिनेली यांनी अ‍ॅनोफेलिस जातीच्या डासांमध्ये प्लाझमोडियम, फाल्सिपॅरम या जातीच्या मलेरियाच्या जंतूंची वाढ कशी होते आणि ते डास चावल्यामुळे माणसांमध्ये मलेरियाचा संसर्ग कसा होतो हे शोधलं.

दरवर्षी मलेरियामुळे ४ लाख लोकांचा मृत्यू

मलेरियामुळे दरवर्षी जगभरात तब्बल ४,००,००० जणांचा मृत्यू होतो. यात आफ्रिकन देशांमधील लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे. सामान्यपणे दर मिनिटाला एका लहान मुलाचा मलेरियामुळे जीव जातो. जगातील एकूण मृत्यूंपैकी अर्धे मृत्यू केवळ ६ आफ्रिकन देशांमध्ये होतात. यातील एक तृतीयांश मृत्यू एकट्या नायजेरियात होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१९ मधील आकडेवारीनुसार हे स्पष्ट झालंय.

मलेरियावरील जगातील पहिल्या लसीला WHO ची मान्यता

अशा या जीवघेण्या मलेरिया आजारावरील जगातील पहिल्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ६ ऑक्टोबरला मान्यता दिलीय. RTS S/AS01 असं या मलेरिया लसीचं नाव आहे. यामुळे मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण राखण्यात यश येणार आहे. औषध कंपनी जीएसकेने (GSK) १९८७ मध्ये तयार केलेल्या या लसीचे घाना, केनिया आणि मलावी या देशांमध्ये २०१९ पासून २० लाख डोस देण्यात आले. त्यांचं परिक्षण केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या लसीला अखेर व्यापक वापरासाठी मान्यता दिलीय. तसेच सहारन आफ्रिकन देशांमधील लहान मुलांवर या लसीच्या वापराची शिफारस केलीय. २ वर्षांपर्यंतच्या मुलांना या लसीचे ४ डोस देण्यात येणार आहेत.

सध्या जगात विषाणू आणि जीवाणूविरोधात अनेक लसी उपलब्ध आहेत. मात्र, परपोषी डासांवरील ही पहिलीच लस आहे जिला जागतिक आरोग्य संघटनेने व्यापक वापरासाठी मान्यता दिलीय. ही लस मलेरियाच्या ५ प्रजातींपैकी प्लास्मोडीयम फाल्सीपॅरम या एका परपोषी प्रजातीवर प्रभावी आहे. हीच प्रजाती ५ पैकी सर्वात घातक आहे. ही लस निर्मिती मलेरियावर नियंत्रणासाठी खूप महत्त्वाची असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलं.

एप्रिलमध्ये ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी त्यांची मॅट्रीक्स-एम (Matrix-M) ही लस ७५ टक्क्यांपेक्षा अधिक परिणामकारक असल्याचं सांगितलं. त्यानंतर मलेरियाविरोधातील लढ्याला चांगलीच बळकटी मिळाली.

हेही वाचा : आज जागतिक मच्छर दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

जर्मनीची बायोएनटेक कंपनीने देखील पुढील वर्षीपासून मलेरियावरील लसींच्या चाचणीला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली ही लस त्यांच्या आरएनए (mRNA) तंज्ञावर आधारित असेल. याकंपनीने आधी अमेरिकेच्या फायझरसोबत मिळून कोरोना लसही तयार केलीय. या नव्या घडामोडींमुळे वैज्ञानिकांना मलेरियावरील आणखी लसी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी आशा जागतिक आरोग्य संघटनेला आहे. यामुळे मलेरियाच्या परपोषींच्या इतर प्रजातींवर देखील लस तयार व्हायला मदत होईल. मलेरियाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकांमध्ये याविषयी जाणीव जागृती व्हावी यासाठी २५ एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून घोषित केला आहे.