जेवणानंतर अनेकांसाठी महत्वाची असणारी गोष्ट म्हणजे पान. आजही अनेकांच्या घरी अडकित्त्याने सुपारी फोडून पान बनवून खाणारे आजी-आजोबा असतील. पान खाण्यासाठी वेळेचे काही बंधन नसते. पूर्वी गावी प्रत्येकाच्या घराघरात आपल्याला चंची आणि पानदानं किंवा आजीचा बटवा दिसायचा. ज्यात पान खाण्यासाठी लागणारे सर्व साहित्य असायचे. चुन्याची छोटी डब्बी, कात, सुपारी, अडकित्ता वैगरे. आजही गावी गेल्यावर अनेकांकडे पान बनवण्यासाठी लागणारी तंबाखू, पानासह सुपारी, अडकित्ता पाहायला मिळेल. कारण सुपारीशिवाय पान पूर्णच होऊ शकत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की, सुपारी आणि अडकित्ता हे शब्द मराठी भाषेत आले कुठून? तसेच हे शब्द नेमके तयार कसे झाले? चला तर जाणून या शब्दांचा इतिहास ….
सुपारी आणि अडकित्ता हे शब्द मराठी भाषेत आले कुठून?
मराठीतील अनेक शब्द हे संस्कृतमधून तयार झालेत पण सुपारी हा शब्द पर्शोअरेबिक आणि अडकित्ता हा कन्नड भाषेत आलेला आहे. पण हे शब्द मराठीत नेमके कशाप्रकारे तयार झाले हे आपण कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जाणून घेऊ…
सुपारी आणि अडकित्ता शब्दाचा मूळ अर्थ काय?
मी सुपारी चिकणी, तुम्ही अडकित्ता’ असं एक चित्रपटातील गाणं खूप लोकप्रिय आहे. यातली सुपारी हा शब्द आला तो पाली प्राकृत भाषांमधून नाही, तर चक्क पर्शोअरेबिकमधून. काश्मिरी भाषेत सुपारीला सुफोरी असे म्हणतात, तर गुजरातीत सुपोरी. सुपारी हा संस्कृत शूर्परिकाचा अपभ्रंश असल्याचे म्हटले जाते. सुपारीला संस्कृतमध्ये पूगीफल या दुसऱ्या नावानेही ओळखले जाते. पूग म्हणजे समूह. समूहाने येणारे फळ. तसेच हे फोडण्यासाठी वापरलं जाणारतं साधन म्हणजे अडकित्ता. अडकोत्तु किंवा अडकत्तरी हे त्याचं मूळ रूप. हा कन्नड शब्द. अडके म्हणजे सुपारी, तर कोलु म्हणजे कातरणे. म्हणून सुपारी कातरणारा तो झाला अडकोत्तु. म्हणजे आपला आजचा अडकित्ता.
पण लीळाचरित्रात या साधनाला सुंदर शब्द आहे. तो म्हणजे पोफळफोडणा. यातला पोफळे हा शब्द आजही कोकणात ओल्या पोफळांसाठी वापरला जातो. ओली सुपारी म्हणजे पोफळा. सांगली जिह्यातील बागणीचे अडकिल्ले तर राज्यभर प्रसिद्ध आहेत.
त्यामुळे पान म्हटल्यावर आजही सुपारी आणि अडकित्ता या गोष्टी आधी डोळ्यासमोर येतात. कारण सुपारी शिवाय पानाला चव नाही, तर सुपारी फोडण्यासाठी अडकित्त्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. विशेषत: रोज न चुकता पान खाणाऱ्यांकडे या दोन गोष्टी असतातच. पण केवळ महाराष्ट्रातच अनेक राज्यांमध्येही पान खाण्यासाठी लागणाऱ्या या दोन गोष्टी तितक्याच फेमस आहेत.